गाव : उब आणि धग भाग ९


  गाव : उब आणि धग (९)

□ पंखावर त्यांनी , झेलले आभाळ!
                         डॉ. कैलास दौंड

     "पंखावर त्यांनी, झेलले आभाळ
      मिळविले बळ, पोटासाठी."
पाव शतकापूर्वी बर्‍यापैकी समृद्ध भासणारा गाव आता तिथल्या माणसांच्या गरजाही नाही भागवू शकत. तसं हे चित्र एकदम पालटलेलं आहे असं नाही. नव्वदच्या दशकापासून दिसामासानं हे बदल नजरेत भरायला लागलेत. किमान पोटाची खळगी भरावी एवढ्याचसाठी गाव सोडून इथे तिथे भटकण्याची वेळ अनेकांवर आलीय. थोडीशीच असलेली जमीन; सिंचनाच्या सोईचा अभाव आणि कुठे विहीर वगैरे असलेच तर विजेच्या नावानं आणि उन्हाळ्यात पाण्याच्या नावानं ठणाणा ऽऽऽ! असा ' ठणाणा पोरा ऽऽ ठणाणा ऽऽऽ' चा खेळ झाल्यानंतर आपलं चंबूगबाळ डोक्यावर घेऊन गावाबाहेर पडावं लागल्यास नवल ते काय?
        पावसाचं पाणी साचावं यासाठी जागोजाग खड्डे खणले गेलेत पण पर्यावरणीय बदल, हवामान बदल आणि बेलगाम बेफिकीरीने केली जाणारी वृक्षतोड यामुळे पाऊसमान घटतय. खोदलेल्या खड्ड्यात साचायला पाऊसच येईनासा झालाय. निसर्गाकडून काही घ्यायचे म्हटले की माणूस अधाशी आणि अधीर होतो पण त्याच्या संवेदना निसर्गासाठी काही करण्यासाठी नेमक्याच बधीर होतात. हे सलणारं दु:ख पोटासाठी दुन्यादेश हिंडणाऱ्या माणसाइतकच आहे. हेही खरचं.
      आपला जीव जगविण्यासाठी बदलत्या ॠतूमानाशी जुळवून घेण्यासाठी पक्षी हजारो मैलाचे स्थलांतर करतात. त्यांच्यात नैसर्गिकरीत्याच तशी उर्मी निर्माण होते. आज राष्ट्राराष्ट्रातील संबंध कसेही असले तरी उडणाऱ्या पक्ष्यांसाठी सर्व सीमा खुल्याच आहेत. दरवर्षी त्यांच्या स्थलांतराच्या काळात कितीतरी पक्षी आपले प्राण गमावतात. तरी उरलेले पक्षी आपले स्थलांतर सुरूच ठेवतात.  एकुणच जीवसृष्टीतील प्रत्येक जीव आपल्याला जगता यावं यासाठी धडपड करतो. जीव जगविण्यासाठी भोवतीचं वातावरण आपल्याला सुसह्य होईल अशा पर्यावरणात ते निघून जातात.
     गावचा माणूस देखील गावात आपलं जगणं काही नीट होत नाही याची खात्री पटली की मग गाव सोडून इतरत्र जाण्याचा विचार करतो. अशावेळी खरे तर तो अत्यंत अगतिक आणि हतबल झालेलाही असतो. गावातच आपल्याला व आपल्या लेकराबाळांना जगता यावं अशी परिस्थिती त्याला काही केल्या  निर्माण करता येत नाही. तशातच एक पर्याय म्हणून आधीच्या कैक पिढ्या ज्या गावात वाढलेल्या, नांदलेल्या असतात त्या गावातून काही काळापुरते का होईना स्थलांतर करण्यासाठी तो निघतो. गाव हा त्याचा नैसर्गिक अधिवास सोडताना त्याला गलबलून येते. तिथल्या चराचर वस्तू त्याला हळव्या करतात आणि या ठिकाणी आपण आपल्या घरादाराला जगवू शकत नाहीत या जाणिवेने माणूस कमालीचा अस्वस्थ होतो. अशा स्थितीत जेव्हा मागे फिरणे शक्यच नसते अशावेळी माणूस सक्तीने पुढे जातो.
      गावचा माणूस आणि पक्षी यांच्यात काही एक साम्य असल्याचं माझं मन मला सततच बजावत राहतं.संचयी वृत्ती बद्दल देखील साम्य आहे. पक्षी कधी आपल्या अन्नाचा संचय करत नाहीत. माझ्या गावच्या माणसाला त्याच्या किमान गरजा भागून जास्तीचं असं काही मिळतच नाही. म्हणून नाविलाजास्तव का होईना आलेली असंचयी वृत्ती यामुळे घडोघडी करावा लागणारा अभावांचा सामना आणि गरजांचा हिरमोड त्याची इतरांच्या बद्दलची संवेदना जागी ठेवतो. त्याखेरीज स्थलांतर हा पक्ष्यांचा स्थायीभाव आहे. ते कधीच माणसांसारखे वर्षानुवर्षे एकाच जागेवर स्थायिक होत नाहीत. माझ्या गावचा कष्टकरी माणूसही पक्ष्यासारखाच स्थलांतरित  होत चाललाय ही खूप दु:खदायक घटना आतुन अंतःकरणाला जखमी करते. एका निर्वाणीच्या क्षणी आता आपण आपला जीव वाचवूच शकणार नाहीत  अशी मनाची अवस्था होताच तो शेवटचा पर्याय म्हणून स्वतःसह कुटुंबाच्या उरलेल्या आयुष्याचा सौदा मांडून आणि त्याची उचल घेऊन स्थलांतराचे मनसुबे रचतो. जिथे पोट भरेल तेच आपले गाव अशी मनाची समजुत काढतो. ऊसमळे, वीटभट्ट्या, खाणी, बांधकामे इत्यादी ठिकाणी अशी माणसे आपलं जगणं शोधतात.
       एकेकाळी आपल्या शेतातील वाकड्या दिंडीची कणसे खुडून ती मंदिरात मुद्दामच पाखरांसाठी अडकवणारी माणसेच आता दाणापाण्यासाठी घराबाहेर आणि गावाबाहेर पडलीत. काहीतरी हातातून निसटून गेल्याची जाणीव आतुन पोखरून टाकते. १९७२ दुष्काळाने स्थलांतर शिकवले. माणसांनी स्वतःच्या कुटुंबासह कृषिव्यवस्थेचा भाग असणाऱ्या गुराढोरांना देखील जगवण्याचा यावेळी प्रयत्न केला. मरणाला रात आडी म्हणत अर्धपोटी, उपासपोटी दिवस रेटले. नंतरच्या काळात कुठल्यातरी ठेकेदारांकडून, मुकादमाकडून आगाऊ मजुरी जिला 'उचल' म्हणतात ती घ्यायची. चुली पेटवायच्या आणि कामाला निघण्याची तयारी करायची. थोड्याबहू सामानाची बांधाबांध करायची. आवश्यक ती अवजारे सोबत घ्यायची, चिल्लीपिल्ली पाठंगुळीला बांधायची आणि एका निर्णायक क्षणी सौदा करून ठेवलेल्या आपल्या शरीराला आणि मनाला घराबाहेर ओढायचं. रिकाम्या घराला मनामनाचं एकुलतं कुलूप लावायचं. शेजारी राहणाऱ्या कुणी माणसानं पाहिलच तर डोळ्यात पाणी आणायचं. शक्य झालं तर आवंढा गिळायचा. आपले कढ आतल्या आत रिचवायचे. न्यायला आलेल्या ठेकेदाराच्या ट्रकमध्ये जनावरासारखे दाटीवाटीने बसायचे. ट्रक सुरू होऊन गावाच्या बाहेर पडू लागला की गावातल्या मंदिराकडे तोंड फिरवून हात जोडायचे. दैवताने आपल्याला 'तथास्तू' म्हटलयं असं समजून गावापासून दूर जात असतांना नजरेआड होईस्तोवर गावाकडे पाठमोरं पहात बसायचं. माणसाला ही जी जगण्याची उर्मी लाभलेली असते ते त्याचे मोठे सामर्थ्य असते. त्यातही माणूस भरपूर स्वार्थी आणि मतलबी असला तरी आपली चिल्लीपिल्ली जगावीत, कुटूंब जगावं  यासाठी ओढाताण करत तो आपले दिवस पुढे रेटत  राहत असतो. जिथे माणसांनाच गावात धान्य मिळणे दुरापास्त तिथे पाखरांना दाणे भरणारा माणूस नजरेसमोर केवळ कल्पनेनेच आणावा लागतो. पक्षी आकाशात अन्नाच्या शोधात भोवंडत उडताहेत आणि खाली माणसे हताश फिरताहेत असं हे चित्र. कुणी कुणाच्या भुकेची बेरीज आणि वजाबाकी करायची?
