गाव : उब आणि धग (प्रस्तावना लेख)

(चपराक दिवाळी महाविशेषांकासाठी)

○ गाव :उब आणि धग
   ●   जगण्याचा पापुद्रा उलगडतांना. ..
                                         डाॅ. कैलास दौंड

          दिनांक एक जून २०१८. मी कसल्याशा कामानिमित्ताने अहमदनगरला चाललो होतो. सोबत माझा मुलगा प्रभंजन होता. अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याजवळून जात असतांना खिशातील मोबाईल वाजला. आज माझा वाढदिवस असल्याने अधून मधून फोन येत होते. मोटारसायकल थांबवून फोन घेतला. तर समोरून चपराक प्रकाशन आणि मासिकाचे संपादक घनश्याम पाटील बोलत होते. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या. आणि ' या निमित्ताने एक लेख ताबडतोब पाठवा. आजच जूनचा अंक छापायला जाणार आहे' असे सांगितले.
              लेखकाच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्या लेखकाचा लेख मासिकातून प्रसिद्ध करण्याच्या त्याच्या विचाराने मला आनंद झाला. या निमित्ताने चपराकच्या हजारो वाचकांपर्यंत मला जायला मिळणार होते. सायंकाळपर्यंत लेख पाठवायचे ठरवून कोणत्या विषयावरील लेख पाठवता येईल याचा विचार करत होतो. आपल्या गावाविषयी एखादा लेख पाठवावा या विचारावर मी नक्की झालो. सहा-सात वर्षापूर्वी गावातील बर्‍या वाईट घटनांवर भाष्य करणारे काही एक सलग लिखाण मी केलेले होते. त्यातील पहिली पाच सहा पाने लेख म्हणून पाठवून दिले. लगेचच माझा एक फोटोही त्यांच्या सांगण्यावरून इमेलने पाठवला. लेखाचे शीर्षक होते 'गावाच्या छायेत वाढलो मी'.
                        एक जून रोजी महाराष्ट्रातील अनेक जणांचे वाढदिवस असतात. पूर्वी काही वाढदिवस वगैरे साजरे करण्याची फारशी रूढ नव्हती. त्यामुळे या जन्म तारखेवर क्वचितच चर्चा होई. आता हाताशी आलेली फेसबुक, व्हाटस्अप सारखी  समाज माध्यमे माणसांच्या व्यक्तीगत आयुष्यातील छोट्यामोठ्या सुखद आणि दुःखद घटनांचे साक्षीदार बणत असल्याने माणसे आपल्याशी संबंधीत बाबी समाजमाध्यमातून लोकांसमोर मांडत आहे. त्यामुळे अलिकडे वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सर्वच स्तरातील आणि सर्वच वयोगटातील लोकांत वाढीस लागली आहे. एक जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांची संख्या खूप प्रचंड आहे. एखाद्या गावाचा जरी विचार केला तरी पंचवीस तीस टक्के लोकांची तरी अशी जन्मतारीख असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही जन्मतारीख असणाऱ्यांचे फारसे कौतुक कुणाला नसते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी दैनिके देखील सर्व मान्यवरांची दखल घेऊ शकत नाहीत. अशावेळी समाजमाध्यमातून मिळणाऱ्या शुभेच्छा त्याचा वापर करणाऱ्या सर्वांना महत्त्वाच्या वाटतात. अर्थात ही तारीख आपली खरी जन्मतारीख नाही असे अनेकांचे म्हणणे असते पण कागदोपत्री तीच नोंदवलेली असल्याने तीच खरी मानावी लागते. तसेच या दिवशी मिळालेल्या शुभेच्छा देखील खऱ्या मानाव्या लागतात. म्हणूनच घनश्याम पाटील यांच्या फोनचे मला विशेष महत्त्व वाटले. नव्या निर्मितीला प्रेरणा देणारा हा संवाद अत्यंत सुखद होता.
                    नंतर  १४ जूनला पोष्टातून चपराक मासिकाचा जूनचा अंक हाती पडला. मला त्याची उत्सुकता होतीच. परखड विषय, नेटकी मांडणी आणि अचूक मुद्रितशोधन यामुळे चपराक मासिक मराठी वाचकाचे लक्ष वेधून घेते. या अंकातील लेखावर आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आम्ही या विषयावरील लेखमाला सुरू करायचे ठरले.
              प्रत्येक महिन्याला एक लेख लिहायचा होता. या आधी २०१२ या वर्षात 'तर्होळीचं पाणी' हा माझा ललित लेख संग्रह प्रकाशित झाला होता. त्याचे वाचकांनी भरभरून स्वागत केलेले होते. या संग्रहातील सर्व लेखातून माझ्या हाडीमासी रूतलेले आणि एकजीव झालेले गाव शीव पाझरलेले आहे. थोडीतरी ग्रामीण पार्श्वभूमी ज्याला लाभलेली आहे असा वाचक या लेखात गुंतत जातो. त्या भल्या बूर्‍या ग्राम निसर्गाशी तादात्म्य पावतो. येथे आनंद, दुःख, उदासी, हुरहूर, आतुरता, वात्सल्य, कणव, कारूण्य अशा भावनेचे अनेक प्रसंग ओघाने येतात. मग आता नव्याने गावाच्या संदर्भाने मी काय लिहीणार हा माझ्यापुढे प्रश्न होता. गेल्या काही वर्षापूर्वी गावाच्या संदर्भाने बर्‍या वाईट घटनांवर एक सलग असे लिखाणही मी करून ठेवले होते. आज सहाय्यक  माहिती अधिकारी असणारे गणेश फुंदे हे अकोल्याला देशोन्नती गुपच्या कृषकोन्नती साप्ताहिकाचे काम करत असतांना हे लिखाण क्रमशः आणण्याचा थोडा खटाटोप त्यांनी केला होता. आज ते लिखाण असलेल्या दोन वह्या माझ्या समोर होत्या. केवळ गत अनुभवांना गोंजारत गळे काढू ,गहिवर सांप्रादायी लेखन मला करायचे नव्हते. या वह्या वाचत असतांना अनेकदा माझा माझ्याशीच कधी वाद तर कधी संवाद होऊ लागला. गावाचे गोडवे गातांना गावातील वाईट वृत्ती, प्रवृत्ती माझ्याकडे पाहून मला खीजवू लागल्या. सत्य असत्याशी मन ग्वाही करण्याचा संत तुकोबांचा मार्ग मला खुणावू लागला.
                 गावाचे चांगुलपण, गावातील अनिष्ट वृत्ती - प्रवृत्ती आणि आजच्या काळाला भिडण्याची तयारी असे आशयसुत्र मनाशी निश्चित करून सदरांसाठी लेख लिहीण्याचे ठरले.' गाव:ऊब आणि धग' हे शीर्षक नक्की केले. घनश्याम पाटील यांना ते आवडले. पूर्वीचे लेखन वाचून आशयानुसार वेगवेगळे लेख लिहायचे ठरवले.  पुनर्लेखन करणे अत्यावश्यक होते. कोणत्याही लेखनाचे पुनर्लेखन हा लेखकांसाठी आत्मशोध असतो. ते नवे जग असते. पुनर्लेखन हा एक प्रकारचा पुनर्शोध देखील असतो. याचा मला अनुभवाने विश्वास आहे.
           मग या लेखनातून मला समान आशयाचे गट पाडता आले. त्याला आजच्या गावाच्या पर्यावरणात पडताळता आले. या कामासाठी घाई नसल्याने त्या वातावरणात माझे स्वतः वेळोवेळी जाणे तर झालेच त्याच सोबत आजच्या जगण्याचे ताणेबाणे स्पर्शून अनुभवता आले. त्यातून मग 'अस्वस्थ पायताणे' , 'वृक्ष पूर्वज गावाचे', 'मायेच्या कढाचे गवसेना पाणी', 'गावाच्या नदीचे अवखळ पाणी', 'मृत्यू आणि मृत्तिका', 'माझिया शिवारी घडो परिक्रमा', 'युवका तुच किरण प्रभातीचा', 'पंखावर त्यांनी झेलले आभाळ !', 'कुणाच्या भल्यासाठी शेतकरी मेळे!' , 'गाव एक संस्कृतीचा खेळ!' , 'गाव: नवे रंग - नव्या जखमा', 'गाव अमर आहे'. अशी लेखांची एक मालिकाच दिड वर्षात तयार झाली. या सर्वच लेखातून माझे गत जीवन तर प्रसंग परत्वे आले आहे. त्याच बरोबर एक वर्तमानकालिन अस्वस्थता देखील आली आहे. गावाचे सौहार्द टिकून रहावे, माणसामाणसातील संबंध अबाधित रहावेत. असे मला सतत वाटत आले आहे. तेच शब्दात मांडण्याचा प्रयत्न या लेखमालेतून झाला आहे. 
             मध्यंतरी अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्यालय येथे जाणे झाले. त्यावेळी तिकडील मित्र दीपक पाचपुते यांनी कोंभाळणे येथील महाराष्ट्राच्या बीजमाता अशी ओळख निर्माण झालेल्या राहीबाई पोपेरे यांची त्यांच्या घरी भेट घडवून आणली. त्या घटनेमुळे बियांचे  जतन आणि संवर्धन मध्यवर्ती ठेवून 'बीज जपावे उरात । मग पीक वावरात' हा लेख लिहिला. या लेखाचे आपल्या लेखमालेशी अंतस्थ सुत्र असल्याचे जाणवले. म्हणून साप्ताहिक चपराकसाठी तो लेख पाठवला. शब्द रूची एप्रिल १९ अंकात देखील हा लेख आला होता तरीही तो चपराक मध्ये येणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते कारण माझे लेख नियमितपणे वाचणारे वाचक येथे होते. त्यांना हा लेख वाचून नक्कीच बरे वाटले असे मला त्यासंदर्भाने आलेल्या फोनमुळे समजले.
            'गाव : उब आणि धग' या लेखमालेला लाभलेला वाचकांचा प्रतिसाद महत्त्वाचा होता. काही वाचक फोनवर चर्चा करत. कधी कधी त्यांचे स्वतःचे गावा संबंधीचे, खेड्या संबंधीचे अनुभव सांगत. गावाच्या संबंधाने किती पैलूने चिंतन करता येते याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जणू आदर्श वस्तूपाठ समोर ठेवलेला आहे. तितके बहू आयामी नाही पण आपल्या नजरेच्या छोट्या टापूतील दृष्य ललित लेखाच्या अंगाने मांडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करता आला.
              हे लेख लिहीत असतांना अनेक विषय सोबत घेऊन गाव अनेक रूपांनी समोर यायला लागले. गावा बद्दल मी प्रथमच व्यक्त होत होतो असे मुळीच नव्हते. माझ्या एकुणच लिखाणात गाव मध्यवर्ती आहे. या आधी 'तर्ऱ्होळीचं पाणी'चा अनुभव होताच.मात्र आता नवीन काय लिहीणार हा देखील प्रश्नच होता.
दोन दिवसात गावाने मला बऱ्याच ढुशा दिल्या. त्याचा परिणाम म्हणून अनेक आठवणी, प्रसंग, प्रश्न यांची प्रवाही मालिकाच समोर आली. गावासंबंधीच्या विचाराचा दुसरा पापुद्रा हळूचपणे मला छिलून काढता आला हेच खरे! 'गाव :उब आणि धग' च्या निमित्ताने मी माझ्यात रूतलेल्या गावाची पाळेमुळे पुन्हा एकवार चाचपून पाहू शकलो हे नक्की! व ज्यांच्यात अजून गाव मातीची उब आणि धग कायम आहे त्यांना ही लेखमाला गाव वाटेसारखी वाटत राहीली. 
~~~


~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~
                 डाॅ. कैलास दौंड
                  मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि.अहमदनगर पीन ४१४१०२ मो. ९८५०६०८६११

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर