गाव : ऊब आणि धग भाग १०


□ कुणाच्या भल्यासाठी, शेतकरी मेळे! (१०)
                             डॉ. कैलास दौंड

         एके दिवशी सकाळी- सकाळी एक भोंगा बांधलेली जीप गाडी गावात येते. तालुक्याच्या शहराजवळील  गावात दुसर्‍या दिवशी शेतकरी मेळावा भरणार असतो. कोणातरी मोठ्या नेत्याचाही त्यादिवशी या भागात दौरा असतो व तो नेता देखील या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याचे जीपमधील कुणीतरी माईकवरून सांगत होता. मला वाटले खरेच शेतकर्‍यांचे त्या त्या भागात वर्षातुन दोनतीन वेळा उद्बोधन झाले पाहिजे. कृषीशास्रज्ञ आणि शेतकरी यांच्या जोडीला प्रशासनातील अधिकारी यांच्यात कुठेतरी समन्वय असायला हवा. शेतीतल्या समस्येवर आधारीत संशोधन व्हायला हवे. उत्पादीत मालाला विकण्याची व्यवस्था आणि योग्य किंमत मिळवण्याची व्यवस्था अशा समन्वयाने होऊ शकते. बराचवेळ शेतकरी मेळाव्याची भुणभुण वाजवून  ती जीप निघून गेली.
          दुसर्‍या दिवशी सकाळी गावात एक ट्रक आला. मेळाव्याला जाणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायला तो आला होता. गावातील एक दोन माणसे याला त्याला मेळाव्याला येण्यासाठी हाटकीत होते पण ट्रकमध्ये कोणीही बसत नव्हते. मला गंमत वाटली. गावातुन आता माणसे कुणाच्या लग्नालाही जायला फारशी इच्छुक नसतात. हा तर मेळावा आहे. एव्हाना गावातील माणसांनाही कळून चुकले आहे की, 'कसला मेळावा अन् कसले काय?' केवळ येणाऱ्या नेत्यांच्या पुढे गर्दी जमवण्याचा स्थानिक नेत्यांचा हा नेहमीच घडणारा उद्योग आहे. इथे शेतकऱ्यांच्या हिताच्या चार गोष्टी सांगितल्या जातील याची खात्री नाही. उलट कसल्यातरी वल्गना ऐकायला भेटण्याची शक्यता अधिक. त्यासाठी उन्हे डोक्यावर घेऊन आणि शेतातील काम किंवा रोजगार बुडवून जायला गावातला माणूस तयार नाही. बऱ्याच आग्रहानंतर वीस पंचवीस माणसे या घटनेकडे रोजगाराची संधी म्हणून पाहतात व गाडीमध्ये बसण्याचा आग्रह करणार्‍या गाव पुढाऱ्याला विचारतात की, ' आमची काही सोय केलेली आहे का? 'यावर तो सांगतोकी, 'शंभर रूपये रोज आणि एकदा जेवणाची व्यवस्था केलेली आहे.' माणसं ट्रकमध्ये बसतात. फुपाटा उडतो. ..गाडी निघते. ...उरलेली माणसं पांगतात.
      ' ऊभे पीक धाराशायी । मातीमधी लोळे
कुणाच्या भल्यासाठी । शेतकरी मेळे. '
       पावसाने झोडले आणि राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची? अशी गावात म्हण आहे. दुर्दैवाने गावातील माणसाला हे दोन्ही प्रकारचे मार खावे लागतात. निसर्गाच्या लहरीपुढे तर जगातील सर्व मानवच हतबल आहेत आणि निसर्गाच्या दातृत्वाबद्दल ते कृतज्ञ देखील आहेत. निसर्ग जेव्हा अगदीच भरभरून देतो आणि द्यायचा थांबेनासा होतो. तेव्हा ते सगळेच घेणे त्याला शक्य नसते. त्यामुळे माणूस ऐन भरातल्या पिकाला गारपिटीने बदाडावे तसा तो मोडून पडतो. अशा उन, पावसाच्या झेलण्याने मोडून पडलेल्या माणसाला एक दुसर्‍याच्या मदतीच्या हाताची गरज असते. या काळात तो हतबल होऊन नेते, पुढारी अन् सरकार यांच्याकडे फार आशेने पाहतो पण त्यातून मोडून पडलेल्या माणसाला बळ मिळतेच असे नाही.
     खरेच असे शेतकरी मेळावे कितीही भरले तरी शेतकऱ्यांचे जीवन बदलणार आहे का? कुणीही उठावे आणि शेतकर्‍याला भुलवावे, फसवावे, जमल्यास त्याचा गैरफायदा घ्यावा आणि हे सतत वर्षानुवर्षे पिढ्यान् पिढ्या करता यावे यासाठी त्याला आडवत नाडवत राहावे ; अगतिक बनवत राहावे. असे हे दुष्टचक्र सतत सुरू ठेवावे आणि आपमतलबाचे पीक काढीत राहावे असा हा भूलभुलैया!
       शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न मेळाव्यात चर्चिले जातात? कोणत्या समस्येवर कायम स्वरूपी किंवा दीर्घकालीन उपाय सुचविला जातो? सार्‍या प्रश्नांची उत्तरे अत्यंत निराशाजनक मिळतात. कृषिविद्यापिठांकडून भरणारे मेळावे निश्चितच शेतकऱ्यांना दिशा देऊ शकतात. पण मेळावा आणि वापरून घेणे असे समीकरण सततच्या अनुभवातून पक्के होते असल्याने तज्ज्ञांचे मार्गदर्शन होऊ शकेल अशा मेळाव्यालाही शेतकरी जायला धजत नाहीत. इतर मेळाव्याची जशी 'सोय' केलेली असते तशी सोयही या मेळाव्यात नसते. स्थानिक पुढारी, नेते, सामाजिक म्हणवून घेणारे कार्यकर्ते यांची कृषिविद्यापिठांकडून आयोजित केलेल्या मेळाव्याबाबद काहीही भूमिका नसते.
           यामुळे माझ्या गावातला शेतकरी शेतीसाठी स्वानुभव आणि शेजाऱ्या- पाजार्‍यांचा विश्वासू अनुभव यावरच अधिकाधिक अवलंबून राहतो. या शिदोरीवरच आपापल्या वकुबानुसार शेती करीत राहतो. दरवर्षी पेरणी - लावणीच्या हंगामात खते व बियाणे यासाठी शेतकऱ्यांना कात्रीत पकडून अडवणूक केली जाते. अतिरिक्त पैसे त्यांच्याकडून घेतले जातात. ज्या बियाण्याचा आधिच्या वर्षीचा अनुभव चांगला असतो ते बियाणे पाऊस पडताच दुकानातून गायब होते. दोन -तीन दिवस गेल्यावर दिड पट, दुप्पट किंमत दिल्यास त्याच दुकानातून ते  मिळते. पावती मात्र रास्त भावाची असते. तिच गत खतांचीही असते. एकीकडे खत टंचाई तर दुसरीकडे काळाबाजार! शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या किती या सुल्तानी तर्‍हा तरी शेतमालाच्या आधारभूत किंमती निचतम पातळीवर! हे जादा दिलेले पैसे उत्पादन खर्चात शेतकर्‍याखेरीज कुणी धरतच नाही. असा हा दैवाचा दूर्विलास! शेतीमालाला थोडाफार योग्य भाव मिळू लागला की त्याच वेळी बाजारात आयातीचा माल येऊन किंमती कमी होतील असे नियोजन केलेले असते. निवडणुकीच्या तोंडावर विविध घोषणा करून मनात स्वप्न पेरायची अन् पुढे या स्वप्नावर नांगर फिरवणे देखील सवयीचेच.
         शेतकरी अगदी शेतीला सुरूवात केल्याच्या काळापासूनच निसर्गाच्या मर्जीवरच आहे. या आस्मानिची त्याला सवय आहे. वारंवार पडणार्‍या दुष्काळाने त्याला बरच काही शिकवले आहे. दुष्काळानंतरचा पावसाळा खूप चांगला असतो हे त्याला अनुभवाने माहिती आहे. निसर्गातल्या दुष्काळा विषयी असलेले त्याचे मत सामाजिक दुष्काळाच्या बाबतीत खरे ठरत नाही. उलट तेथे तर सतत दुष्काळ वाढत आहे. कधीमधी पडणार्‍या बखाडा पेक्षा हा दुष्काळ भयावह आहे.
          दोन वर्षांपूर्वी सुरूवातीला पाऊस अगदीच वेळेवर आणि पुरेसा आला. वाफसा होताच शेतात कपाशीची लागवड आणि रब्बीचे  धान पेरायला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. निसर्गाकडून मिळालेल्या छोट्या सुखानेही शेतकरी बियाणे - खते खरेदीचे, लुटमारीचे दुःख विसरतो. पाऊसपाणी ठिक होऊन पिके जोमाने वाढू लागली, कापसासारख्या पिकांवर महागडी औषधे फवारली अन् वेचणीच्या काळात पावसानं जोर धरला;  सतत पडणार्‍या पावसाने जमीन सादाळून उभी पीकं धाराशायी होऊ लागली . केलेला खर्च ,मेहनत वाया जाते  असे वाटून शेतकरी हताश होऊन बसतात. बदलत्या काळात माणसांनी आपले रंग बदलले, शेतकऱ्यांकडे फसवता येण्याजोगा माणूस म्हणून पाहीले जाऊ लागले. यंत्रणा त्याला पिळवत राहील्या, अधूनमधून निसर्गही त्याचा चाप आवळत राहीला. या विचारानं दिवसभरासाठी अस्वस्थता बाळगून होतो. पाच वाजण्याच्या सुमारास गावात पुन्हा ट्रक आला. हॉर्न वाजला, मलुल चेहर्‍याची माणसं उतरली . गावातल्या कुणालाही त्यांच्याशी बोलावे वाटले नाही. उतरलेली माणसं खालमानेने  आपापल्या घराकडे निघून गेली.
          शेतकरी एवढा का स्वस्त झाला आहे? इतका का अगतिक झाला आहे? शेतकरी मेळे कुणाच्या भल्यासाठी? कुणाच्या उमेदवारीसाठी? आता शेतकरी मेळाव्याच्या जोडीला महिला मेळावे आणि रोग निदान शिबिरे आली आहेत. स्वतःच्या शोषणाच्या तर्‍हांचा विसर पडून ' आपुले मरण पाहिले म्या डोळा ' उक्तीप्रमाणे तेथे जाऊन मेळाव्याला सुख सोहळा समजायचे का? मी मनात अस्वस्थता रिचवत निशब्द होतो.
            गाव सुखाच्या शोधात आहे.एकुणच माणूस सुखाचा पाठलाग करतो आहे. गावात सुधारणा व्हावी यासाठी योजनांची आखणी केली जाते. घरकुल, शौचालय, डोल, पीकविमा, सिंगलफेज, रस्ते, रोजगार हमी, दारिद्र्यरेषा कार्ड, जनधन एक ना अनेक योजना आल्यात. तरी गावकरी व्हायला पाहिजे तितका सुखी  दिसत नाही.