        आधीच्या दिवसात गावाला लाभलेला निसर्ग, तिथला परिसर, कष्टाळू माणसं, जवळ असणारे पशुधन यामुळे माणूस समाधानी होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. अशी स्थिती होती. कोणत्याही प्रकारचं समाधान हे मुळाशी जाऊन पाह्यलं तर सुखं -दुःख यांची एकत्रित तडजोड असते. चराऊ डोंगररानं असल्यानं देशी वाणाच्या गायी, बैल, शेळ्या क्वचित मेंढ्या बहुतेकांकडे असायच्या. विकण्या इतपत दुध कुणाजवळ नसायचं पण स्वतःच्या कुटूंबाला पुरेल किंवा किमान गरज भागेल एवढं दुध तर सगळ्याकडेच असायचं. वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी चराऊ डोंगर 'राखीव जागा ' झाल्यानं आपसूकच पशुधन संपलं. बाजारात नेऊन खपवावं लागलं. वर्षभर खात्रीची पाण्याची सोय नसल्यानं संकरित गाईंचे पालन करता येईनासे झाले. त्यामुळे घरखर्चाला असणारा एक आधार आपसूकच गावकर्‍यांच्या हातातून निघून गेलाय.
        गावच्या कोरडवाहू बरड रानात पाऊस पडला की शेतकरी मटकी, हुलगे, चवळी, तुर अशी कडधान्ये पेरीत असत. केणा आणि कोंबडा गवत मुबलक वाढणाऱ्या या रानाची मशागत करून पावसाच्या पाण्यावरच त्याला लागेल असं कडधान्य माणूसशपिकवत होता. क्वचित काही जास्त जमीन असणाऱ्यांकडे तर हावरी, कारळे, मटकी असे वाण विकायला सुद्धा असत. पावसाचा लहरीपणा आणि वाढणारी महागाई, प्रस्थापित व्यवस्थेची शेतकऱ्यांना लुटण्याची प्रवृत्ती;  खेडी नासवण्यासाठी व तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती संपवण्यासाठी ज्याचे त्याचे 'खेड्याकडे चला ' धोरण; त्यामुळे कोरडवाहू खेडी उध्वस्त झालीत. माणसांचा नैसर्गिक परिवेश बदललाय. अल्पभू आणि भूमीहीनांनी तर गाव कधीच सोडलाय. नोकरी किंवा जोडधंदा असल्याशिवाय माणूस गावात राहायचा म्हटला तरी राहणे कठीण.  खूप हळहळ, खूप तळमळ कुठे -कुठे गावातल्या माणसांनीच गावाचं रूप बदलवल्याची खूप चांगली उदाहरणं अधुन मधुन चर्चेत येतात.
          इथला माणूस मात्र त्याला कोणी दिशादर्शक न मिळाल्याने आपल्या पंखावर आभाळ झेलत आपल्या कुटुंबासाठी बळ धुंडायला निघाला आहे. ...आणि जातांनाही गावाच्या पांढरीला हात जोडून पुन्हा कधीतरी गावात परतण्याची आस धरून!
           गाव सोडलं की सोबतीला उरतात त्या 'गाव आठवणी'. कधी वेळ गवसला की त्या वर मान काढतात आणि स्मरणरंजनाचे खेळ मांडतात. बर्‍या - वाईट आठवणींचा वारा पिंगा घालायला लागतो. पूर्वीची सुबत्ता अभावात बदलत गेल्याच्या आठवणीची अस्वस्थता  जीवाला बोचत राहते.
        ' कणंगी खपल्या, ओस झाले कोणे
        पोत्याच्या बुडाशी, सापडेना दाणे.'
      अशी स्थिती असली तरी भरल्या दिवसाच्या आठवणी हटकुन मनाच्या वळचणीला आल्याशिवाय राहत नाहीत.
      उन्हाळ्याच्या दिवसात आलेले कैकाडी गावात महिना महिना राहत असत. गावाच्या पांदी आणि नदी, ओढ्याकाठच्या शिवारातून फिरून सिंदाडी, रबरवेल, घाणेरी, निर्गुडी यांचे फोक कोयतीने तोडून, साळुन दुपारच्या आधी त्यांचा लवाजमा गावातल्या लिंबाखाली जमायचा, न्याहऱ्या झाल्या की मग त्यांचं काम सुरू होई. काड्यात काड्या गुंफून आवळून आणि आपलं कौशल्य पणाला लावून डालगे, पाट्या, टोपले , कणंगी यांच्या विणकामाला सुरूवात होई. पाट्या, डालगे यांचा रानात कणसे, शेंगा, मातेरे ठेवायला उपयोग होई तर झापाचा उपयोग अशाच कामासाठी आणि शेळ्या मेंढयांची करडे-कोकरे कुत्र्या मांजरांनी ओढू नयेत म्हणुन डालुन ठेवण्यासाठी व्हायचा.
      याचवेळी गावातला एकेक शेतकरी कणंगी लवकर तयार करण्याची हुटहुट लावायचा. हातातली कामं सरत नव्हती आणि गरजू माणूस दम पडू देत नव्हता. दिवस डोक्यावर येत. रानातली कामं ढिली पडलेली असत. उन्हांनी जोर पकडलेला असे. दुपारच्याला कैकाड्याच्या पालावर चार-सहा माणसं हमखास बसलेली दिसायची. शेता-शिवारातून मोठ्या कष्टाने आणलेला फोकांचा भारा डोळ्यादेखत हळूहळू विणकामाने कणंगीत किंवा डालग्यात रूपांतरीत व्हायचा. दुसर्‍या दिवशी सकाळीच या तयार केलेल्या वस्तू विकून पुन्हा फोकांच्या शोधात ही कष्टकरी मंडळी निघायची.
          बाजरीच्या काढणीच्या दिवसात बर्‍याचदा पावसाने जोर धरलेला असायचा. एरव्ही वाट पाहुन आणि विनवण्या, आर्जवे करूनही न कोसळणारा पाऊस बाजरीचे खळे लावले की हटकुला व्हायचा. आभाळाला काळोखी चढायची आणि पिकवलेलं पीक घरात कसं न्यायचं याची धास्ती माणसाला पडायची. घरं तरी कुठं ऐसपैस होती म्हणा! त्यामुळं धान्य साठवायला उभट कणंगीचा मोठा आधार वाटायचा. गाईच्या हिरव्यागार शेणाने सारवलेल्या असल्यामुळे कणंगी आतुन बाहेरून हवाबंद व्हायच्या. पावसाचा डोळा चुकवून मळणी, उफणणी केली की धान्य घरातल्या कणंगीत गोळा व्हायचं. किती धान्य पिकून घरात आलयं यावरून निघणाऱ्या दिवसाचं गणित व्हायचं. उन्हाळ्याच्या सुरूवातीला देखील अशीच घाई असायची. रानात कुठं कुठं पळस - पांगिरा यांचा लालभडक रंग शिवाराला खुणावयाला लागायला आणि जोंधळ्याची काढणी सुरू व्हायला एकच व्हायचे.
      " साळू तिथं म्हाळू, साळू तिथं म्हाळू
       चंद्रभागा तुझं पाणी, नेवाशाची वाळू "
भलर्‍यांचे सुर रानावनात घुमायचे. तळहाताला आलेल्या फोडाने हात हुळहुळे व्हायचे. पात पुढे सरकायची आणि पाठीमागे आळाशांची धुडं आडवी पडून राह्यची. त्यांची बांधणी व्हायची. पाचुंदे पडायचे. खळंवाडीत चार-दोन दिवसांनी गाड वाहणीला जोर यायचा. आपापल्या वकुबानं गाडीवान हेल रचायचा आणि बैलांची दमछाक होईस्तोवर त्यांना पळवून दमवत रहायचा. रानात वारं गोल गोल फिरायचे. त्याच्या वावटळी व्हायच्या. रानात पडलेल्या पेंढ्यांचा पाचोळा त्या वार्‍याच्या चक्रासोबतीनं भोवंडत शेतकर्‍याच्या स्वप्नासारखा आभाळात उंच उंच जायचा. खूप खूप उंच आणि चक्राकार जाणारा पाचोळा पुन्हा एखाद्या झाडाला, घराला नाहीतर गंजीला सोबतीला घेत आपल्या सोबत फुगडी खेळायला लावायचा. कधी मातीशी पाचोळा सलगी करायचा तर कधी वाऱ्याची हलगी वाजवायचा. घराजवळच्या वाडग्यात ज्वारीची मोडणी सुरू व्हायची. पिवळट पांढऱ्या कणसाचा ढिग खळ्यात जमा व्हायला लागायचा. उधाणल्या उन्हाची बाधा होऊ नये म्हणून कणसे खुडलेल्या तीन चार पेंढ्या एकमेकीच्या आधारानं उभ्या करून डोके झाकेल एवढूशी सावली करून बाया कणसे मोडायला सुरूवात करीत. मोडणी झाली की मग मळणी, उफणणी होऊन धान्याची रास खळ्यात गोळा केली जाई. धान्याची वाट पाहत असलेल्या रिकाम्या कणंगीत धान्य टाकले जायचे. सालभराची बेगमी सुरक्षित राखली जायची. मुठपसा मातेरे धुंडून चिमण्या, साळूंक्या आपली भूक भागवायच्या. ज्याच्या घरात सालभराची बेगमी तो गावात प्रतिष्ठीत अशी स्थिती होती. जो अडल्या -नडल्या लोकांची धान्याची गरज भागवील तो श्रीमंत मनाचा असं माणसं मानायची. ही आत्ता आत्ताची अगदी कालपरवाची गोष्ट. जुनी कणिंग(कणंगी) मोडकळीस आली तरी नवीन घेतल्या शिवाय ती मोडून टाकायची सोय नव्हती.
            कणंगीची जागा पोत्यांनी घेऊन बरेच दिवस झालेत. तसतशा कणंगी दिसेनाशा झाल्यात. पैसा हवा म्हणून नगदी पिकांनी शेतकऱ्यांना भुरळ घातलीय. त्यातून बागायतीत ऊस आणि जिरायतीत कापूस या पिकांनी जोर धरला. आपली गरज भागेल एवढेच धान्य पेरायचे किंवा एखाद्या वर्षी लागणारे सर्वच धान्य विकत घ्यायची तयारी ठेवायची. अशी व्यवहारी वृत्ती वाढीस लागल्याने कणंगी भरतील एवढे धान्य गावात कोणाकडे सापडेल अशी खात्री नाही. खळे काढायचे तर चार-दोन पोती आणून ठेवायची किंवा चाळीस -पन्नास किलोचे धान्य बसेल अशा गोण्या आणून ठेवायच्या. उपनेर सारख्या यंत्रामुळे तासा-दीड तासात खळे संपतात. मोठ्यात मोठा शेतकरीही कधीतरी तालुक्याला मोंढ्यावर गहू नाहीतर ज्वारीची खरेदी करतांना दिसतो. पूर्वी धान्याची उपलब्धता पाहून पोरांच्या सोयरीकी होत असत. आज चित्र पालटले आहे.
       मुलभूत गरजांपेक्षा इतरच भौतिक साधनांची रेलचेल माणसांना खुणावते आहे. जागतिकीकरणाचे लोण माझ्या गावाच्या अंगाखांद्यावर खेळू लागलेले आहे. अगदी इथल्या गरीब माणसांची प्रेतेही जागतिकीकरणाचे गुळगुळीत टायर पेटवल्या खेरीज पेट धरीत नाहीत. घराच्या कोनाड्यात पूर्वी दिसणार्‍या  औताचे एठण, कासरे, मुसके , चाडे, ओटी या गोष्टी आता दिसण्याची शक्यता नसते. कोनाड्यात टी.व्ही किंवा दिवाण नाहीतर शोकेस असते. तिथली गजबज अगदीच सामसूम झालेली दिसते. धान्य साठवण्याच्या पध्दती बदलून गेल्यात आणि धान्याची उपलब्धता फसवी झाली आहे. त्यामुळे रेशनवर भेटणारा गहू अचानक मऊ आणि योग्यतेचा वाटू लागलेला आहे. एखाद्या पिकाच्या हंगामाची आसुसून वाट पहावी तशी लोक रेशन कधी येतय याची वाट पाहतात. आपल्याला धान्य कोठून मिळते? असे विचारले तर, ही सद्ध्याची पिढी 'रेशनमधून' असे उत्तर देण्याचीच शक्यता अधिक!
    शेतकर्‍याच्या अशा धोरणामुळे अन्नधान्याला निश्चितच भाव मिळेल. अन्नधान्याची मागणी वाढेल आणि त्याची उपलब्धता कमी राहील. सहाजिकच शेतीत पिकवलेल्या अल्प-स्वल्प धान्याच्या किंमती वाढू लागतील पण अशा वाढलेल्या किंमतीत शेतकर्‍यांनाच धान्य खरेदी करायला लागू नये यासाठी गावातल्या लोकांनी सावध राहीले पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटूंबाला वर्षभर पुरेल इतके आणि थोडेफार विकायला सापडेल इतकुसे धान्य पिकवायला हवे. उगीचच जगाचा पोशिंदा होऊन खादाड-फुकटे जग पोसण्याचे पुण्य माथ्यावर मारून घेण्यापेक्षा जमेल तसा व्यवहार आणि पचेल तेवढी माणूसकी राखायला गावातल्या माणसांनी शिकले पाहिजे.
         दिसामासांनी येणारे बदल आता एवढे रूजलेत की ते बदल झालेत असे न वाटताच स्थिरावलेत. एखाद्याच्या घरात धान्याच्या पोत्यांची थप्पी दिसेल बाकी बहुतेकांच्या घराचे कोणे रिकामेच सापडतील. शिवाय धान्यासाठी म्हणून घरी ठेवलेल्या गोण्याही रिकाम्याच दिसतील. चिमणी तळतळून जाईल तरी धान्याचा दाणाही मिळणार नाही अशी अभागी आणि बेभरवशाची स्थिती नक्कीच आनंद देणारी नाही. कणंगी, झाप, टोपले, डालगे, कलवडू वगैरेचा वापर कमी. ..म्हणजे जवळपास बंदच झाल्यामुळे आजच्या काळात कैकाड्यांच्या पूर्वापार व्यवसाय मोडीत निघालाय. त्यांच्या पोटाची आग विझवण्यासाठी कोणकोणती कामे त्यांना करावी लागत असतील? अवर्षणाने आणि उपजीविकेचे सुसह्य साधन न सापडल्याचे स्थलांतरीत होणारे शेतकरी, शेतमजूर थंडी, ऊन, वारा सोसत कोणते कल्पना उपसत असतील? त्यांनी पंखावर पेललेल्या आभाळाचा भार खरेच त्यांना पेलवत असेल का? इथे आकाशातून पडणारा आणि धोरणांचा पाऊस एकाच वेळी बरसायला हवा आणि माणसांनी चातकचोचींनी तो झेलायला हवा. शिक्षणाने माणूस शहाणा होतो म्हणतात. त्याला दूरचे पाहण्याची नजर येते म्हणतात. आता तरी समोर अभावांचा बाजार भरलेला दिसतोय. दळण आणण्यासाठी गोणी चाचपावी व तिच्यात पुरेसे धान्यच नसावे. ...!
      =============

       डाॅ. कैलास दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि.अहमदनगर
        9850608611


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर