जाणिवांची फुले - बालकथासंग्रह
° मुलांच्या भौतिक गरजेबरोबरच भावनिक गरजा भागवणेही
महत्त्वाचे : दीपक नागरगोजे.
• डॉ. कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले' या
बालकथासंग्रहाचे 'शांतिवन' मध्ये प्रकाशन.
सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांनी लिहिलेल्या 'जाणिवांची फुले' या बालकथासंग्रहाचे प्रकाशन 'शांतिवन' ता. शिरुर(का.) जि. बीड येथे संपन्न झाले. रविवार पाच सप्टेंबर रोजी शांतीवन शैक्षणिक संकुलात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीवनचे संस्थापक सन्मा. दीपक नागरगोजे होते. यावेळी बोलताना त्यांनी, 'बालकांच्या केवळ भौतिक गरजा भागवणेच पुरेसे नसते तर त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक गरजा भागवणेही आवश्यक असते. डॉ. कैलास दौंड यांनी शांतिवन मधील मुलांच्या हस्ते 'जाणिवांची फुले' बालकथासंग्रहाचे प्रकाशन करणे हे त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. 'असे मत व्यक्त केले.
जाणिवांची फुले मध्ये बाल व किशोरवयीन मुलांच्या जीवन जाणीवा विकसित करणाऱ्या सोळा कथा आहेत. यातील बहुतांश कथा 'किशोर'या प्रतिष्ठित मासिकातून पूर्वप्रकाशित आहेत. नांदेड येथील इसाप प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या बालकथासंग्रहाला 'किशोर'या संपादक किरण केंद्रे यांची पाठराखण लाभली आहे.
शांतीवनमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी लक्ष्मण खेडकर, कावेरीताई नागरगोजे, विद्यार्थी व शिक्षिका उपस्थित होते. लक्ष्मण खेडकर व डॉ. कैलास दौंड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले व एक छानदार कविता म्हणून दाखवली. पारंपरिक कथे पेक्षा वेगळ्या असणाऱ्या ''जाणिवांची फुले' मधील कथा नक्कीच आवडतील असे डॉ. दौंड यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा