गाव : ऊब आणि धग भाग २
गाव :उब आणि धग (दुसरा लेख) प्रकाशित जुलै २०१८
//अस्वस्थ पायताणे //
कैलास दौंड
'गोधने चारावया ।जातो अनवाणी'
गावपांढरीतील कष्टाची कामे करणार्या कितीतरी लोकांना आपल्या पायात पायताण असावे असे वाटत असले तरी त्याची अत्यंतिक गरज वाटत नाही. त्यामुळे काट्यात जातांना, गवताळ बांधावरून चालतांना पायातील पायताणाचे अप्रूप वाटते. त्यातूनच एका मौल्यवान अलंकारासारखेच स्वरूप 'चपलेला' लाभलेले आहे. त्याच भावनेने जुन्या पिढीतील बायका वेशीतून आणि गावात माणसे बसण्याच्या चव्हाट्याजवळून जातांना पायातील 'वहाणा' हातात किंवा डोईवर घेऊन जात असाव्यात. पण जसजशी पुरूष माणसांची बिनकामाची चव्हाट्यात थांबायची सवय वाढली त्यामुळे त्यांचा विचार करणे त्यांनी कमी केलेले दिसते. असो.
बालपणी अनेकदा गाई -बैल आणि एखादी दुसरी बकरी घेऊन रानात चारावयाला नेल्याच्या अनवाणी आठवणी मनाला मोहवितात. काट्यांनी जणू पायाशी मैत्री करावी असे अभावाचे ऊन रानावर पांगलेले असे .पायात पायताण नसतांना, मोडके -खुडके काटे पायात सांभाळीत, त्यांच्या दुखर्या सलीला कुरवाळीत उन्हातान्हात, दगड धोंड्यात गावाच्या डोंगराचा कोनान् कोना हिंडून पायाखाली घातल्यावर सारं शिवार थेट खोल आतमधी उतरत होतं. कितीतरी झाडं, त्यांची नावं, विविध तर्हेचे पक्षी, किटक, माती, जंगली फळे यांची कोणी शिकवण्या शिवायच माहिती होत होती. गुराखी असणं हे सभोवारचा निसर्ग मनावर कोरून घेणं होतं. पाऊसपाण्याच्या दिवसात तर उधाण येतं अवखळ, अनवाणी उत्साहाला! पहिल्या दुसर्या पावसाने गाव तळ्यातील खड्ड्यात पाणी साठू लागते. वावरातील बांधाबांधात मातकट रंगाचे पाणी साचू लागते. डोंगर रानातले गवत जीवंतपणाने रंग बदलू लागते. गोधडी नावाच्या ऊबदार पसरट गवताने माळरान झाकले जाते. मग त्याची टिकली एवढाली लालफुले आभाळाकडे बघून हसू लागतात. गाई गुरांसाठी ही पर्वणी असते.
'शीतलवारा, हिरवा चारा
कुरणामध्ये कृष्ण सावळा '
मग कृष्णासोबत गोळा होते ते गोधन आणि सवंगडी. कुणाची गाय, कुणाची म्हैस तर कुणाची शेळी तर कधी कुणाचे बैल. आणि गुराख्यांचा मनोरम खेळ रंगू लागतो. या रंगभरल्या खेळाला एखाद्या शेतकर्याच्या हाकेने कापरे भरते. एखादी गाय जवळच्या शेतात जाऊन हिरव्या पिकाला खाण्यासाठी भीडलेली असते. मग डाव मोडतो. धावत जाऊन वळती हाणावी लागते. तर इवल्या -हिरव्या कोवळ्या पिकाचे लुसलुशीत कोंभ मोडल्यामुळे काळीज पिळल्या भावनेने शेतकरी त्या त्या नष्टप्राय झालेल्या पिकाच्या रोपापायी गुराख्याला शिव्यांची लाखोली वाहत राहतो. हे नित्याचेच. दररोज बदलतो तो लाखोली वाहणारा शेतकरी! शिव्या खाणारे गुराखी मात्र तेच. कधी ते तळ्यात पोहत असतात, कधी सुरपारंब्या खेळत असतात तर कधी गाणी म्हणत स्वप्नात हरवलेली असतात. एखादा नवा लगीनकरू गुराखी रेडीओ कानाला लावून
'किती जीवाला ऽऽऽ
राखायचं राखलं
राया तूम्ही जाळ्यात
पाखरू टाकलं '
असं मोठ्या आवाजातलं महानोरांचं गाणं ऐकत असतो. दिवस सरकत जातात. शेत लांबत जातं. चरावू रानं थोडी थोडी आकसत जातात. डोंगरांना सरकारी पौळी वेढतात. त्या कामासाठी गावकरी हातभार लावतात. बाया बाप्यांना रोजंदारी मिळते. पावसाळ्याच्या आधीच खड्डे खणले जातात. त्या खड्ड्यात रोप लावण्याच्या कामाला वेग येतो, पावसाळी वार्यासारखी होतं हलू लागतात.
'आता डोंगर हिरवागार होणार
भरपूर पाऊस येणार
गावच्या नद्या बारमाही वाहणार '
असं लोभस नितळ स्वप्न साऱ्यांच्या मनात रूंजी घालू लागतं. डोंगरात कुर्हाड बंदी सोबतच गुरांना चारायलाही बंदी होते. हळूहळू गावचं 'गायगवार' कमी कमी होत जातं.
आता कुणीतरी 'गोग्राम यात्रा' काढल्याचे कानावर आले. गाई पाळण्याचा धर्म शेतकर्यांनी हजारो वर्षांपासून सांभाळलेला आहे. तो कुण्याच्या सांगण्यातून नाही तर स्वानुभूतीतून जोपासलेला आहे. आज बंदिस्त जागेतच पशूपालन केल्याखेरीज आपल्या भारतभू मध्ये पर्याय राहिलेला नाही असे दिसते. जिथे मनुष्य जाती त्सुनामी सारखी वेगाने भूभागावर आदळत आहे तिथे नैसर्गिक संतुलनानुसार पशुधन कमी होणारच आहे. हे सारे विचार मघापासून डोक्यात घोळत होते. खरेच गावात गाई असतील तर दूध असेल आणि दूध असेल तर सशक्त माणूस असेल. म्हणून अप्रूप वाटून त्या यात्रेत गेलो तर यात्रेतूनच गाय निघून गेलेली दिसली. प्रत्यक्ष गोदर्शन घडवण्यापेक्षा केवळ पोस्टर्स आणि चित्रे यांच्या मदतीने हा यात्रेचा बेगडी प्रपंच! गावात पशुधन आहे पण ते अल्प आहे. त्यात पंचवीस टक्क्यापासून तर शंभर टक्क्यांपर्यंतच्या गायी आहेत पण संख्या किती तर पाच -दहा. चरावू राने ठेवणेच अशक्य तर पशुधन कसं सांभाळायचं? बैलांची जागा तर कधीच ट्रॅक्टरने घेतली आहे. कामाचा वेग आणि सफाई देखील त्यामुळे वाढली पण शिवारबांधावरील बैलांच्या खूरांचे जीवंतपणाचे अस्तित्व ठसे मात्र हरवलेत.
पोळ्याचा सण म्हणजे शेतकर्यांना हळवं करणारा सण. शेतीसाठी राबणाऱ्या वृषभाची पुजा करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातल्या खेरीज शेतकरी स्वतः घास देखील तोंडात घालत नसायचा. आज पोळ्याचा सण ;मी घराच्या छतावरून गावठाणात मिरवणूकीसाठी जाणारे बैल माझ्या लहानग्या मुलांना दाखवित असतो. अधुन मधुन घुंगुरमाळांचे आवाज करीत बैल गावठाणाकडे जातात. त्यांच्या अंगावर रंगीत नक्षी काढलेली असते. काहींच्या पाठीवर त्यांची नावे टाकलेली असतात. काही बैलांच्या पाठीवर झुली असतात. गळ्यात घुंगुरमाळा आणि हिंगुळ लावलेल्या शिंगांना छानदार फुगे बांधलेले असतात. हे सारे पाहून मुले आनंदतात. चला यांना एखादा पोळा दाखवून घ्यावा, असे मनात येऊन मी त्यांना घेऊन वस्तीवरून गावात जातो. मंदिराच्या समोर बैल उभे केलेले होते. ते पाहून मी अगदीच नकळत माझ्या बालपणात गेलो आणि तेव्हाचा पोळा माझं मन आसपास शोधू लागलं.
'मंदिराच्या भोवती, समोर आणि लांबवर वेशीच्या अंगांनी बैल धरून शेतकरी उभे असत .प्रत्येकाच्या जागा पिढ्यानपार ठरलेल्या असल्यासारख्याच. काहींच्या जागा तर मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या पाणंद रस्त्याने लांबवर असत. तेव्हा देऊळ माळवदाचं होतं आणि आतल्याआत मोकळं पटांगण देखील होतं. तिथं सुद्धा काहींचे बैल ऊभे असायचे. सजवून उभे केलेले बैल आणि घामाघूम झालेले शेतकरी असं उत्कंठा वाढवणारं चित्र पोळ्यांच्या सणाच्या संध्याकाळी दिसे. गावातले कोतवाल कोणाचे बैल मंदीराजवळ आणायचे राहिलेत का? याचा हाकारा देत. दरम्यानच्या काळात एखादा बैल धरलेला शेतकरी दुसर्याशी भांडण करी. लोक त्याला शांत करू पाहत तर काही म्हणत भांडण झाल्याशिवाय पोळा फुटायचाच नाही. वेशीतील तोरण तोडायचा मान गावातल्या बैलांना नव्हता तर गावदेवाला सोडलेल्या वळूला देवाचा नंदी म्हणून मान मिळायचा. सहाजिकच काही लोक दुपारपासूनच वळूच्या मागावर असत. एरव्ही माणसाजवळ थबकणारा वळू अशावेळी बावचळुन कुणाच्याही हाती न लागता सैरावैरा पळत राही. मध्येच कोणीतरी फटाके फोडी, त्या आवाजाने सजवलेले बैल बिथरत. त्यांना आवरून धरताना शेतकर्यांची तारांबळ उडे. मग ते हातातली काठी बैलावर उगारीत असत. बैलांना मारणे टाळण्याकडेच साऱ्यांचा कल असे; क्वचित हा राग घरधणीनीवर किंवा दुसऱ्यावर निघे. अशात 'वळू उर्फ कठाळ्या ' धरल्याची आरोळी उठे! लोक सावध होत .बायका लगबगीने एका बाजूला सरकत आणि मंदिराच्या चौथऱ्यावर उभा राहुन गुरव ' शूभ मंगल ऽऽऽ ' सुरू करी. वातावरण खूपच दमट होऊ लागे. मंगलाष्टके पूर्ण होताच वळूला तोरणाखालुन काढण्याचा प्रकार सुरू होई. त्याने एकदा का तोरण तोडले की मग बैलांची पळापळी सुरू होई. मंदिराला वळसा घालून मारूतीरायाच्या समोर बैल आणण्याची चढाओढ लागे. खांद्याला दाबुन मारूती समोर बैल बसवण्याची चढाओढ लागे. एखाद्यावर्षी अशातच खूप पाऊस सुरू होई. बैलांच्या पळापळीने आणि हगण्यामुतण्याने आधीच ओला झालेला परिसर पावसाने भिजून जाई आणि त्यातून अनोखा नाकाला झिंग आणणारा वास भोवतालात घुमत राही. ' हे सारे तेव्हाचे पोळ्याचे चित्र माझ्या समोर नाचू लागल्याने अस्वस्थता वाढली. त्यासरशी मी मुलांना घेऊन मंदिराच्या नव्याने बांधलेल्या सभामंडपात घुसलो. तेथल्या एका अर्धवट बांधलेल्या भिंतीवर मुलांना बसवून त्यांच्या बालपणीचा पोळा पाहू देऊ लागलो. मध्येच बैलांच्या शिंगांना बांधलेला एखादा फुगा फुटला की ती आनंदत. फटाक्यांच्या आवाजाने बैल बावरले की ती खुश होत. त्यात त्यांना आनंद वाटे. मी मात्र गावात आता शंभर देखील बैल राहीले नाहीत म्हणून सचिंत होतो. तर हा असा काळाचा महिमा. यांच्या मोठ्यापणी तर पोळा प्रतिकात्मकच होण्याची शक्यता अंगावर येते. आता 'कठाळ्या' धरणे अवघडच होते कारण गावची अशी मोकाट फिरणारी जित्राबं गावातल्या व्यवहारी लोकांनी विकून संपवलेली होती. गावात फिरणाऱ्या एखाद्या उनाड माणसालाच कठाळ्या करावा लागते की काय? असं उगीचच वाटतं आणि एवढ्यात हा प्रश्न देखील सुटतो. कुणीतरी एक मरतुकडं वासरू दाव्यानं बांधुन ओढीत देवळापुढं आणतं. त्या संकरित वासराच्या अंगावर गुलाल टाकत त्याला देवाच्या दारात मोकळं करतं. मग गावाला कठाळ्या मिळतो. त्याला तोरणाखालुन काढण्याच्या प्रयत्नात लोकच ओढून ते आंब्याच्या पानाचे ते तोरण तोडतात. आणि बैलांची थोडी पळापळ होते. पोळा फुटतो. मी मुलाला घेऊन घराकडे निघतो. आज मात्र पूर्वी सारखी पाऊस पडण्याची चिन्हे नव्हतीच. माझे लक्ष घराच्या दिशेने जाणाऱ्या पानंदीतील चिंचेच्या झाडाकडे जाते. रस्त्यावर झुकलेले हे चिंचेचे झाड मला कळते तेव्हापासून असेच ऊभे आहे. या झाडाला फारशा फांद्या नाहीत पण पालवी मात्र भरपूर असते. बालवयातील पोरासोरांना मात्र हे झाड म्हणजे एक टप्पा वाटतो. काहींना अंधारात या झाडाजवळ भिती वाटते. शेत शिवारातील आणि गावठाणातील झाडे माणंसाच्या इतकी अंगवळणी पडलेली असतात की ती आपलीच आप्त वाटतात. माझ्या गावात अशी निंदूर्खी, कडूनिंब, पिंपळ यांची झाडे आहेत. त्या त्या वृक्षाचे स्थान आणि महात्य लोक सांभाळून आहेत. पिंपळाखाली मुंजोबाचे ठाणे तर ब्रम्हनाथांच्या मंदिरासमोरील कडूनिंब लोकांसाठी दैवताप्रमाणेच गोड!
बालपणी मी मित्रांसोबत नदीच्या काठावर खेळायला जात असे. या नदीला पावसाळ्यात पाणी असे. तिच्या काठावर एक मध्यम आकाराचे वडाचे झाड होते. पावसाळ्यात पाणी वाहुन त्याच्या मूळ्या उघड्या पडलेल्या होत्या. मात्र त्याच्या पारंब्या अशा काही खाली लोंबलेल्या होत्या की त्यांना लोंबकाळून झोके घेतांना खूप मजा येई.त्याची गोडी लागल्यामुळे संधी मिळताच असे झोके घेण्यासाठी आम्ही मित्र नक्कीच त्या वडाकडे जात असू. कालपरवा त्या वृक्षसख्याच्या आठवणीने अस्वस्थ झालो .सूर्य मावळण्याचा वेळ असल्याने अंधार हळूहळू आपली गहनता वाढवत होता. नदीकाठाने अंधार गावात येत होता. वडाची हिरवी पाने काळसर दिसू लागली. कुणीतरी नात्यातली स्री वारली होती. खूप नातलग गोळा झालेले होते. अशा अंधार वाढणाऱ्या क्षणी तिचा अखेरचा प्रवास सुरू होता. माणसे निमूटपणे चालली होती. चार दोन रडणार्या बायांचा आवाज हळवं करीत होता . हा लवाजमा वडाच्या झाडाजवळ आला. आता तो वड बराच मोठा झालेला दिसला , अगदी प्रौढ. त्याच्या भोवती छानसा पार बांधलेला आहे. त्याला लागुनच दगडी घाट बांधलेला आहे. तिथूनच माणसं खाली नदीत उतरतात.
गावाच्या रिवाजाप्रमाणे त्या मृत बाईचं कलेवर वडाखालच्या पारावर विसाव्यासाठी टेकवलं तेव्हा मला अक्षरश: गलबलून आलं. याच वडाच्या पारंब्यांना झोके घेत आमचे बालपण सरकले त्याच वडाखाली अग्नीरूप होऊ घातलेली स्री क्षणभरासाठी अखेरची विसावली होती.माणसाच्या जगण्यात आनंद भरण्यात, त्याला विश्रांती, समाधान मिळवून देण्यात वृक्षाचा जसा मोठा वाटा आहे तसा मरणानंतरही शांती, विसावा देण्याची धमकी वृक्षात असल्याचे जाणवते.
आता संध्याकाळ गावावर उतरली आहे. माणसे शेतातून घरी परतत आहेत. घरांवर, झाडांवर अंधार काळोखी चढत आहे. गावातली तरूण मुलं पहाटे प्रमाणेच याही वेळेला गावाबाहेर पडणार्या रस्त्यावर पायात बुट घालुन धावण्यासाठी निघाली आहेत. अनवाणी बालपण घालवणाऱ्या आईवडिलांनी त्यांची इच्छा पुरवली आहे. कोणत्या ना कोणत्या भरतीत यश मिळवून त्यांना जगणं शाश्वत करायचे आहे. त्यासाठी ती जीवाच्या आकांताने धावतात. लांब -उंच उड्या मारतात. गोळा फेकतात. हर तर्हेच्या व्यायामाचा सराव करतात. गावावर येणारा काळोख त्यांनाही अस्वस्थ करतोय. त्यांच्या पायातील पादत्राणे त्याचा आधार आहेत.
========================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा