ममताआजी आणि स्विटी चिमणी
• ममताआजी आणि स्विटी चिमणी
महापूरानं गावालाच कवेत घेतलं होतं. हळूहळू तो ओसरू लागला तसतश्या अनेक गोष्टी दिसु लागल्या. पाण्यात बुडालेली झाडे झुडपे पाण्याबाहेर येतांना दिसु लागली, नदीकाठच्या घरातील पाणी ओसरू लागले. महापूरच तो त्याने घरे, पाळीव प्राणी, पक्षी, पीके यांचे अतोनात नुकसान केलेले होते. काही माणसांना त्याने जसे बेघर केलेले होते तसेच कित्येक पक्ष्यांनाही त्याने बेघर केलेला होते. अशाच पक्ष्यांपैकी एक होती स्विटी चिमणी.
नदीच्या काठावर असलेल्या झुडपात अनेक पाखरांनी घरटी केलेली होती. भक्षांची उपलब्धता, सावली, पाण्याची सोय यामुळे या झुडुपात नेहमीच अनेक पाखरांचे आवाज ऐकू येत असत. स्विटी चिमणीचे घरटेही अशाच एका झुडुपाच्या फांदीला होते. एक महिन्यापूर्वीच तीने ते खुप मेहनत घेऊन तयार केलेले होते. विणीचा हंगाम असल्याने तिने त्यात तीन अंडीही घातलेली होती. ती पांढऱ्या रंगांची अंडी खुप सुंदर दिसत आणि इतरांचे लक्षही वेधून घेत. त्यामुळे स्विटी दिवसभर घरट्याच्या जवळपास राहुनच चारा मिळवत होती. सूर्य मावळला की सर्व पक्षी विश्रांतीसाठी घरट्यात जाऊन बसत. महापूर आला त्या रात्री स्विटीही घरट्यातच होती.
नदीपात्रात पाणी वाढू लागल्याची काही पक्ष्यांना चाहुल लागली. त्यांनी ओरडून इतरांना सावध करण्याचा प्रयत्न केला. स्विटीलाही धोक्याची जाणीव झाली. घरट्यातील अंड्याच्या काळजीने तिचा पंख हलत नव्हता. शेवटी घरट्याला पाणी लागले आणि तिचा नाविलाज झाला. नदीने अक्राळविक्राळ 👹 रूप धारण केले होते. पाण्याचा आवाज वाढत होता आणि पावसाच्या सरीही कोसळत होत्या. सगळा नदीकाठच पाण्याखाली गेल्यावर रात्रीच्या अंधारातही पाखरं सैरभैर झाली. आपले घरटे, त्यातील अंडी देखील वाहुन गेली असणार या विचाराने स्विटी चिमणी पुरती दु:खी आणि घाबरलेली होती. शेवटी थकुन ती काही अंतरावर असणाऱ्या एका वडाच्या फांदीवर बसली. या झाडावर आधीच बगळे, कावळे आणि वटवाघळे देखील होती. त्यातच बुंध्याच्या ढोलीतुन साप झाडावर चढेल याचीही भिती होती. रात्रभर पाऊस पडतच होता, पुराचे पाणी वाढतच होते , त्याने आता वडाच्या खोडालाही वेढा घातला होता.
सकाळ झाली आणि हळूहळू पूर ओसरु लागला. जसं जसं पाणी पात्राकडे सरकू लागले तसतसे पावसाने केलेले नुकसान नजरेत येऊ लागले. भल्या पहाटेच स्विटी चिमणीने नदीच्या काठावरील झुडपे शोधण्याचा प्रयत्न केला पण अजुनही ती सगळी झुडपे पाण्याखालीच होती. आता ती हळूहळू उघडी पडत होती. पाण्याबरोबर वाहून आलेला काडी कचरा आणि इतर झुडपे देखील तेथे येऊन अडकलेली होती. स्विटी चिमणी अगदीच बेचैन होती. एवढ्या मोठ्या जलप्रलयात तिचे घरटे आणि त्यातील अंडी वाचले असण्याची शक्यता नव्हतीच पण तिची वेडी आशा तिला पुन्हा पुन्हा झुडूपाकडे जायला भाग पाडत होती. अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी तिचे घरटे ज्यावर होते ते काटेरी झुडूप उघडे झाले. स्विटीने त्याच्या आतबाहेर जाऊन पाहीले तेव्हा तिला कुठेही तिचे घरटे आणि अंडी दिसली नाहीत. ती खुप दु:खी आणि हताश झाली. आता आपणही नदीच्या वाहत्या प्रवाहात उडी घ्यावी आणि वाहुन जावं असं तिला वाटू लागले. आजूबाजूला अनेक पक्षी 🐦 होते तेही आपापली घरटी शोधत होते, घरटी न दिसल्याने घाबरीघुबरी होत ओरडत होती. कुणी कुणाला समजावं? कुणी कुणाला आधार द्यावा? सगळीच दु:खी होती.
हा नदीकाठ आणि गाव सोडून जाण्यापूर्वी एकवार तो नजरेखालून घालावा असा विचार स्विटीच्या मनात आला. ती भूर्र उडाली. पहिल्यांदा नदीचा काठ 🚣 पाहुन घेतला. झाडे 🌲🌳🌴 झुडुपे प्रवाहात तिरपी होत कसेबसे आपले अस्तित्व टिकवून राहीली होती. पण पाखरांच्या घरट्यांना ती सांभाळू शकली नव्हती ; उंच झाडावर काही घरटी शाबुत होती पण वाऱ्यामुळे त्यात काहीही शिल्लक राहिलेले नव्हते. आता स्विटी चिमणी गावात चक्कर मारून यायला गेली. नदीच्या काठापासुन जवळच ममता आजीचे घर होते. पुराचे पाणी तिच्याही घरात गेलेले होते. तिच्या घरातील वाणसामान काही वाहुन तर काही भिजून वाया गेलेले होते. खाण्यासाठी ठेवलेले धान्यही पाण्यात भिजुन ओले झालेले होते. त्याला लवकरच कोंभ फुटण्याची शक्यता होती. तिला अजून कोणाचीही मदत पोहचली नव्हती, तिची दोन नातवंड तिला काहीतरी खायला मागत होती. पण ती काहीच देऊ शकत नव्हती. स्विटी चिमणीने ते पाहीले. या आधी ती ममता आजीच्या घरी अनेकदा दाणे टिपायला आलेली होती. आजही ती तिच्या घरात जाऊन आली. तिची अगतिकता पाहुन स्विटीला आणखीच भडभडून आले.
"आजी, हे भिजलेले गहू फेकून देऊ का उकिरड्यावर?" ममता आजीच्या नातवानं तिला मदत करण्याच्या हेतूने विचारले.
" अरे राहु दे, असे फेकुन कसे चालेल? थोडे ऊन पडले की वाळायला घालवुया. पाखरांना खाऊ घालायला होईल. या महापूरानं पाखरांना तरी कुठे काय ठेवलेय? "
स्विटी चिमणी हे ऐकुण ममता आजीकडे पहातच राहीली. तिच्या मनात विचार आला 'स्वत:ला खायला काही राहिलेले नसतांना पाखरांना खाऊ घालणारी आजी तिला ग्रेट वाटली. जो पर्यंत ममता आजी सारखी मायाळू माणसे आहेत तो पर्यंत निराश होण्याचे कारण नाही! '
नंतर स्विटी चिमणी खुप वेळ ममता आजीच्या जवळच रेंगाळत राहीली. थेट तिला मदत पोहचे पर्यंत!
~~~~~~
छान
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद!
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवासर
उत्तर द्याहटवाआपण खूप संवेदनशील लेखक आहात...
मनपूर्वक धन्यवाद.
हटवाखुपच चांगली शिकवण देणारी कथा.
उत्तर द्याहटवाYes
हटवा