ढगांचे संचित
कालच कवी जीवन आनंदगावकर यांचा 'ढगांचे संचित' हा कवितासंग्रह हाती पडला. कविता वाचतांना चांगली कविता वाचनाचा आनंद वृद्धिंगत होत गेला. प्रकाशन दिनांक पाहिली तर ती आजचीच आहे. त्यानिमित्ताने या संग्रहावर छोटेखानी लेख लिहीला आहे. अवश्य वाचावा. कवींना खुप खुप शुभेच्छा!
~~~
• 'ढगांचे संचित' : जीवन आनंदगावकरांची जीवन सन्मुख कविता.
° डॉ. कैलास दौंड.
आजची मराठी कविता ही ग्रामीण कविता, महानगरी कविता, स्रीवादी कविता, आदिवासी कविता अशा भिन्न प्रकारात वर्गीकृत झालेली आहे. अशा स्थितीत ज्या कोणाला अशा वर्गीकरणात न सामावणारी निव्वळ, निखळ भावकविता अनुभवायची असेल तर आपल्याला जीवन आनंदगावकर यांचे नाव सहजच आठवेल. हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यांचा आत्ता प्रकाशित झालेला 'ढगांचे संचित 'हा कवितासंग्रह होय. या संग्रहातील कवितेतून विविध निसर्गरुपे त्याच्या रंग, गंध, स्पर्श आणि ध्वनी संवेदनांनी अनुभवायास मिळतात. या कवितांना कवीने 'निसर्गवर्णनपर कविता' असे म्हटलेले असले तरी त्यात माणूस अंतर्भूत आहेच. माणसाला वगळून निसर्गानुभूती जवळपास अशक्यच . त्यामुळे कवी जीवन आनंदगावकरांच्या कवितेतील निसर्ग मानवी दु:खाला व अन्य भावनांना लपेटूनच येतो. तो असा-
'नदीत वाहतो
दु:खाचा पाचोळा
घेऊन वानोळा
धन्य झालो! (पृष्ठ -७)
किंवा
' प्रश्नांच्या उतरंडीवर
मी हळू ठेवतो फुल
आंब्याच्या तवुराची मज
पडते अनवट भूल! (पृष्ठ -१३)
अशाच आणखी काही ओळी देखील सहजपणे सांगता येतात-
'असतो आपण कोण,
कोठे निघून जातो?
घुमणाऱ्या वाऱ्याला हा
प्रश्न कधी का पडतो? '( पृष्ठ -२१)
या कवीचे निसर्गाशी घट्ट जन्मानुबंध आहेत, त्या निसर्ग जाणिवा सतत त्यांच्याठाई सजगपणे वावरताना दिसतात. निसर्गाशी असलेला हे नाते कवितेतून अगदी सहजपणे आविष्कृत होत राहते. त्याचा प्रत्यय -
'रानात पाऊस पडता
गाईस वासरू लुचते
वाऱ्यावर विखुरलेल्या
गंधाशी माझे नाते!' ( पृष्ठ - २२)
अशा काव्यपंक्ती मधून येतो. या नात्यांमुळेच निसर्ग सहजच मानवी भावनांशी सहचर्य दाखवू लागतो, तो मानवी भाव भावनांचा प्रतिनिधी बनतो.
'निळ्या नभाच्या निळ्या व्यथांची
एक अनोखी ओळख आहे.
गर्द वनाच्या मुकेपणाची
मनात माझ्या चाहुल आहे.' (पृष्ठ - २३)
असे असले तरी ' ढगांचे संचित' मधील कवितांचे 'निसर्ग घटकांचे प्राबल्य असणाऱ्या कविता' आणि 'मानवी भावनांचे प्राबल्य असणाऱ्या कविता' अशा दोन भागात अभ्यास आणि आकलन, आस्वादाकरीता वर्गीकरण करता येईल. पहिल्या प्रकारच्या कवितांमधून निसर्गाचे दृष्यरूप खुपच प्रभावीपणे समोर येते. उदाहरण म्हणून पुढील ओळी पाहण्यासारख्या आहेत.
'दाट जांभळीचे
बन कुठे तुटू लागले
रान हळदी उन्हात
आता धुपू लागले.' (पृष्ठ-१६)
आणि
'हिरव्या पानांच्या गाभ्याचे
जन्म तुटू लागले
नव्या नवतीचे कोंभ
आता सुकू लागले.'(पृष्ठ -१९)
ढगांची आदीम घुसमट कवीला ऐकू येते नि मौनाच्या बागेतील दरवळ जाणवतो. या तादात्म्य पावण्यातुन त्याचा निसर्गसंवाद घडतो. त्यातुन स्वाभाविकपणे कवितेतील मानवी भावनांचे प्राबल्य वाढत जाते आणि 'मानवी भावनांचे प्राबल्य असणाऱ्या कविता' निर्माण होतात. ही निर्मितीची उगवण सहजपणे होणारी आणि अकृत्रिम असते. अशा कवितांमधून
अनामिक भय, विरह, हुरहुर, प्रिती, हरवलेपण, आठवणींचा कल्लोळ अनुभूतीस येतो आणि कवितेत आलेला निसर्ग या भावनांना अधिक सखोल परिमाण देतो. उदा:
'जळो जीवघेणा
पसारा भवाचा
धसारा जीवाचा
असे अंतहिन!' (पृष्ठ- २)
किंवा
'झाडे तुटून गेली
पक्षी उडून गेले
प्रारब्ध माणसांचे
कोणी खुडून नेले?'
एकुणच आयुष्याचा गुंता सोडवण्याच्या मार्गातील प्रश्नांची चिंता माणसाला सतावतच असते. कधीतरी एक दुसऱ्या पासून दूरही जायचे असते पण हे दूर होणेही पुन्हा नव्या रूपात भेटण्यासाठीच असते हा सृष्टीचा, निसर्गाचा नियमच आहे. निसर्ग नियमांना स्विकारणे म्हणजे निसर्ग सन्मुख होणे आहे. ते कवीच्या कवीतेत प्रत्ययास येते ते असे-
पुन्हा भेटण्यासाठी जणू
आता व्हायचे वेगळे,
वसंताच्या मध्यावर
इथे जाण्याचे सोहळे! (पृष्ठ- ३५)
व
शब्दच नव्हते जवळ आपुल्या
तेव्हा मुकेपणाचे झाले बंधन!
आता तू कुठे अन् मी कुठे ग
सुने सुने बघ सगळे अंगण!'( पृष्ठ-४४)
कवी जीवन आनंदगावकर यांच्या 'ढगांचे संचित' मधील कविता रूपाच्या दृष्टीनेही आटोपशीर आहे. छंदाच्या बाबतीत ती काटेकोर नसली तरी छंदानुसारी आहे. शब्दकळेच्या दृष्टीने ती प्रभावी आणि नेटकी आहे. त्यामुळे आजच्या गद्यप्राय आणि शब्दबंबाळ कवितेपेक्षा ती लावण्यवती आहे. या कवितेतील निसर्ग घटक प्रतिकांचे रूप घेतो. कवीचे उपमा लाघव कवितेचे सौंदर्य आणि अर्थवाहीता वाढवते. अपेक्षांचा घाट, नात्यांचे निर्वासित गाव, संवादाचे सूत्र, अज्ञानाचे चंदन, विचारांचा कहर, मौनाची बाग, आकलनाची हिरवळ, देहाचे ब्रम्हकमळ,
ओढ्याकाठी उगवलेली कोवळी पहाट अशा शब्दकळेतून त्याचा प्रत्यय येतो. काही ठिकाणी ग्रेसच्या धाटणीच्या निसर्गरूपाची गहनता वाढवणाऱ्या प्रतिमा येतात. निसर्गाधाराने अवतरलेली ही जीवनसन्मुख कविता वाचकाच्या मनाला भिडणारी आहे.
• ढगांचे संचित : कवितासंग्रह
• कवी : जीवन आनंदगावकर
• प्रकाशक : गोयल प्रकाशन, पुणे.
• प्रथमावृत्ती : १० सप्टेंबर २०२१
• पृष्ठे ६४ .मूल्य ९५ ₹
~~~~~~~~~~~~~~~~~~
डॉ. कैलास दौंड
Kailasdaund@gmail.com
खुप छान कविता
उत्तर द्याहटवामुळातून वाचावी अशी कविता आहे ही.
हटवा