कविता
प्रिय २०१७
आता थोड्याच वेळात
तू बोंबलत निघून जाणार आहेस.
येतानाही केला होतास तू गाजावाजा
पण मी मुद्दामच दूर्लक्ष करून
थेट भेटलो होतो तुला सकाळी!
१९७३ पासून तुम्ही सगळे असेच हसत येता
आणि रडत जाता.
काय कवतीक करावं आणि का कराव?
आम्ही संकल्प करायला लागलं की
तुम्ही मुरक्या मुरक्या हसुन टिंगल उडवायची.
आम्हीही जिद्द सोडत नाही आमची.
मिळवता येईल तेवढे मिळवतो,
जळता येईल तेवढे जळतो
आणि पळता येईल तेवढे पळतो.
हिशोब मांडायला गेलं की रात्र पुरत नाही
अन् पश्चातापाशिवाय हाती काही लागत नाही.
म्हणूनच तू गेलास तरी
आम्ही तुझ्या मागे पळत नाही.
आता भिरभिर्या सारखा २०१८ येईल.
बारा महीने फिरवत राहील.
वावटळीतलं पान मी अलगद हातात झेलून घेईल.
नुसत्या श्वासांचा हिशोब नाही
मी युगाचं गाणं गाईन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा