अहमदनगरचे साहित्य : एक दृष्टीक्षेप
अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान '
डॉ. कैलास दौंड
○ पूर्वपिठिका: मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाषा आहे. या राज्याच्या लगतच्या भागातही या भाषेचा वापर केला जातो. जेथे जेथे मराठीचा वापर आहे त्या त्या भागातून मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीची अधिकतर शक्यता असते . कारण संवाद साधणे हा वाङ्मय निर्मितीचा प्रमुख हेतू असतो. 'अहमदनगर जिल्ह्याचे मराठी साहित्यातील योगदान 'या विषयाच्या अनुषंगाने विचार करतांना सर्वप्रथम या जिल्ह्याच्या विस्तृत भौगोलिक क्षेत्राकडे लक्ष वेधले जाते. अहमदनगर (शहराची) स्थापना इ.स. १४९४ साली झाली. त्याही पूर्वीची काही वर्षे हे ठिकाण राजकीय केंद्र होते. नंतर निजामशाहीचेही हे केंद्रच होते .म्हणजे येथे राजसत्ता होती आणि त्या आश्रयाने वाढणारे, राहणारे लेखक, कलावंत हे देखील असणारच. आजच्या अहमदनगर जिल्ह्याबद्द्ल बोलतांना या जिल्ह्य़ातील विस्तृत भूभाग आपले लक्ष वेधून घेतो. आजही महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून या जिल्ह्य़ाचा लौकिक आहे. राज्याच्या मध्यवर्ती असलेले स्थान हा आणखी दुसरा महत्त्वाचा विशेष! मुळा, प्रवरा, गोदावरी, कुकडी या नद्या, त्यामुळे दाट लोकवस्ती हा तिसरा विषेश. अर्थातच या सर्व मोठ्या पार्श्वभूमीवर येथून मराठी साहित्याला व्यापक आणि भरीव योगदान मिळाले असणार. आणखी महत्त्वाचे म्हणजे महानुभाव, वारकरी, शैव, वैष्णव, ख्रिस्ती, बौद्ध, जैन इत्यादी विभिन्न धर्म, पंथ, संप्रदायातील लोकांचा वावर आणि रहिवास यामुळे मोठे सामाजिक अभिसरण देखील येथे घडलेले आहे. वाङमय निर्मितीही झालेली आहे. या ठिकाणी 'मराठी साहित्यातील योगदान 'आपण जाणून घेत आहोत. त्यामुळे अन्य भाषेतील योगदान मांडण्यात आलेले नाही हे प्रकर्षाने ध्यानी घेणे क्रमप्राप्त आहे.
मराठीच्या आद्यग्रंथापैकी एक समजला जाणारा 'ज्ञानेश्वरी ' हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी सांगीतला (लिहीला)ते नेवासे अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठचे महत्वाचे ठिकाण आहे. सहजच त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे मराठी साहित्यातील योगदान समजून घेतांना ज्ञानेश्वर काळापर्यंत मागे जाणे सहजच शक्य होते. मराठीच्या जडणघडणीच्या काळातील महानुभाव पंथीयांच्या 'लीळाचरीत्र' सारख्या ग्रंथातील काही लीळांच्या संकलनांचाही अभिमानाने आणि गौरवाने उल्लेख करता येतो. अर्थात या ठिकाणी आपल्याला हेही नमूद केले पाहिजे की संत ज्ञानेश्वर आणि माहिमभट्ट हे केवळ सद्धयाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या भूभागापुरतेच मर्यादित नव्हते.
संत, पंत आणि तंत कविता देखील याच भूभागातून उगवून आली व समाजमनात झिरपली 'लीळाचरीत्र '(इ. स. १२८६)या ग्रंथाचे संकलक, संपादक असणारे माहिमभट्ट हे सद्धयाच्या अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा गावचे. लीळाचरीत्र हा अनेक ग्रंथांना जन्माला घालणारा बीजग्रंथ आहे. 'पूजावसर' हा ग्रंथ लिहिणारे द्वितीय बाईदेव व्यास आणि 'प्रश्नार्णव' लिहिणारे गोपीभास्कर हे देखील याच भूप्रदेशातील होते.
बायजाबाई जेऊर येथे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेले 'संतुदास 'यांनी 'सुबोध' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. तर नेवासे तालुक्यातील घोगरगावचे बहिरंभट किंवा बहिरा जातवेद (इ. स. १३००) यांनी भागवताच्या दशमस्कंधावर 'भैरवी' नावाची दीर्घ टीका लिहिली आहे. संत कबीराचा मराठी अवतार समजले गेलेले 'शेख महंमदबाबा' श्रीगोंदेकर ' यांनी ' योगसंग्राम', 'निष्कलंक प्रबोध ' हे ग्रंथ लिहिले आहेत. 'शेख महंमद अविंध । त्याचे हृदयी गोविंद ॥' असे अभिमानाने लिहिणारा हा संत कवी श्रीगोंदे येथील होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात खेडोपाडी पोहोचलेल्या व लोकप्रिय झालेल्या 'भक्तीविजय' ,' संत लिलामृत ' , ' भक्तिविजय ' , 'संत विजय ' या कथापर काव्यग्रंथाचे कर्ते महिपती बुवा ताहाराबादकर (इ. स. १७१५- १७९०)हे राहुरी जवळील ताहराबादचे.
भक्ती काव्याप्रमाणेच पंडिती काव्याची आणि शाहिरी काव्याची सशक्त मध्ययुगीन परंपरा अहमदनगर जिल्ह्याला लाभली आहे. नागेश हा कवी अहमदनगर शहरा जवळील भिंगार येथील. इ. स. १६१८ ते इ. स. १६९३ हा त्याचा कार्यकाल. त्यांनी लिहिलेले 'सीतास्वयंवर' , ' रुक्मिणी स्वयंवर ' , ' चंद्रावळी वर्णन ' ,' शारदा विनोद 'आणि 'रसमंजिरी ' हे काव्यग्रंथ प्रसिद्ध आहेत. आर्षकाव्याचे मराठीकरण होत असतानाच्या याच मध्ययुगीन काळात नेवासे येथील 'गोपालकवी ' यांनी इ. स. १७५० च्या दरम्यान बेचाळीस हजार ओव्यांचे महाभारत लिहिले आहे. पंडिती काव्याच्या मानाने शाहिरी कविता अधिकच लोकाभिमुख होती. 'फटका ज्याचा लावी चटका ' असे ज्यांच्या बद्दल गौरवाने म्हटले जाते ते 'अनंतफंदी' (इ. स. १७४४ ते १८१९) संगमनेर येथील होते. 'बिकटवाट वहिवाट नसावी ' सारखे अनेक उपदेशपर फटके आजही लोकांच्या मुखी आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना लोकभाषेचे, लोकोक्तीचे रूप प्राप्त झाले आहे. खऱ्या अर्थाने अनंतफंदी कवनाचे सागर होतं. एकूणच म्हाईंभट, संतुदास, बहिरा जातवेद, शेख महंमद, महिपतीबुवा ताहराबादकर, कवी नागेश, गोपाल कवी, अनंतफंदी या सगळ्यांची प्रतिभा आणि निर्मिती सद्धयाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या भूभागापुरती मर्यादित नव्हती तर संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश व्यापणारी होती हेच खरे.
अहमदनगर जिल्ह्याचे मराठी साहित्यातील योगदान सांगत असतांना 'दीनमित्र 'या नियतकालिकाचा गौरवपूर्ण उल्लेख करणे अपरिहार्य ठरते. मराठी ग्रामीण साहित्याला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती महात्मा फुले यांच्या योगदानातून. या सत्यशोधक विचारांचा प्रभाव बापूजींनी दिलेल्या 'खेड्याकडे चला ' या घोषणेच्या पुढे जाणारा होता. त्यामुळे ही जीवनसन्मुख वैचारिक चळवळ अहमदनगरच्या भूमीत रूजणे अपरिहार्य होते. या कामी कृष्णराव भालेकर, तरवडीचे गणपतराव पाटील यांच्या जोडीने सोमठाणे ता. पाथर्डी येथील हरिभाऊ व यादवराव शिदोरे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. कृष्णराव भालेकरांचे चिरंजीव इ. स. १८९३ मध्ये तरवडीच्या गणपतराव पाटलांना दत्तक जाऊन मुकुंदराव पाटील झाले. त्यांनी शिदोरे बंधूंच्या सहकार्याने २३ नोव्हेंबर १९१० मध्ये 'दीनमित्र ' चे पुनरुज्जीवन केले. आणि अनेक अडथळे सोसत ते सुमारे पाच दशके चालवले. मुकुंदराव पाटील यांनी ललित वाङमयाचे महत्त्व ओळखलेले असल्याने त्यांनी खास शैलीत ललित ग्रंथाची निर्मिती केली .सहाजिकच त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचा महाराष्ट्राच्या वैचारीक जडणघडणीत व सामाजिक अभिसरणात मोलाचा वाटा आहे. इ. स. १९१२ पासून त्यांनी 'दीनमित्र ' मधून ' कुलकर्णी लीलामृत ' लिहिले. ते इ. स. १९१३ मध्ये कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. 'शेटजी प्रताप ' हे इ. स. १९१८ मध्ये लिहीलेले त्यांचे दुसरे दीर्घ काव्य. या दोन्हीही ग्रंथातून त्यांची सत्यशोधकी भूमिका व्यक्त होते. 'कुलकर्णी लीलामृत ' या काव्यावर केसरीचे संपादक न. चिं. केळकर यांनी दोन अग्रलेख लिहून ( केसरी ३ सप्टेंबर १९१३ व ७ ऑक्टोबर १९१३ ) या ग्रंथातील आशयावर जळजळीत टीका केलेली आहे. मात्र 'हे काव्य काव्यदृष्ट्या साहित्य शिरोमणी आहे. ' असा अभिप्रायही नोंदवलेला आहे. सहाजिकच या अभिप्रायातूनच मुकुंदराव पाटलांच्या सरस साहित्यगुणांचे दर्शन घडते. 'कुलकर्णी लीलामृत ' या ग्रंथाचा कुलकर्णी वतीने रद्द होऊन पगारी तलाठ्यांच्या नेमणुका होण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.
'कुलकर्णी लीलामृत 'आणि 'शेटजी प्रताप ' या दोन काव्याच्या रूपाने सामाजिक दीर्घ काव्य रचनेचा प्रयोग मराठीत प्रथमच झालेला दिसतो. वाङ्मयीन प्रयोगशीलतेच्या दृष्टीने हे देखील महत्त्वपूर्ण मानले जाते.
मुकुंदराव पाटलांची 'ढढ्ढाशास्री परान्ने ' ही इ. स १९१५ मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी. तिचा मराठीतील पहिली विनोदी कादंबरी म्हणून उल्लेख केला जातो. लोकाभिमुख आणि लोकशिक्षणाला महत्त्व देणारे हे महत्त्वाचे साहित्य असून त्यांनी जी शेतकरी, कष्टकरी समाजाची सुख-दु:खे मांडली त्यातूनच पुढे ग्रामीण साहित्याची सशक्त आणि प्रभावी परंपरा निर्माण व्हायला मदत झाली हे नाकारता येणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील मराठी साहित्यातील योगदान हे एकूणच मराठी भाषेला ललामभूत ठरणारे व मराठी माणसाला सहाय्यभूत ठरणारे आहे. नेवासे येथे गोदातटी 'भावार्थदीपिका' तथा ज्ञानेश्वरीची रचना करणारे संत ज्ञानेश्वर, म्हाईंभट, बाईदेव व्यास, संतुदास, बहिरा जातवेद, शेख महंमद, महिपतीबुवा ताहराबादकर, कवी नागेश, गोपाल कवी, अनंतफंदी ते थेट दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला अलीकडील काळाचा मागोवा घेता येणे अशक्य आहे. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदीवासात असतांना पं. जवाहरलाल नेहरू यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहीला तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी 'गुबार ए खातीर 'हा ग्रंथ लिहीला. कविता, कथा आणि कादंबरी, इ. वाङमय प्रकारातील अहमदनगर जिल्ह्याचे योगदान पाहतांना ही तेजोमय पार्श्वभूमी विचारात घेणे संयुक्तिक ठरते. त्यामुळे सद्यकाळातील वाङमयाचे मूल्यमापन किंवा स्थान निश्चिती करायलाही मदत होते.
○ अहमदनगरची काव्य परंपरा :
अहमदनगर जिल्ह्यातील कवी -कवयित्रींनी मराठी कवितेत उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. पूर्वपिठिकेमध्ये उल्लेख केलेल्या काव्यग्रंथाच्या नंतरच्या काळाचा विचार करता ग. ल. ठोकळ या कवीचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. ते नेवासे जवळील कौठा गावचे. 'रविकिरण 'मंडळातील कवी असणाऱ्या ग. ल. ठोकळ यांनी इ. स. १९३३ मध्ये 'सुगी' हा जानपदगीतांचा प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित केला तर 'मिठभाकर' हा त्यांचा स्वतंत्र कवितासंग्रह आहे. इ. स. १९३०मध्ये अहमदनगर मध्ये नगर व नाशिक भागातील कवींचे कविसंमेलन भरले होते. त्यात त्यांनी 'भिकारीण' नावाची कविता सादर केली होती.
'मज दीनेची किव येऊ द्या काही
घाला हो भिक्षा माई '
या कवितेच्या सादरीकरणाने रसिकांनी त्यांना उचलून धरले. 'गरीबाचा पाहुणचार','लक्ष्मी ' ,' गरीबीचा संसार' , 'मोटे वरलं गाणं ' , 'जात्यावरलं गाणं ' ,'घरधणी' या त्यांच्या लोकप्रिय कवितांपैकी काही कविता होत.
'गावाची शीव लागताच दिसते उंचावरली ती गढी
भिंती ढासळल्या बुरूज खचले ये खालती देवडी. '
अशा रचनांवरून त्यांच्या कवितातील ताकद समजते.
ग. ल. ठोकळांच्या ही थोडे मागे जाऊन कवितेचा विचार केला तर कवी दत्त , रे. ना. वा. टिळक आणि वि. द. घाटे यांच्या कवितेचा प्रांत नजरेस येतो या तिघांचीही कविता लक्षवेधी आणि विशिष्ट गुणवैशिष्ट्याने ओळखप्राप्त असलेली आहे.
रे. ना. वा. टिळकांचा (इ. स. १८६१- इ. स. १९१०) १९०२ पासुन नगरशी संबंध होता. 'फुलामुलांचे कवी' म्हणून ओळख असणार्या टिळकांचे 'वनवासी फुल '(इ .स. १८९०) व 'अभंगांजली '(इ. स. १८९०) हे कवितांमधून प्रसिद्ध आहेत. 'रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले? ' असे धगधगते काव्य लिहिणारे नंतरच्या काळात नाशिक येथे राहिलेले कवी गोविंद हे मुळचे नगर जिल्ह्यातील असल्याचे उल्लेख सापडतात.
ठोकळांप्रमाणेच वि. द. घाटे हे देखील रविकिरण मंडळाचे कवी. ते अहमदनगर जिल्ह्यातील घोसपुरीचे. ते नगरला राहत. इ. स. १९२४ साली प्रकाशित झालेल्या 'मधु-माधव' या कवितासंग्रहात माधव ज्युलियन सोबत त्यांची कविता आहे. 'नवलाख दिवे हे तुझ्या घरी. ' ,'आई आम्हा आठवशील ना? ' , ' आलात ते कशाला? ' अशा कवितांनी वि. द. घाटे रविकिरण मंडळा बरोबरच महाराष्ट्रातही ओळखले गेले.
कवी दत्त तथा दत्तात्रय कोंडो घाटे हे वि. द. घाटे यांचे वडिल .ते देखील त्याकाळचे नामवंत कवी होते. त्यांनी 'दत्त ' नावाने कविता लेखन केले. 'नीज नीज माझ्या बाळा' , 'लाडकी बाहुली ' या त्यांच्या अजरामर कविता. त्यांनी प्रामुख्याने 'बाहुली' विषयक कविता लिहील्या आहेत. अगदी अलीकडच्या काळाचा विचार करतांना कवी दया पवार यांचा'कोंडवाडा' हा १९७६ साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह महत्त्वपूर्ण ठरतो.
'कशाला झाली पुस्तकांची ओळख, बरा ओहळाचा गोटा होतो
गावची गुरं वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या '
अशा प्रगल्भ जाणीवेची कविता महाराष्ट्राने 'कोंडवाडा' मधून अनुभवली आहे. 'पाणी कुठवर आलं ग बाई ?' हा त्यांचा नंतरचा कवितासंग्रह होय.
दया पवार नंतर अहमदनगर जिल्ह्यात लक्षवेधुन घेईल असे कवितालेखन नजीकच्या काळात झाल्याचे दिसत नाही. मात्र आज घडीला शंभरहून अधिक कवी आपापल्या मगदुराप्रमाणे कवितालेखन करतांना दिसतात. या चर्चेच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांच्या साहित्य लेखनाचा मागोवा घेण्याचा, सिंहावलोकन करण्याचा आणि शक्य तर स्थान निश्चितीचाही प्रयत्न आहे. अर्थातच हे योगदान पुस्तकांच्या किंवा कवितेच्या संख्येवर मोजण्यापेक्षा गुणवत्तेवर मोजणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज जशी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली जात आहे त्याला अहमदनगर जिल्हाही अपवाद नाही. या सर्व लिखाणाचे स्वागत करून अहमदनगरचे मराठी कवितेतील (किंवा एकुणच साहित्यातील )योगदान मांडताना समकालीनांचे योगदान नोंदवण्यावर विशेष भर देणे कालोचित वाटते. जे सकस आहे तेच काळाच्या कसोटीवर टिकेल हे निश्चित.
अहमदनगर जिल्ह्यातील कवी आणि त्यांचे कवितासंग्रह याकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास ही संख्या प्रचंड असल्याचे दिसते. पैकी काही असे - माधुरी हुद्देदार (श्रावणसय, रूजवा, निर्मोही), निलिमा बंडेलू (संदर्भ ) ,पद्मा मोरजे (भाववेणा) ,सुनंदा चोरडिया (निरोपाचे शब्द, कणव ) ,चंद्रकला आरगडे ( मुळाकाठचे स्वर , आयुष्याच्या पारावर) , वसंत मुरदारे (बोभाटा, भारत माझा देश आहे, तेच लोक होते ), चंद्रकांत म्हस्के ( सलोखा,कळवा घातलेला उपाशी घोडा ), शशिकांत शिंदे (हंगाम, आठवणींच्या कविता, शरणागताचे स्तोत्र, ताटातुटीचे वर्तमान) ,शंकर चव्हाण (प्रिये, कोंडमारा),विठ्ठल सोनवणे (चर्मवाणी, वेदनेच्या क्षितिजावरून ), आ. य. पवार ( रानमाती, सीनाकाठच्या कविता, ऊनपाऊस) ,चंद्रकांत पालवे (तृण अग्नीमेळे, पक्षी पक्ष्याचे कलेवर ), सुमती लांडे (कमळकाचा, वाहते अंतर ) , बाबासाहेब सौदागर (सागरचंद्र, सांजगंध, पिवळण ) , सुभाष सोनवणे (व्यथित सावल्या ) ,अरूण शहाणे (बाड, संपुष्ट, चंद्रपसारा ) , सुरेश वाकचौरे (तेजाब ) , टि. एन. परदेशी (कौतुकी, तुझे तुला माझे मला) , लीला गोविलकर (छंदमयी) ,स्व. संजीवनी खोजे (एकोल, पैलतीर ) ,रामदास फुटाणे (कटपीस, सफेद टोपी लालबत्ती, चांगभलं, भारत कधी कधी माझा देश आहे , फोडणी, कॉकटेल ) , प्रकाश घोडके (तुझ्या दाराहुन जाता ), सुधाकर कुर्हाडे (सिनाॅप्सिस, यात्रा) , हेरंब कुलकर्णी ( कॉमन मॅन), शंकर दिघे (या शतकाचा सातबाराच होईल कोरा), यशवंत पुलाटे (जन्मझुला) , संतोष पद्माकर पवार (कबुली, भ्रमिष्टांचा जाहिरनामा , पिढीपेस्तर पॅदेमात, बहादुर थापा आणि इतर कविता) , अरूण शेवते (कावळ्यांच्या कविता, संदर्भ. सई मालवणकर, तळघर, राजघाट ) ,स्व. रायभान दवंगे (तांडा ) , पोपट सातपुते (रानस्वर आणि सावल्या) , लहू कानडे (क्रांतिपर्व, टाचाटिभा, तळ ढवळतांना) , विलास गिते (संज्ञेच्या संधीप्रकाशात ) , शर्मिला गोसावी (बांगड्याची खैरात ) , नारायण खेडकर (मालेवाडीच्या कविता ) , लक्ष्मण खेडकर (लावण्याची चंद्रकोर ) , अर्जुन देशमुख (पंखझड ) , सुचिता गुंजाळ (संचित ) , संगीता फासाटे (माय जानकी ) , वसंत दिक्षित (जांभुळ धुके ) , सुनिल धस (गुंफण ) , मधुसुदन बोपर्डिकर (खिडक्या ) , गणेश पोटफोडे (मनाच्या झरोक्यातून) , संतोष दौंडे (उधळण ) , स्मिता भुसे (अंकुरलेल्या बीजासाठी ) , चंद्रकांत भोसले (धग ) , आनंदा साळवे (नातं गोतं, वेशी बाहेरचं जगणं, वाटसरू, गावगाडा, डोंगरदर्याच्या वाटा, टीचभर पोटासाठी) , राजेंद्र वडमारे (मातीच्या कविता ) , बाबुराव उपाध्ये (निवडुंगाची फुलं, माणसं भेटली, मानव्य, कुंभार वाड्यातील कविता, कष्टाची फुलं, आई आहे हृदयात, गणेश मरकड (वेदनेची फुलं, कुणब्याचं गाणं, गावाला सोबत घेऊन जातांना, काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान ) , अनिल सहस्रबुद्धे (प्रिया, कोहंम, अगस्त्य महात्म्य ) , संपत गर्जे ( शब्द आशयाचे घन),सदाशिव गोडे (साथ, रंगतरंग, गंधमेखला ) , राजेंद्र गवळी (स्नेहमयी ) , दत्तात्रय बोडखे (वास्तवाचा विस्तव) , द. के. गंधारे (वावटळ),पुंडलिक गवंडी ( शेतकर्याच्या व्यथा ) , माधुरी मरकड ( रिंगण) आणि शेवटी कैलास दौंड (उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा , आगंतुकाची स्वगते ) प्रथम स्मरणात ज्या क्रमाने आठवतील त्या क्रमाने ही कवितेत योगदान देणारी नावे घेतली आहेत. अर्थात मला याची नम्र जाणीव आहे की, या ठिकाणी उल्लेख केलेल्या कवी आणि कवितासंग्रहा व्यतिरिक्त अजून काही कवींचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले असण्याची शक्यता आहे. मात्र केवळ अभ्यासकाच्या नजरेस न आल्याने त्यांचा नामोल्लेख करता येत नाही. कारण एकुणच मराठीत कवितेचे पीक भरघोस आणि वारेमाप आलेले आहे. मग अहमदनगरी कविता तरी त्याला कसा अपवाद असणार? अर्थातच अहमदनगर मध्येही कवितेची निर्मिती विपूल प्रमाणात झाली पण माय मराठीच्या विशाल पटावर उमटून दिसेल व महाराष्ट्राच्या कवितेत एकुणच मानाचे स्थान पटकावणारी कविता सद्य काळात मोजकीच आहे असे दिसते. त्यात रामदास फुटाणे, संतोष पद्माकर पवार, शशिकांत शिंदे, बाबासाहेब सौदागर, लहू कानडे, सुमती लांडे ,गणेश मरकड, कैलास दौंड यांचा समावेश आजमितीस होतांना दिसतो. त्याच प्रमाणे आणखी काही कवींचा समावेश काही काळानंतर होईल असे आशादायक चित्रही दिसते. या ठिकाणी दखलपात्र कविता लिहीणार्या कवींच्या बाबतीत थोडे अधिक लिहूया, बोलुया-
रा. ग. जाधव यांनी २ एप्रिल २००० रोजी रामदास फुटाणे यांच्या 'फोडणी ' या भाष्यपर व्यंग कवितेच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ' रामदास फुटाणे यांची नवी भाष्यपर व्यंग कविता यापुढे कोणत्या दिशेने वळण घेईल हे पाहण्यास मराठी रसिक उत्सुक आहेत. गंभीर, संस्कृतीभाष्यपर भावकविता असेही वळण ती घेऊ शकते.' आज आवर्जुन सांगावेसे वाटते की, रामदास फुटाणे यांच्या कवितेने भावकवितेचे वळण स्वीकारले नसले तरी गंभीर, संस्कृतीभाष्यपर व्यंगकवितेचे वळण मात्र स्वीकारलेले आहे. उदा : परळी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर सादर केलेली भाष्य कविता. ( 'फोडणी' या संग्रहातून )
परळी
लोकसाहित्य मंडपात
तुपाची धार वाढत होते
मुख्य मंडपात मात्र
ताकावर लोणी काढत होते.
पुढील वर्षी दादरला
पुन्हा तीच 'बारी' आहे
सरस्वती सोडून मोर
लक्ष्मीच्या दारी आहे.
या भाष्यकवितेला असलेला संदर्भ त्यांनी कवितेखाली नोंदवला आहे. लोकसाहित्य मंडपात कलाकारांनी कला सादर केली. त्याचवेळी मुख्य मंडपातील परिसंवादावर मात्र पाणी पडले. असा तो संदर्भ आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संख्येने अत्यंत अल्प असलेल्या कवयत्रींच्या मध्ये सुमती लांडे हे एक नाव सकस कवितेमुळे महाराष्ट्रभर ज्ञात आहे. 'कमळकाचा ' आणि 'वाहते अंतर ' या दोन संग्रहातून त्यांची कविता भेटते. अल्पाक्षरत्व हा त्यांच्या कवितेचा जसा विशेष आहे तसाच टोकदार आशय हा दुसरा विशेष. प्रभाकर कोलते या चित्रकाराने चितारलेल्या रेखाचिन्हांसह कमळकाचा ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.त्यातील एका कवितेतील या ओळी -
असा नाकारता येतो
नाकारता येतो
झड पाऊस.
अशा नाकारता येतात
पायखुणा
खरं तर
असं काही नाकारतांनाच
आपण बरचं काही स्वीकारलं होतं.
शशिकांत शिंदे यांची कविता आजच्या मराठी कवितेतली दखलपात्र कविता समजली जाते. रसिक मान्यता लाभलेली ही कविता आहे. 'ताटातुटीचे वर्तमान ' या कवितासंग्रहातील एका कवितेत ते लिहितात -
'माझ्या कवितेने व्हावे
नारळाची करवंटी
फोडतांना तुझ्या पायी
सत्व उरो जगासाठी'
अशी समर्पणाची आणि भल्याची आस बाळगणारी ही कविता आहे. लहू कानडे यांच्या कवितेचा तर लोकसंवाद हा स्थायीभावच असल्याचे दिसून येते. क्रांतिपर्व, टाचाटिभा , तळ ढवळतांना या तीनही कवितासंग्रहातून संवादाची भिन्न रूपे अनुभवावयास मिळतात. 'आपल्या विद्रोहाचे प्रेमगीत 'या कवितेत ते लिहितात -
समुद्रफुलांनो
तुमचाच गजरा माळला असता
रविकिरणांच्या धाग्यात धुके गुंफून
पण येथील सूर्यानी सुद्धा आम्हाला प्रकाश नाकारला
विटाळ होण्याच्या भितीने (क्रांतिपर्व पृ. १७)
नव्या विचाराची आणि प्रगल्भ जाणीवेची कविता वेगवेगळ्या आयामाने त्यांच्या तिन्ही कवितासंग्रहात भेटते.
कवी संतोष पवार यांच्या कवितेचा आजच्या मराठी कवितेत खूप मोठा बोलबाला आहे. भ्रमिष्टांचा जाहिरनामा, पिढीपेस्तर पॅदेमात , बहादुर थापा आणि इतर कविता या कवितासंग्रहातील कवितेने वाचकांना हलवले.त्यांच्या कवितेबद्दल ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव नगरच्याच संजीवनी खोजे पुरस्कार वितरण कार्यक्रमात म्हणाले होते, " मर्ढेकर, केशवसुत यांच्या कवितेतील वैश्विकता संतोष पवार यांच्या कवितेत विकसित होतांना दिसते. " पवारांच्या त्यानंतरच्या कविता लेखनाने हे मत सर्वमान्य केले. भ्रमिष्टांचा जाहिरनामा या दिर्घ कवितेला पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाल्यावर ज्येष्ठ कवी दिलिप पुरूषोत्तम चित्रे म्हणाले होते," संतोषची कविता ऐकतांना समग्र शतकाची घरघर ऐकतोय असं वाटत राहतं. "
'पिढीपेस्तर पॅदेमात ' मधील 'बोल सये' नावाची कविता पहा -
तुला न्यायला मुर्हाळी का आला ग नाही?
...कामात आसलं म्हणून आला ग नाही.
तुझ्या लग्नाचा दागिना का गळ्यात नाही?
...सासू बाईनं जपून ठेवला ग बाई.
तूझ्या हातावर डाग कशाचा ग बाई?
...तुझ्या संगतीनं इथं मी मातीत बाई .
बोलं सये, बोल अगं मनातलं बोलं
... बारवेचा तळ सांग किती किती खोल.
सुधाकर कुर्हाडे यांची कविताही वाचकांच्या मनात घर करणारी आहे. उदा :
'भर उन्हात सावली देणारा
वटवृक्ष पाहिला की
डायरीची पाने अपुरी वाटू लागतात
आता हिरव्या पानावरच मला
डायरी लिहायला हवी '
तर 'ओठातूनी येती कवितेच्या काही ओळी, सोनेरी संध्याकाळी' असं लिहिणाऱ्या बाबासाहेब सौदागरांची कविता रंगोधळण करणारी, सौंदर्य वर्णन करणारी व प्रीतीभाव जपणारी आहे.
नगरच्या मराठी कवितेने एकुणच मराठी कवितेचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले आहे.
कैलास दौंड यांची कविता देखील आजच्या मराठी कवितेत वाचक आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. 'नव्या जागरणाला साद घालणारी कविता ' असे त्यांच्या कवितेचे वासुदेव मुलाटे यांनी वर्णन केले आहे. अंधाराचा गाव माझा ' या कवितासंग्रहातील 'बेपत्ता ' नावाची ही कविता उदाहरणादाखल पुढे ठेवता येईल -
" तिरंग्याला केला
फिरंग्याने सलाम
उभा देश पुन्हा
होऊ पाहे गुलाम
हे कुठले क्रांतीचे पडघम
हे कुठले स्वातंत्र्याचे बालेकिल्ले
वाजत गाजत उरावर येताहेत
बहुराष्ट्र कंपन्यांचे काफिले.
राजरोस बळकावताहेत भूमी
बनवताहेत बेठबिगार
काच हरवलेल्या आरशात
महासत्तेचा सुरू आहे शिणगार.
असा कसा होतो विकास
ही कुठली महासत्ता?
अवघे अवघे भूमीपुत्र
होताहेत बेपत्ता. "
अहमदनगर जिल्ह्यातील कवींच्या कवितेबद्दल बोलतांना कवी विजय नांगरे यांच्या बद्दल बोलणे गरजेचे आहे. कुसूमाकर मासिकातून क्रमशः आलेले 'भुजंगपुराण ' लोकांना आवडून गेलेले आहे. त्यांच्या व सतिश डेरेकर यांच्या कवितासंग्रहाची नगरची कविता समृद्ध होण्यासाठी वाट पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.
अहमदनगर जिल्ह्यातील कवींचे मराठी कवितेतील असणारे योगदान एका दृष्टिक्षेपात दिसते ते असे.
○ अहमदनगर जिल्ह्यातील कथाकारांचे मराठी कथेतील योगदान.
'कथा' हा वाचकप्रिय आणि संवादी असणारा, बर्याच प्रमाणात लिहीला जाणारा साहित्यप्रकार आहे. काही समीक्षकांनी दुय्यम वाङ्मय प्रकार म्हणून कथेची संभावना केलेली असली तरी 'कथा' हे इथल्या समाजजीवनाचे अविभाज्य अंग आहे. हा वाङ्मय प्रकार वाचकांना नेहमीच जवळचा वाटत आलेला आहे. कथेच्या प्रांतातही अहमदनगर जिल्ह्यातील कथा लेखकांनी दिलेले योगदान अल्प -स्वल्प असले तरी महत्वाचे आणि एकूणच मराठी कथाविश्वात दखलपात्र आहे.
या कथालेखनाचा मागोवा घेतांना ग. ल. ठोकळ ,दया पवार यांच्या पासून पुढे यावे लागते. ग. ल. ठोकळ हे इथल्या भूमीतील महत्वाचे व प्रसिद्ध कथाकार होत. त्यांचे 'कडू साखर', 'पहिलं चुंबन', 'मत्स्यकन्या', 'सुगंध' , 'मोत्याचा चारा',' क्षितिज्याच्या पलिकडे', 'अंतरीच्या कळा' आणि 'ठोकळ गोष्टी -भाग १ ते ५ 'हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ठोकळांच्या काही कथांवर चित्रपट निर्मितीही झालेली असून त्यांच्या कथांनी मराठी भाषिक वाचकांची कथावाचनाची भूक बर्यापैकी भागवली असल्याचे आपल्याला दिसते.
दया पवार हे आत्मकथन, कविता, कथा, लेख असे विविधांगी लेखन करणारे प्रतिथयश लेखक. त्यांचे 'चावडी' ,'जागल ' हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. १९६०नंतरच्या दलित साहित्यात यांवर कथासंग्रहानी मोलाची भर टाकली आहे.
रंगनाथ पठारे हे नजिकच्या काळातील महत्वाचे व प्रयोगशील कथालेखक होत. आजच्या मराठी कथेतील मानाचे पान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे ' अनुभव विकणे आहे ' ,'स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग ' , 'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो ' , 'गाभ्यातील प्रकाश ' , 'तीव्र कोमल दुःखाचे प्रकरण ' , 'चित्रमय चतकोर ' ,'शंखातला माणूस ' हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
रामचंद्र पठारे हे रंगनाथ पठारे यांचे बंधूच .त्यांनी देखील दखलपात्र कथालेखन केलेले आहे. 'मारुतीच्या बेंबीतील विंचू ' , 'जुगाड ' , 'अवघड दुखण्याची प्रकरणं ' , 'कलथुनी खांब गेला ' हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित आहेत.
त्यांचेच समकालीन असणारे देवदत्त हुसळे हे विनोदी अंगाने कथालेखन करणारे कथाकार होत. (होते. ) त्यांचे 'धुरपी' , 'वशिला', ' वाघुर ' ,'झोंबाझोंबी ' , 'जंफड' , ' सारजा ' हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. हुसळे हे कथाकथनही उत्तम करत. त्यांची कथा चांगली असुनही सर्वदूर पोहोचल्याचे दिसत नाही.
नामदेवराव देसाई हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे कथाकार. त्यांच्या कथेतील नर्म विनोद वाचकाच्या पसंतीस उतरला आहे. त्यांचे 'पंचनामा ' ,' भ्रष्टाचार कसा करावा? ' हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नामदेवराव देसाई कथाकथन छान करत होते. नंतर त्यांनी ते बंद केले. त्याचप्रमाणे संजय कळमकर यांचे नाव नगरच्या कथेच्या क्षेत्रात प्राधान्याने घ्यावे लागते. त्यांच्या कथाकथनाने मराठी श्रोते बर्यापैकी लुब्धावले आहेत. त्यांचे 'बे एके बे ' ,' चिंब' हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
कवी आणि गीतकार असणाऱ्या बाबासाहेब सौदागर यांचा 'भंडारभूल' हा कथासंग्रह प्रकाशित आहे. तर कै. आप्पा कोरपे या प्रसिद्ध श्रमिक लेखकाचे 'भाकर ' , ' भारवाही' हे कथासंग्रह वाचकांना आवडून गेलेत. या व्यतिरिक्त आ. य. पवार यांचे 'करकुंज्याचा थवा ' , ' आंब्यावरचा राघू ' ; अशोक थोरे यांचा 'मराठी माती ' ; टी. एन. परदेशी यांचा 'ओळख' ; विठ्ठल सोनवणे यांचा 'ह्या आडवाटा ' ; बाबुराव उपाध्ये यांचे 'गोष्टी गावाकडच्या ' , 'हरवलेला गाव ' ; दिलीप सरसे यांचा 'राखणी' ; बबनराव लांडगे यांचे 'बोजवारा ' , ' फजितवाडी ' ; सुभाष शेकडे यांचा 'झोका ' ; राजेंद्र वडमारे यांचा 'आसवांच्या धारा ' ; कैलास दौंड यांचा 'एका सुगीचीअखेर ' ; पुंडलिक गवंडी यांचा 'डोंगर संपला ' ; शिवराज सगळे यांचा 'अस्तित्व ' ; भाऊसाहेब सावंत यांचे 'पडझड ' व 'भेगड' हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. नगरच्या भूमीतील या कथासंग्रहापैकी काही कथासंग्रह दखलपात्र देखील ठरलेले आहेत.
मराठी वाङमय क्षेत्रात कथेला दुय्यम प्रकार समजुन तिच्यावर बर्यापैकी अन्याय केला गेलेला दिसतो मात्र याच कथापरंपरेत ग. ल. ठोकळ, दया पवार, रंगनाथ पठारे, रामचंद्र पठारे, संजय कळमकर यांची नावे अगत्याने घेतली जातात. उपरोल्लेखित कथाकारांव्यतिरिक्त आणखी काही कथालेखक व त्यांचे कथासंग्रह प्रकाशित असतीलच मात्र माहिती अभावी त्यांचा नामनिर्देश करता येत नाही इतकेच.
○ मराठी कादंबरी लेखनात अहमदनगर जिल्ह्यातील कादंबरीकारांचे योगदान :
कादंबरी या विस्तृत आणि सर्वंकष वाङ्मय प्रकारात देखील अहमदनगर जिल्ह्यातील कादंबरीकारांनी आपल्या परीने दिलेले आहे. त्यात रंगनाथ पठारे यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांनी सतत प्रयोगशील राहून मौलिक कादंबरी लेखन केलेले आहे. त्यांच्या 'ताम्रपट' या १९९४ यावर्षी प्रकाशित झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांच्या ' दिवे गेलेले दिवस ' (१९८४) ,' रथ'( १९८४) , 'चक्रव्यूह ' (१९८९ ) , हारण( १९९०) , 'ताम्रपट '(१९९४), 'टोकदार सावलीचे वर्तमान ' (१९९१), 'दुःखाचे श्वापद'(१९९५), 'नामुष्कीचे स्वगत '( १९९९), 'त्रिधा' (१९९९), 'कूंठेचा लोलक ' (२००६), 'भर चौकातील अरण्यरूदन' (२००८), 'एका आरंभाचे प्रास्ताविक ' (२०१४), 'चोषक फलोद्यान '(२०१४) , सातपाटील कुलवृत्तांत (२०१९) या कादंबर्या प्रसिद्ध आहेत. महत्त्वपूर्ण आणि मोठे कादंबरी लेखन करणाऱ्या पठारे यांचे कादंबरीकार म्हणून स्थान उच्च आहे.
संजय कळमकर यांनी 'भग्न ' , ' उद्ध्वस्त गाभारे ' , 'कल्लोळ ' , ' अंतहीन' , ' सारांश शून्य ' , ' टोपीवाले कावळे ', 'झुंड' , ' एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट' या कादंबर्या लिहील्या आहेत. 'सारांश शून्य ' ही शिक्षणाचा प्रश्न हाताळणारी महत्त्वाची कादंबरी आहे. तर नेवासे तालुक्यातील पाथरवाला येथील अशोक थोरे या अवलिया लेखकाची नेमकी किती पुस्तके प्रकाशित आहेत हे सांगणे कठीण आहे. लोक ही संख्या १५० ते ३५० अशी सांगतात. पण त्यांनी किमान तीस चाळीस तरी कादंबर्याचे लिखाण केलेले असेल असे म्हणावयास वाव आहे. 'जळीत ' ही अशोक थोरे यांची दखलपात्र कादंबरी होय. कोपरगाव येथे प्राध्यापक असणाऱ्या तानाजी राऊ पाटील यांची 'रूपसावली' , 'आभाळझळा' या कादंबर्या प्रसिद्ध आहेत. पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील कैलास दौंड यांच्या 'पाणधुई ' , 'कापूसकाळ', 'तुडवण' या कादंबर्या प्रसिद्ध आहेत. या खेरीज अहमदनगर जिल्ह्यातील ज्या कादंबरीकारांनी मौलिक योगदान दिले आहे त्यांची व त्यांच्या कादंबर्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत .
रामचंद्र पठारे (पाचर) , बाबासाहेब सौदागर (बाजिंदी ) , भास्कर खांडगे (अस्वस्थ सूर्योदय ) , आण्णासाहेब देशमुख (फरफट, डोंगर हिरवा झाला ) , साहेबराव आवारे (खेळ मांडियेला ) , चं. वि. जोशी (दंगल) , अनिल सहस्रबुद्धे (डांगाणी, अहिनकुल, वावटळ, भेद, मातंगी, क्षय वटाच्या पारंब्या, परवेडा, काळ साद घाली , अगस्त्य, नारद, सत्यनारायण थापाडे पाटील ) , भाऊसाहेब सावंत ( झगडा) , कुकाण्याचे बबनराव लांडगे यांची 'बंडखोर कोंड्या नवला ' ही कादंबरी तसेच दिलीप सरसे यांची 'तोडपाणी' , प्राचार्य जी. पी. ढाकणे यांची 'घालमेल ' व सुदाम राठोड यांची 'मिसकॉल ' ही कादंबरी प्रसिद्ध आहे . बाबुराव उपाध्ये यांच्या 'परवड ' , ' काळोखातील दिवे ' या दोन कादंबर्या प्रकाशित झालेल्या आहेत. रेहेकुरी येथील मारोतराव वाघमोडे यांनी 'बिरुबाचं चांगभलं ' ही धनगरी बोलीतील कादंबरी लिहीलेली आहे.
एकूणच दीनमित्रकारांच्या 'ढढ्ढाशास्री परान्ने ' या पहिल्या विनोदी कादंबरीपासून सुरू झालेली नगरच्या कादंबरीची देदीप्यमान परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातील कादंबरीकारांनी केलेला आहे.
○ ललित गद्य लेखनात अहमदनगर जिल्ह्यातील लेखकाचे योगदान:
ललित लेख किंवा ललित गद्य पुस्तकाचे लेखन करण्यात देखील अहमदनगर जिल्ह्यातील लेखकांनी सहभाग नोंदवला आहे. अर्थातच हा सहभाग केवळ नाममात्र म्हणावा असाच आहे. कविता, कथा, कादंबरी अशा वाङ्मय प्रकारात खूप भरीव योगदान दिलेले असल्यामुळे हे असे झालेले असावे असे म्हणावयास वाव आहे.
विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे 'काही म्हातारे व एक म्हातारी ' (१९३९) , दया पवार यांचे 'पासंग' , मा. रा. लामखडे यांचे 'चिमण्या चिवचिवल्या ' , यशवंतराव गडाख यांचे 'सहवास ' , ' अंतर्वेध ' ; योगेश थोरात याचे 'अंबरधारा ' आणि कैलास दौंड यांचे 'तर्होळीचं पाणी ' या साहित्यकृतीची नावे या संदर्भात सांगता येतील.
○ अहमदनगरी साहित्यिकांचे बालसाहित्यातील योगदान :
बालसाहित्याचा संस्कारशील प्रांत !अहमदनगरच्या साहित्यिकांनी या साहित्य प्रकारात दिलेले योगदान अत्यल्प आहे. कवी दत्त तथा दत्तात्रय कोंडो घाटे यांनी लिहिलेल्या बाहुली विषयक कवितेनंतर थेट अलीकडील काळात दादासाहेब कोते यांनी 'फुलामुलांच्या कविता' लिहील्यात. कै. सुरेश धामणे या अल्पायुषी कवीचा 'लपाछपी ' हा बालकवितासंग्रह प्रकाशित आहे. तर कवी म्हणून ओळख असणार्या विजय नांगरे यांनी बालसाहित्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी 'अद्भूत पोषाख ' , 'अद्भुताचा शोध ' , ' गनिमी कावा ' ,' जंगलचा राजा ' , ' करामती प्रकाश ' , 'कारस्थानी राणी ' , 'कुरूप राजकन्या ' , ' मागाल ते मिळेल ' , ' मायावी मांजर ' , 'नशिबाची साथ ' , ' शेवटी काय मिळालं? ' , ' सुगंधाची किमया ' , ' ऐटींग्या राजा ' ही बालसाहित्याची पुस्तके लिहिली असून 'शिल्पकार ' ही बालकादंबरी लिहून बालसाहित्यात मोठे योगदान दिले आहे. दगडी सिंह हा बालकथासंग्रह लिहून चंद्रकांत भोंजाळ यांनी बालसाहित्यात योगदान दिलेले आहे.या खेरीज कैलास दौंड यांनीही वेळोवेळी नियतकालिकांतून बालकथांचे लेखन केलेले आहे . 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले ' ही त्यांची बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली आहेआहेत.
○ आत्मकथन वाङ्मय प्रकारातील अहमदनगर जिल्ह्यातील लेखकांचे योगदान :
अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी राजकारणात सहभागी होत कार्य केलेले आहे. येथील सहकारी साखर कारखान्याची चळवळ मोठी आहे. तसेच साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते यांनीही आत्मकथने लिहिली आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील आत्मकथने आणि चरित्रे याचा विचार करतांना राजकिय आणि गैरराजकिय अशी विभागणी करूनच हा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
अहमदनगर जिल्ह्यातील आत्मकथनाचा विचार करतांना दया पवार यांच्या 'बलुतं' या सुप्रसिद्ध आत्मकथनाचा प्रारंभीच गौरवपूर्ण उल्लेख करणे अपरिहार्य आहे. दलित साहित्य चळवळीत 'बलुतं ' चं स्थान वरचं आहे. त्याआधी 'दिवस असे होते ' हे आत्मकथन वि. द. घाटे यांनी लिहिलेले आहे. हे देखील मराठीतील महत्त्वाचे आत्मकथन आहे. अलिकडील काळात बाबासाहेब सौदागर यांनी 'पायपोळ ' व किसन चव्हाण यांनी 'आंदकोळ' तसेच सुभाष शेकडे यांनी 'हाणला कोयता झालो मास्तर ' ही आत्मकथने लिहिलेली आहेत. अवघ्या नगरची महाराष्ट्र आणि बाहेरही ओळख घडवणारे राम नगरकर यांचे 'रामनगरी' वाचक आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेलयं. या आत्मकथनावर रामनगरी हा चित्रपट देखील आला होता.
राजकीय आत्मकथनाचा विचार करतांना सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या 'अमृतमंथन' या आत्मकथनाचा प्रथम नामोल्लेख करवा लागतो. शैलीदृष्ट्याही हे आत्मकथन महत्त्वपूर्ण आहे. 'अमृतगाथा ' हे देखील त्यांचेच नंतरचे आत्मकथन. अशाप्रकारे काळाच्या दोन टप्प्यावरील दोन आत्मकथने लिहिणारे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे लोकाभिमुख नि स्वातंत्र्य चळवळीतील आणि त्यानंतरच्या काळातील नेतृत्व होते. 'क्रांतिपंढरीचे वारकरी ' हे कॉ. बी. कडू यांचे आत्मकथन असून राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते महत्त्वपूर्ण आहे. तर यशवंतराव गडाख यांचे 'अर्धविराम ' हे आत्मकथन प्रसिद्ध आहे. रावसाहेब शिंदे यांनी 'ध्यासपर्व ' नावाचे आत्मकथन लिहिलेआहे.
या खेरीज काही लेखकांनी अहमदनगर जिल्ह्यातील महनीय व्यक्तिंची चरित्रे लिहिली आहेत. त्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे 'लढत 'नावाचे द्वि खंडीय चरित्र लिहिणारे शिवाजी सावंत व पद्मश्री विखे पाटलांचेच 'भूमिपुत्र ' नावाने चरित्र लिहिणारे राजा मंगळवेढेकर यांचा ऊल्लेख करावा लागेल. प्रा. राजेंद्र वडमारे यांनीही असे चरित्र लिहिले आहे. रावसाहेब शिंदे यांचे 'अजूनी चालतोची वाट ' नावाचे चरित्र भानु काळे यांनी लिहिले आहे तर 'शेतमळा ते विधानसभा ' नावाने भाऊसाहेब सावंत यांनी माजी आमदार पांडूरंग अभंग यांचे चरित्रात्मक लिखाण केले आहे. याखेरीज राजधर टेमकर यांनी 'पार्थभूमी भूषण' नावाने दादा पाटील राजळे यांचे चरित्र लिहिले आहे. राजकुमार घुले यांनी 'राजयोगी भगवान बाबा 'हे संत भगवान बाबा यांचे चरित्र लिहीले आहे. मा. रा. लामखडे यांनी 'कार्यकर्ता लेखक :बाबुराव बागूल 'हे पुस्तक लिहिलेले आहे. कॉ.ना.ग.उर्फ बाबुजी आव्हाड, के. बी. रोहमारे आदींवर चरित्रात्मक माहिती असणारे ग्रंथ देखील संपादित झालेले आहेत. संतोष खेडलेकर यांनी 'वग सम्राज्ञी कांताबाई सातारकर ' हा चरित्रग्रंथ लिहीला आहे. एकूणच आत्मचरित्र आणि आत्मकथन या बाबतीत नगरची स्थिती समाधानकारक आहे. लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मतिचित्रे ' या अत्यंत नावाजलेल्या आत्मकथनात नगरशी संबंधित अनेक आठवणी आहेत.
आत्मकथने आणि चरित्रे यातून त्या त्या काळाची आणि स्थितीगतीची माहिती मिळत असल्याने समाजशास्त्रीय दृष्ट्याही याचे महत्त्व अधिक असते. त्या पार्श्वभूमीवर म्हाईंभट हे लीळाचरीत्राचे लेखक नगरच्या भूमीतील पहिले चरित्रकार ठरतात .
○ अहमदनगर जिल्ह्यातील लेखकांचे प्रवासवर्णन या साहित्य प्रकारातील योगदान :
प्रवासवर्णन हा मनोरंजन आणि माहिती देणारा साहित्यप्रकार आहे. लेखन शैलीदार असेल तर वाचक या साहित्य प्रकारात रमून जातो. पुढे काय? याची त्याला उत्कंठा लागते. देशाटनाचा घरबसल्या अनुभव येतो. अहमदनगर जिल्ह्यातील लेखकांचा विचार करतांना 'मेधा यशवंत काळे' यांनी लिहिलेली प्रवासवर्णने लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. 'स्वतःला शक्यतो विसरून प्रवासाशीच प्रामाणिक राहण्याचा त्यांचा हेतू आहे. ' असे मत रणजित देसाई यांनी त्यांच्या प्रवासवर्णनाबद्दल व्यक्त केलेले आहे. (कोणार्क ते कन्याकुमारी प्रस्तावना ) . प्रा. मेधा काळे यांची 'शालिमारची साद ' , 'कोणार्क ते कन्याकुमारी ' ,'गीर गिरनार, गरबा ' , ' हल्दी घाटीतून कुलू घाटीत ','बद्रोनाथ ॥पशूपतीनाथ॥ ', ' कृष्णा गोदावरीचा तेलगू देशम् 'ही प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत. 'हल्दी घाटीतून कुलू घाटीत ' या त्यांच्या प्रवासवर्णनाला सन १९८२ -८३ चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मिती राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रा. मा. रा. लामखडे यांनी देखील या वाङ्मय प्रकारात लेखन केलेले असून त्यांची 'मज हिंडायची गोडी ' , ' कानडी मुलुखातील मुशाफिरी ' ,'प्रवास दक्षिणा 'ही प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत.
○अहमदनगर जिल्ह्यातील लेखकांचे मराठी वैचारिक साहित्यातील योगदान :
अहमदनगर जिल्ह्यातील विचारवंतांनी वैचारिक साहित्याचे महत्त्वपूर्ण लेखन करून मराठी वैचारिक साहित्यात मौलिक भर घातलेली आहे .दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, रावसाहेब कसबे, अलिम वकिल, रावसाहेब शिंदे यांची नावे नगरच्या वैचारिक साहित्याच्या संदर्भात आवर्जून घ्यावी लागतात. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी 'हिंदू आणि ब्राम्हण ' ,' विठोबाची शिकवण ' ही वैचारिक पुस्तके लिहीली आहेत. रावसाहेब कसबे यांची, 'डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना ' , 'आंबेडकर आणि मार्क्स ' , 'आंबेडकरवाद -तत्व आणि व्यवहार ', 'झोत ' , 'धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह' , ' मानव आणि धर्मचिंतन ' , 'भक्ती आणि धम्म ','हिंदू मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद ' , 'सम्यक परिवर्तन ' , 'रेषेपलिकडील लक्ष्मण ' , 'देशीवाद, समाज आणि साहित्य ' ही वैचारिक साहित्य संपदा प्रसिद्ध असून या ग्रंथाचा महाराष्ट्राच्या वैचारीक घुसळणीमध्ये मोलाचा हातभार लागलेला आहे.
अलिम वकिल यांचे पूर्ण नाव अलीमुल्लाखान कलीमुल्लाखान वकिल. ते मूळचे पाचोऱ्याचे पण संगमनेर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आले आणि येथेच स्थिरावले. वैचारिक साहित्यात त्यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्यांनी, ' एका पथावरील दोन पंथ', 'भक्ती आणि सुफी ' ; 'मौलाना आझाद ', 'सुफी संप्रदायाचे अंतरंग ' , 'महात्मा आणि बोधीसत्व ' ही पुस्तके लिहिली आहेत. तर रावसाहेब शिंदे यांनी 'शिक्षण आणि समाज ' , 'चरित्र आणि चारित्र्य ' , 'ध्यासपर्व ' , 'प्रश्न आहे मूल्याचा ' , 'विचारवेध ' ही मौलिक ग्रंथसंपदा लिहीली आहे. त्याच प्रमाणे भगवानगडचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी 'ज्ञानेश्वरी विशेष चिंतन ' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. द. के. गंधारे यांनी लिहीलेले 'महात्मा फुले यांचा शिक्षण विचार'हे वैचारीक पुस्तक महत्त्वाचे आहे.
सर्वच साहित्य हे वैचारीक वाङमयच असते हे खरेच पण कादंबरी, कथा, कविता अशा ललित वाङमय न बसणार्या साहित्याचा विचार करण्यासाठी वैचारिक साहित्य हा स्वतंत्र मुद्दा घेतला आहे. स्फुट लेखन प्रकारातही काही लेखकांनी लेखन केल्याचे दिसते. चंद्रकांत भोंजाळ यांनी धूळपेरणी ,आख्यान, नमन ,काही जनातलं काही मनातलं ही स्फुट लेखनाची पुस्तके लिहिली आहेत.
○अहमदनगर जिल्ह्यातील अनुवादकांचे मराठी अनुवादासंबंधातील कार्य :
विलास गिते :
अनुवादित साहित्याने जागतिक साहित्यकृती इतर भाषेत पोहचत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील विलास गिते यांनी मोठ्या प्रमाणावर बंगाली साहित्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. विशेष म्हणजे आकाशवाणीवरील 'बंगाली शिका' या कार्यक्रमातून ते बंगाली शिकले .साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. विलास गिते यांनी बंगाली भाषेतून मराठी भाषेत अनुवादित केलेली ग्रंथ संपदा पुढीलप्रमाणे आहे : गंगटोक मधील गंडांतर (सत्यजित राय ) , एबारो बारो (सत्यजित राय ), अपूर पांचाली (सत्यजित राय ), असं असतं शूटींग (सत्यजित राय ), लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल (बी. कृष्ण), राग अनुराग (पं. रविशंकर ) , रवीद्रनाथांच्या सहवासात (मैत्रेयी देवी ) , भानुसिंहाची पत्रावली -रवीद्रनाथ टागोरांची पत्रे (रवींद्रनाथ ठाकूर ) , भुलवणाऱ्या गोष्टी (विभूतिभूषण बंदोपाध्याय ) , सिनेमा तंत्र आणि आठवणी, चिंतन (सत्यजित राय ) , एक डझन गोष्टी (सत्यजित राय ), मीठ आणि इतर कथा (महाश्वेता देवी ) , मी भूत आणि बारा कथा (सत्यजित राय ), प्रोफेसर बंधू (सत्यजित राय ), सूरसंवाद (अतनू चक्रवर्ती ).
बंगाली मधील उत्तम साहित्यकृती मराठीत अनुवादित करून विलास गिते यांनी अहमदनगरचे नाव देशपातळीवर पोहचवले आहे.
प्रा. लछमण हर्दवाणी:
अहमदनगर जिल्ह्यातील दुसरे तोलामोलाचे अनुवादक म्हणून प्रा. लछमण हर्दवाणी यांचे नाव आहे. त्यांनी सिंधी भाषेतून मराठीत आणि मराठीतून सिंधी भाषेत असे भाषिक आदानप्रदान अनुवादाच्या माध्यमातून केलेले आहे. त्यामुळे सिंधी भाषेतील ग्रंथ संपदा मराठीच्या प्रांगणात तर दाखल झाली त्याचबरोबर मराठी साहित्यकृतींचा सिंधी अनुवाद झाल्यामुळे या साहित्यकृती इतर भाषिक वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत.
प्रा. लछमण हर्दवाणी यांनी मराठीत अनुवादित केलेल्या साहित्यकृती पुढील प्रमाणे आहेत :- (कंसातील नावे मुळ लेखकांची )
मोती आणि इतर सिन्धी कथा (होलाराम हंस ) , स्मृतीची चाळता पाने (प्रा. पोपटी हिरानंदाणी ), सुखी आणि सफल जीवनाचे रहस्य (होलाराम हंस) , अनाहूत आणि इतर सिंधी कथा (सिंधी मधील वीस कथाकारांच्या प्रसिद्ध कथांचा अनुवाद ).
तर हर्दवाणी यांनी मराठीतून सिंधी भाषेत अनुवादित केलेल्या साहित्यकृतींची संख्या देखील मोठी आहे. ती पुढील प्रमाणे :-
युग जो अनू (डॉ. इरावती कर्वे) , स्मृतीकथा (गो. नी. दांडेकर ) ,ज्ञानेश्वरी (संत ज्ञानेश्वर ) , मनीबोध (रामदास ) , संत तुकाराम जी अभंगवाणी (संत तुकाराम ) या साहित्यकृती सिंधी भाषेत अनुवादित करून लछमण हर्दवाणी यांनी मोठेच कार्य केले आहे. त्यांनी आणखी चक्र (जयवंत दळवी ), छोरा अगीयां पोढा पुढीया -नाटक (मधुकर तोरडमल) ,महिनातू -नाटक (मनोहर काटदरे ) , लवलेटर -नाटक (श्रीनिवास भणगे ) , काका किशूअ जो-नाटक (श्याम फडके), नि दिया आ जारी -नाटक (श्रीनिवास भणगे ) या साहित्यकृती मराठीतून सिंधी भाषेत अनुवादित केलेल्या असून प्रकाशनाच्या प्रतिक्षेत असल्याचे समजते.
चंद्रकांत भोंजाळ यांचे अनुवादित साहित्य: चंद्रकांत भोंजाळ सद्ध्या मुंबई निवासी असले तरी ते मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी अनुवादाच्या क्षेत्रात प्रचंड मोठे काम केलेले असुन सद्ध्या ही त्यांचे हे कार्य सुरुच आहे. त्यांनी प्रामुख्याने हिंदी भाषेतील साहित्य अनुवादीत केलेले आहे. इंग्रजी भाषेतील पुस्तकेही त्यांनी अनुवादित केलेली आहेत.
कथासंग्रह पुढील प्रमाणे : मन्नू भंडारी यांचे उत्तुंग(१९८५), सत्य(१९९६) , त्रिशंकू(२००३) ; सआदत हसन मंटो यांचे मंटो हाजीर हो(१९९६) , एक होती राधा(२०१२) , दररोज एक कथा (२०२२); जितेंद्र भाटिया यांचा 'वधस्थळ' (२००४) ,प्रेमचंद यांचा 'कफन '(२००७) , दामोदर खडसे यांचा 'उत्तरायण'(२०१०), प्रियंवद यांचे 'श्वास घेणारे आकाश' (२०१०), इतिवृत्त (२०२२) ; पुष्पा भारती यांचा 'याचं आणि आपलं सेम असतं'(२०११);
चित्रा मुदगल यांचा 'आग अजून बाकी आहे' (२०१२) ; सुधा अरोडा यांचा 'मैथिलीची गोष्ट'(२०१५) ; राजेंद्र श्रीवास्तव यांचे 'दुःखाचे सावज' (२०१६) , स्वप्नांचे गणित(२०१९) ; कामतानाथ यांचा 'तिसरा बास'(२०१६); कथायात्रा -हिंदीतील निवडक ५१ कथा- खंड १. पंचवीस कथा :(संपादन : संतोष चौबे) (२०२२) , कथायात्रा -हिंदीतील निवडक ५१ कथा- खंड २. २६ कथा (संपादन: संतोष चौबे) (२०२२).
चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेल्या कादंबरी : साक्षीदार (जितेंद्र भाटिया ) , खंडित सूर्य (दामोदर खडसे),अंतहीन (जितेंद्र भाटिया) , सौदामिनी (मन्नू भंडारी) ,नाही सूर्य उद्याचा (मोहन राकेश), कोलाहल (दामोदर खडसे), अमृतानुभव (अमृता प्रीतम यांच्या तीन लघु कादंबऱ्या), नीलू, नीलिमा, निलोफर (भीष्म साहनी), उंदीर आणि माणूस (अबिद पक्ष) , वासकसज्जा (अबिद सुरती) , लोकशाहीची ऐशी तैशी (विभूती नारायण राय) ,बादलराग (दामोदर खडसे) , नरक मसीहा (भगवानदास मोरवाल) , नागमणी आणि नीना (अमृता प्रीतम) , एकांतगाथा (दामोदर खडसे)
,अरण्यरुदन (भालचंद्र जोशी (मध्यप्रदेश)) , मोनालिसा हसत होती (अशोक भौमिक),
विषाक्त ( अब्दुल बिस्मिल्लाह) .
चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेल्या चरित्र / आत्मचरित्र / मुलाखत / इतिहास वाङमय प्रकारातील साहित्यकृती - 'दि ॲक्ट ऑफ लाईफ' (आत्मचरित्र) अमरीश पुरी, 'चालत आलो दुरुनी मागे' (आत्मचरित्र) राजेंद्र यादव, 'बिछडे सभी बारी बारी' (गुरुदत्त यांच्याविषयी आठवणी) बिमल मित्र, 'गप्पा सिनेमाच्या' जावेद अख्तर(जावेद अख्तर यांची नसरीन मुत्री कबीर यांनी घेतलेली मुलाखत)),एका आदिवासीची कहाणी: लाल श्याम शाह यांचे चरित्र, स्मृतींची चाळता पाने (आत्मकथा) भीष्म साहनी , 'शानी: व्यक्तित्व आणि कृतित्व' डॉ. जे. पी. शर्मा, काश्मीर आणि काश्मिरी (पंडित अशोक कुमार पांड्ये) , काश्मीरनामा इतिहास आणि वर्तमान (अशोक कुमार पांडये)
अथांग रहस्य (एनमॅरी पोष्टमा), इत्यादी.
बालसाहित्य: 'सोना आईला मदत करते'( विनिता कृष्ण) ,पहिलवानाचा खेळ( संजीव जयस्वाल 'संजय'), 'एक छोटा सैनिक' (बाल कादंबरी) (विमल शर्मा) ,वीस वर्षांचे मरण (बाल कादंबरी)(वीर कुमार अधिर), हत्तीच्या कचाट्यात (बाल कादंबरी)(स्वदेश कुमार) ,आईचा पदर (बाल कादंबरी)( शांती भटनागर) ,खोटे नाणे (बाल कादंबरी)(अवतार सिंह).
विलास गिते, लछमण हर्दवाणी, चंद्रकांत भोंजाळ यांनी केलेले अनुवाद कार्य मराठीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे दिसते. अहमदनगरमध्ये सद्ध्या तरी ही तीनच नावे दिसत असली तरी काम मात्र मोठे आहे. भविष्यकाळात आणखी नवे अनुवादक जिल्ह्यात निर्माण होतील अशी आशा आहे.
○ समारोप :
अहमदनगर जिल्ह्यातील मराठी साहित्यिकांच्या एकूणच मराठी साहित्यातील योगदानाचा आढावा या लेखात घेण्यात आलेला आहे. तो घेण्यापूर्वी आधीची पार्श्वभूमी विचारात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कविता, कथा, कादंबरी, ललित गद्य, आत्मकथने, वैचारिक साहित्य आणि अनुवादित साहित्यातील अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांच्या कार्याचाही मागोवा त्या निमित्ताने घेण्यात आला आहे. गुणवत्ता संख्येवर मोजली जात नसते याचे भान प्रस्तुत लेखकाला असुन एखादी साहित्यकृती दुर्लक्षित होऊ नये म्हणून यथाशक्ती प्रयत्न केलेले आहेत. कोणत्याही साहित्यकृतीची चिकित्सा करणे, समीक्षा करणे हा या लेखाचा हेतू नसल्याने साहित्यकृतीवर भाष्य टाळलेले आहे. मात्र या आढाव्यातून सद्य काळातील लेखक कवींचा निर्देश त्याच्या साहित्याचे इतरांनी आवर्जून अवलोकन करावे यासाठी महत्त्वाचा आहे. अहमदनगर येथे १९९७ सालात झालेल्या साहित्य संमेलनानंतर प्रथमच अहमदनगर जिल्ह्यातील साहित्याच्या अनुषंगाने एवढा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. त्यासाठी मसाप च्या या विभागीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना (२०१७ अहमदनगर ) सदर परिसंवादासाठी धन्यवाद देणे गरजेचे आहे. सदर लेखात उल्लेखित साहित्यकृती व्यतिरिक्त आणखीही काही साहित्यकृती अहमदनगर जिल्ह्यातील लेखक, कवींकडून निर्माण झालेल्या असू शकतात परंतू माहिती अभावी त्यांची नावे या ठिकाणी समाविष्ट नसणार हे सहाजिक आहे.मात्र अशी नावे कोणी निदर्शनास आणून दिल्यास निश्चितच स्वागत असेल.
अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांनी मराठी साहित्याला भरीव योगदान दिल्याचे या लेखातून समोर येते. अहमदनगर येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१९९७) , पाथर्डी तालुक्यातील साहित्यप्रेमी मंडळींनी भरवलेली सतरा साहित्य संमेलने, शब्दगंध साहित्यिक परिषदेने दरवर्षी भरणारी साहित्य संमेलने, कोपरगावी झालेले जिल्हा साहित्य संमेलन, बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथील साहित्य संमेलने यांनी अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिक वातावरण निर्मितीला हातभार लावला आहे. त्याच प्रमाणे शब्दालय प्रकाशन, शब्दगंध प्रकाशन, गणराज प्रकाशन,अनुराधा प्रकाशन इत्यादींनी ग्रंथ निर्मितीसाठी मंच उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिक कार्य बर्यापैकी व्यापक आणि भरीव असल्याचे दिसते.
● संदर्भ :
१पैस स्मरणिका (७० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अहमदनगर १९९७ )
२ mr.Wikipedia
३ विविध लेखकांच्या साहित्यकृती, प्रवासवर्णने, आत्मकथने इत्यादी.
४ कवी शशीकांत शिंदे, अनिल सहस्रबुद्धे, आनंदा साळवे, बबाबासाहेब सौदागर व जिल्ह्य़ातील अन्य साहित्यिकासोबत केलेली स्वतंत्र दूरध्वनी चर्चा
५. चंद्रकांत भोंजाळ : परीचय पुस्तिका.
६ विविध संकेतस्थळे.
__________________________________________________________
डाॅ. कैलास रायभान दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव. ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन ४१४१०२ .
मो. ९८५०६०८६११ kailasdaund@gmail.com
अहमदनगर जिल्ह्यातील समीक्षक?
उत्तर द्याहटवाअहमदनगर जिल्ह्यातील समीक्षक, संपादक यांच्या कार्याविषयी माहीती मिळवून नंतर लेखात समाविष्ट केली जाणार आहे, त्याच बरोबर आणखी नवी माहितीही समाविष्ट केली जाईल.
हटवा