     ' एक एक सुधारणा । भोवळते गावकुशी
अरे शेतकरी राजा । तुझी तुच शोध खुशी'
     गावात स्वातंत्र्याच्या नंतर काही सुधारणा आपोआप आल्या. समतेचे  वारे गावात घोंगावल्याने  माणसे खरेच सुखी होतील. त्यांच्या वाट्याला समाधानाचे चार दिवस येतील. समता आणि स्वातंत्र्य गावाच्या वेशीत हातात हात घालून फिरेल अशी दिवास्वप्न या बदलांनी कोणी बघीतली असल्यास नवल नाही. पिढ्यान् पार गावातली माणसे निसर्गाच्या कुशीत आपल्या गरजांचा संकोच करीत दारिद्र्याशी दोन हात करीत छोटी छोटी सुखे मनोभावे वेचित राहिली. आपल्या वाट्याला आलेल्या जगण्याचा दोष त्यांनी कुणाला दिला नाही. पाऊसपाण्याची वाट पाहणे, इमाने इतबारे कष्ट करणे, आपले जगणे पुढे रेटीत राहणे आणि त्यातून आनंदाचे क्षण गोळा करणे  हा त्यांचा नित्यक्रम. त्यासाठी जत्रा यात्रा सण -वार, त्यातील रिती रिवाज पार पाडले जात. परिसरातील लिंब, बोर यांच्या आढ्या - वाशांनी आणि मेढिंनी उभारलेली सपरं ही तर खेड्यांची जणू खास ओळख होती. पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची तर सवयच झालेली होती. दारीद्र्याच्या दशावताराची वेशभूषा पाहिलेल्या माणसांना पोटासाठी गाव सोडून दुण्यादेशाला जाण्याचेही काही फार अप्रूप नव्हते. माणसे माणसावर जीव टाकून होती. केवळ गावचा माणूस एवढ्याच नात्याने माणूस दुसर्‍यासाठी हळवा व्हायचा. मग आता आलेल्या सुधारणा आणि त्यासाठी आलेला पैसा यामुळे विश्वासाची नदी स्वार्थाच्या चिखलाने गढूळली आहे. फार क्वचितच त्यातून नितळ पाणी वाहत असल्याचे दिसते. सरकारी सुधारणांनी गावाची भौतिकस्थिती सुधारल्याचा भास होईल पण गावकर्‍यांच्या मनाचे काय? त्यांची काय किंवा कुणाचीही काय मने तर निरलसतेच्या शोधात असतात. त्यासाठी त्यांना परंपरागत जीवनाचा त्याग करवत नाही आणि अगदी बेमालूमपणे कुत्र्याने घरात घुसून भाकरीच्या टोपल्याला तोंड लावावे असे बदलाचे वारे थेट जिथे तिथे शिरलेले. या बदलाने सुखावल्याच्या भ्रमात सापडून धास्तावलेला माणूस अंतिमतः समाधानासाठी देवभोळा होतांना दिसतो. याचा काय अर्थ घ्यायचा? एक दुसऱ्याला मदत करायची नाही. माणसातल्या माणसांना लाथाडायंचं, त्यांना पैशात मोजायचं आणि गावातल्या तथाकथित देवांना सभामंडप बांधायचे, त्यात 'पेड सर्व्हिस' निरुपणे ठेवायची त्यातून मिरवून घ्यायचे.  असा सार्वत्रिक हा जाहिर कार्यक्रम !
        गावाच्या सुधारणांवरून आठवले. शेताकडे जाणार्‍या पांद्या  (पाणंदा) आणि दोन्हीतर्फा शेरांच्या झुडूपांची ताटी. अंधाराची छायावट त्या वाटेवर ठाण मांडून बसलेली. त्या रस्त्यावरून अधून मधून छप्परांची उघडणारी दारं दुपारच्याला झोपाटा नावाच्या फाटकांनी बंद झालेली असत. पावसापाण्याच्या दिवसात आतुन बाहेरून ओलीचिंब होणारी आणि वादळवाऱ्याच्या दिवसात वाळ्हूटी बरोबर भोवळणारी ही सपरांची घरे आता गावात नाहीत. ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे पक्की घरे बांधलीत. काहींसाठी सुधारणेच्या धोरणानुसार 'घरकुल' योजना आली. गावातील गोरगरिबांना निवारा असावा; हक्काचे घर असावे , खरेच किती मंगलप्रद विचार! गावोगावी दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाची यादी या नव्या घरकुलाच्या प्रतिक्षेत तिष्ठू लागली. गावच्या मुखंडांना ग्रामविकासाची तळमळ वाटू लागली. त्यातूनच काही गावात चराऊ कुरणंच तयार झाली. घरकुलासाठी शिफारस करतांना आणि मंजूर रकमेचे धनादेश देतांना हाताकडे पाहिले जाऊ लागले. त्यात भर म्हणून की काय सरकारी योजनांतल्या घरकुलातूनही शौचालये दिसेनाशी झाली. नेहमीच सरकारी योजनांचे शेपूट खुडून घेण्यात फसवे लाभार्थी पुढे दिसतात.  दिवसेंदिवस त्यांना आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न वाढवत राहते. मात्र हे खरे की सर्वात गरजू लाभधारकाचा नंबर सर्वात शेवटी लागण्याचीच शक्यता अधिक असते. कारण गावात बरेच काही नविन येत असतांनाच काही चांगले निसटून जात होते. गावात सुबत्ता आल्याचा भास झाला पण माणसे मात्र दारिद्र्य रेषेखालील कार्ड मिळावे म्हणून प्रयत्न करू लागली. काही बोक्यांनी ती मिळवून गरिबांसाठीच्या योजनांवर आपल्या पोळ्या भाजवण्याचा उद्योग नॉनस्टिकपणे करून घेतला.
            असाच एकदा पाहुण्यांच्या गावी गेलो असतांनाचा प्रसंग. संध्याकाळी वारा शांत होता. झाडांची पालवी अजिबात हलत नव्हती. निरखून अंगणातल्या झाडाकडे पाहिले तर त्या झाडाला पालवीच नव्हती. घराच्या आसपास थोडा फेरफटका मारावा म्हणून उठलो. नदीपल्याड अनुदानातून फळबाग लावलेली होती. तिकडे तरी थोडा वाऱ्याचा स्पर्श अंगाला होईल वाटले पण समोर दिसले ते भयानकच दृष्य होते. एक रेडकू एकेक झाडं उपटून खात होते. जवळ गेल्यावर कळले की या झाडाला मूळ्याच नाहीत. एकदम खोडच उगवलयं. सद्ध्याच्या प्रगतीच्या काळात कोठे काय पहावयास मिळेल याचा नेमच नाही. वृक्ष लागवड करण्याऐवजी हुशार शेतकर्‍याने शाखा लागवड केलेली दिसत होती. वीज गेलेली असल्याने घरात काही खरे नव्हते.पंखा फिरायला वीज हवी होती. वीज नाही तर नीज नाही. अशी सगळी तारांबळ. थोड्याच वेळात वीज आली. गावातल्या खांबावरील विजेचे सार्वजनिक दिवे लागले. ज्यांच्या घरातील बल्ब लागले नाहीत ती मंडळी हातात बांबूची किंवा शेवरीची काठी घेऊन घराच्या बाहेर निघाली. ' लातों का भूत बातों को कहॉ मानता है ' असं म्हणून ती माणसे आता विजेच्या मागे लागतील असे वाटत असतांनाच त्यांनी सौम्य मार्ग पत्करला. आपापल्या घरातून येणाऱ्या वायरचा आकडा त्यांनी बांबूच्या मदतीने तारेवर डकवला आणि मग त्यांच्या घरात लख्ख प्रकाश चकाकला. क्षणभरच कारण त्यानंतर विज पुन्हा गायब झाली.
       गावातल्या रस्त्यांना तर भिकेचे डोहाळेच लागलेत जणू. दरसाल त्यावरचे लोणी खाण्याचा काहींचा प्रयत्न असतो. एखाद्या दुसर्‍याला त्याचा वास लागला तर तो तसाच धावत येऊन त्यात बोटे बुडवून चाटत बसतो. मग रस्त्याचे रडत बसणे ओघाने आलेच. ऊन पावसात रस्ता त्याच्यावरील धूळ झाडत राहतो. या गावात राह्यला आता हा रस्ता तयारही नाही. लोचट टग्यांनी त्याचे पुरते सिमेंट हरण केलेले. याच रस्त्याची सवय गावकर्‍यांना अंगवळणी पडली जणू.'चूप बैठो नही तो कान काटूंगा'  कुणी बोलायचेच नाही. या रस्त्यावरूनच चालत जरा दूरवर आलो.  मोकळ्या जागेत एक स्टँडपोष्ट होता. त्याला बसवलेले कॉक कधीच गायब झालेले होते. नाही म्हणायला अर्धा पाऊण फुट आकाराचा नळ दोन्ही बाजूला मोकळाच होता. त्याला खेटूनच एक कुत्रे बसलेले होते. एरवी तेथे कुणी बसत नाही पण कुत्री तेवढी बसलेली असतात. गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही हे समजण्यासाठी बहुधा ही नळयोजना गावाने अंगिकारली  नि मुखंडांनी मोडून खाल्ली. घरातल्या आया बहिणींचे शाप खाऊन सुद्धा ही निर्ढावलेली लोचट ढोरं अजून मेली नाहीत. गावात पाणीपुरवठ्याच्या विहीरी तीन! त्यातल्या दोन खाजगी मालकीच्या जागेत. म्हणजे त्या त्यांच्याच सोईने खोदून घेतलेल्या अन् तिसरीचे पाणी पिण्यास अयोग्य! दूरवर एका विहीरीत बादली ठेचाळल्याचा आवाज आला अन् भानावर येत मी घराकडे निघालो. तर रस्त्यात स्वस्त धान्य दुकानाचा दुकानदार गावातल्या खटारा झालेल्या जीप गाडीच्या ड्रायव्हरला गरीबांपासून लपवून ठेवलेले रॉकेल मोजून देत होता. ते दृष्य पाहून मी धन्य झालो ! कुठूनच गार हवा यायचं चिन्हं दिसेना.
        जुने गाव आठवले. सुधारणा नव्हत्या जवळपास. पुढे चालुन इतक्या सगळ्या सुधारणा होतील असे त्याकाळी कोणी सांगितले  असते तर त्याला वेडे समजून नक्कीच गावातल्या शहाण्या माणसांनी डागले असते. आज गावात किती किती सुधारणा आल्यात, नव्या नव्या योजना आल्यात. दहा - बारा तर इमारतीच झाल्यात. व्यायामशाळा, सभागृह, वीज, पाणी, रस्ते, घरकुले, शौचालये, कांदाचाळी, गांडूळखत प्रकल्प, पिक विमे एक ना अनेक. ..! नुसता सुळसुळाट आणि भरभराट. योजनांना पडलेली छिद्र देखील बुजवण्याचे लोकांच्या मनात येते. सार्वजनिक यंत्रणांचाही तसाच प्रयत्न असतो. जिकडे तिकडे आधार लिंक झाले आहे. माणूसपणासाठी सुधारणा हव्यातच...! माझे मन विषण्ण होऊन वाटेकडे डोळे लागतात.  गावावर आत्म्यापासून प्रेम करणारी माणसे कुठे परगावी गेलीत की काय असे वाटले सहजच. आज रात्री उशिराच्या गाडीने का होईना पण त्यांनी परतायला हवे. मी वाट पाहू लागतो.
*************************************************
                     डाॅ. कैलास दौंड
                   मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि.अहमदनगर पीन ४१४१०२
           kailasdaund@gmail.com
       9850608611
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर