गाव : ऊब आणि धग भाग ४
गाव :उब आणि धग (सप्टेंबर २०१८ साठी) प्रकाशित सप्टेंबर.
□ मायेच्या कढाचं गवसेना पाणी!
" मायेच्या कढाचं गवसेना पाणी
गेली हरवूनी गावातली गाणी
बोलं बोलण्यात नाचतात नाणी
माणसांच्या ओठी गप्प झाली वाणी"
मायेचे कढ आतुनच उमलावे लागतात. उसना कळवळा सतत उघडा पडतो. सावत्र ते सावत्रच ठरतं शेवटी. पाऊस पडला की अंगाला लागलेला चिखल गळून पडणार हे तसं ठरलेलंच असतं. काळीजकुपीतून येणाऱ्या मायेच्या कढाची अमृतासम गोड गाणी गावा -शिवारात आता अभावानेच आढळतात. ती आढळली की खूप अप्रुप वाटतं. गाणी माणसाला जीवंत ठेवतात. माझ्या लहानपणी गावात पिठाच्या गिरण्या स्थिरावून काही वर्षे लोटली होती. त्यामुळे घरातल्या स्रीयांना भल्या पहाटेस उठून घरातील दगडी जात्यावर धान्य दळावं लागत नसे. मात्र तरीही लोकसाहित्याचा मोठा ऐवज ठरणारी जात्यावरील ओवी गीतं मुखोद्गत असणारी एक पिढी घरोघरी नांदत होती. त्यामुळे या ना त्या कारणाने ही गाणी ओठी येत होती. जणू जुन्या काळच्या खाणाखुणा अजून पुरत्या पुसल्या नव्हत्या. घरोघरी लागणाऱ्या पापडासाठी डाळी दळणं, उन्हाळ्याच्या दिवसात पापड्या करण्यासाठी ज्वारी, बाजरी दळणं, क्वचित विवाह प्रसंगी हळदी दळणं अशा कामांसाठी जवळपास प्रत्येक घरी 'जातं' होतं. त्यावर दळणारी आमच्या आईच्या वयाची महिलांची 'बॅच' होती. अर्थात हे दळणं कधीतरीच असे आणि सक्तीचेही नसे हे खरे. श्रवणसंस्कारातून त्याच्या काळजात उतरलेली काही गाणी त्यांना मुखोद्गत होती. अशा प्रसंगपरत्वे एक दोघी जात्याशी बसल्या आणि खुंट्याला धरून फिरवू लागल्या की घरघरीला गुंगवून टाकणारी लयबद्ध गाणी त्या गायच्या. ही गाणी ऐकत रहावीशी वाटे . नात्यांची एक लोभस वीण त्यातून उलगडत जाई. त्यातली बरीचशी गाणी अनुष्टुभ छंदातली असत. मला तर अनेक गाणी बहिणाबाई चौधरी यांच्या गाण्यासारखीच वाटत. लोकगीतंच ती समुहाचं मन व्यक्त करणारी! ती नादमधुर गाणी ऐकतांना पुरूष सुद्धा हरखून जायचा. कधी ही गाणी बंधूला उद्देशून असायची तर कधी मुलाला किंवा मुलीला उद्देशून असायची. कधी उपदेश तर कधी प्रेम भावाची पखरण त्यातुन असे. माहेराप्रती प्रेम आणि सासरचा जिव्हाळा या गाण्यातून ओसंडत असे. ही गाणी कधी लोकाचार तर कधी नीतिमत्ता शिकवत तर कधीकधी सासरला आडपडद्याने शिव्याही घालत. त्यामुळे गाणी गाणार्या बायांच्या मनातील भावनांचे विरेचन होऊन मनावरील ताण कमी होई. वात्सल्य, प्रीती, या भावांच्या गीतासोबतच कधीकधी अपरिहार्य असलेल्या मरणाचीही चाहूल लागे. त्यातही त्याकाळी 'अहेव' मरणाची अपेक्षा स्रीयांना असायची. त्यामुळे 'पुरूष' चोरून रडतांना गाण्यात दिसे. बर्याचदा आपल्या कारभारणीच्या अहेव मरणाची वार्ता तो शेतात काम करत असतांनाच त्याच्या कानी पडे. लगेचच औताला किंवा मोटेला जुंपलेले बैल तसेच ठेऊन आणि खांद्यावर आसुड असल्याचेही विसरून तो धावतपळत घराकडे निघायचा.
'असा जीव महा गेला ,पुरूष रडतो चोरूनी
गेला जल्माचा जोडा, नाही मिळत फिरूनी '
अशी ही गाणी व्याकुळही करून जात. वयात येऊ पाहणाऱ्या विशेषत: मुलींना आपल्या आईच्या - चुलतीच्या गाण्यांचं खूप अप्रुप वाटायच. ही गाणी त्यांना देखील पाठ करावीशी वाटत. तर विवाहादी समारंभातली गाणी नवरदेव, नवरी यांच्या असलेल्या व नसलेल्या रूपाचं नि गुणांच वर्णन करणारी असत. त्यात त्यांना भुलवणाऱ्या नानाविध उपमा दिलेल्या असत. अनेक शतकांचा वारसा लाभलेली ही लोकनिष्ठ भावकविता घराघरात वावरत होती व भावसमृद्ध करत होती.
केवळ स्रीयांचीच गाणी गावाला रिझवत, भरवत होती असे नाही तर पुरूषही रानात भलरी गात होते. इतर कामातही बैलांसाठी देखील त्यांची खास गाणी होती. बैल तर प्राणी असुन देखील गाण्याचा आवाज ओळखत.
नागपंचमीचा सण म्हणजे गाण्यांसाठी सासरवासणींना जणू पर्वणीच ठरे. सायंकाळच्या वेळेला घराबाहेर पडून मैत्रीणीत फेर धरून गाणी म्हणायला त्यांना घरातील कुणाची हरकत नसे. सासरच्या माणसांकडून, नणंदेकडून होणाऱ्या छळाची गाणी त्या बिनदिक्कत म्हणायच्या. कधीकधी तर नणंद देखील फेरात हेच गाणे गात असायची. ही गाणी कथात्म आणि रंजक तसेच उत्कंठावर्धक असल्यामुळे माणसे ऐकत राहत. रात्र वाढत जाई तरी गाणी संपत नसत. नागोबा या काळात त्यांचा भाऊ बणून राखण करीत असल्याचा या स्रीयांचा दृढ विश्वास असे. कधीकधी याच फेरगाण्यात कृष्ण -रुक्मिणीची संबंधाने कथा येई. हे सगळ नागपंचमी पंधरावीस दिवसावर आहे तोच सुरू होई. ऐकता ऐकता लहान मुलांना झोप येई. पण घरात एकट्याने झोपण्याची भीती वाटे. मग ती फेरीच्या जवळपासच खेळत बसत. या लहानग्यांना देखील गाणी आवडत . दिवाळीचा सणाची ते गाई वासराच्या गाण्यासाठी वाट पाहत असत. 'दिन दिन दिवाळी | गाई म्हशी ओवाळी ||' म्हणत गाईची आणि तिच्या वासरांची कौतुकभरली गाणी हातात काकडा घेऊन लहान मुले म्हणत तेव्हा गाईलाही हा अजब प्रकार बघुन गांगारायला होई. मात्र एक दोन दिवसात तिला त्या उजेडाची आणि गाण्यांची सवय होई. गाणी म्हणताना मुले शूर होत. 'दे माय खोबऱ्याची वाटी | लागण वाघाच्या पाठी ||' अशी गाणी म्हणत.
आजही गावात गाणी आहेत. पण ती गाणी माणसांच्या तोंडी कमी आणि यंत्रांच्या तोंडी जास्त आहेत. ही गाणी ऐकणार्याला शांतता देतीलच याची खात्री नाही. माणसामुखी गाणी नाहीत; गोष्टी नाहीत म्हणून मनात साचलेली जळमटं, किटाळ बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे आणि वाढलेली ओढाताण पेलवत नसल्याने दरसाल गावात एक दोन माणसं वेडी होतात. भरून आलेल्या आभाळाला मागावसं वाटतं ते एकच; ' धोंडी धोंडी पाणी दे | गावाला गाणी दे | '
गावातील माणसांचच गाणं हरवलय. एवढच नाही तर भरल्या घराच्या दारात येणाऱ्या मागत्यांचे , लोककलावंतांचं गाणं देखील कोमेजलय. माणसाचं मन अशा अप्रतिम लोकसंचिताला मुकलय. मागे एक प्राध्यापक भेटले, म्हणाले, " कसली लोकगीतं आणि कसल्या लोककला? भीक मागण्याच्या पध्दतीच होत्या त्या! "मला त्यांचे म्हणणे बरेचसे पटले. तरी त्या पध्दतीतील कलातत्व महत्त्वाचे ठरतेच हेही जाणवले. वासुदेव, पोतराज, गोंधळी, वाघ्या, मुरळी, पांगुळ, कुडमुड्या, मसणजोगी, रायरंद अशा अनेकांची गाणी हीच त्याच्या उपजिवीकेची सामुग्री होती. आता माणसे त्यांची उपजिवीका भागवेल एवढं देखील देईनात. पोटाची आग विझेना म्हणून लोककलावंतांचा कंठ सुका झालाय. कोणाचंही काही फुकट घ्यायचं नाही ही लोक कलावंतांची स्वाभिमानी भूमिका गावातल्या माणसांनी जणू गाण्यासकट बजून टाकली.
फार नाही पण अगदीच वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ नजरेसमोर आला तरी शब्दावर प्रेम करणारी गाव खेड्यातील माणसं स्पष्ट दिसू लागतात. मातीतून गवताचे कोंभ उगवून यावेत तसे माणसांचे स्वाभाविक गुणगुणने असे. दारिद्र्याच्या दशावताराने माणसांना चहूबाजूंनी वेढलेले, त्यामुळे वणव्यात हरिण सापडांवं अशी स्थिती झालेली. तरी माणसं भक्कमपणे गावात टिकून राहीलीत. नुसत्या पावसाच्या चाहुलीने वाढणाऱ्या गवतांच्या अंकुराप्रमाणे माणसं स्वप्न बघत हिरवे होतांना दिसत. कोठून त्यांना बळ मिळे? कोणते शब्द त्यांच्या जगण्याला मोहिनी घालत ?त्या शब्दात ताकद कोठून येत असे?
एके दिवशी मला एक छोटेखानी पुस्तक मिळते. जेमतेम पन्नासेक पानांचे. त्यात गाणी असतात. समाजवादी विचारांची भलावण करणारी प्रचारकी गाणी . मुखपृष्ठावर स्वातंत्र्याच्या ज्योतीतून निघालेला राक्षस तर पुस्तकाच्या मलपृष्ठावर गावातील माजी पोलिस पाटलांबद्दल गौरवोद्गार काढलेले. त्यामुळे बहुधा ही पाठराखण स्वतः गीतकारानेच केलेली असावी हे जाणवत होते. या गावाला स्वतंत्र लेखणाची सवय नाही. बहुतेक खेड्यांना ती नसतेच म्हणा. गीतकाराचे नाव होते साहेबराव! इंग्रजांच्या प्रभावाखाली वाढलेल्या पिढीने त्या गोर्या साहेबांच्या ऐटबाजीने भुरळून जाऊन आपापल्या पोरांची नावं रावसाहेब, भाऊसाहेब, साहेबराव अशी ठेवलेली; किंवा आपलं लेकरूही मोठेपणी असंच रुबाबदार होईल या भावनेतून ही नावं ठेवलेली. आमचा साहेबराव पोट जाळायला मुंबईला गेला. त्या मायावी महानगरातील वाट्याला आलेलं बकाल जीवन हक्कानं जगत राहीला. त्याचवेळी स्वत:ली माणुसकी आणि माणूसपण जीवंत ठेवलं.आपल्या जन्मभूमीचा अभिमान तो आजन्म अंगाखांद्यावर मिरवत राहीला. त्याला पहाडी आणि शाहिरी ढंगाच्या आवाजाची देणगी लाभलेली होती. समाजातील अन्याय, विषमता, हिन चालीरीती यांनी व्यथित होऊन आपल्या गीतांमधून त्यांनी कोरडे ओढले. स्वत:च एक पथक स्थापन केलं आणि मुंबईसह काही शहरातून आणि गावातून वेळ मिळेल तसा हा माणूस आपल्या विचारांना गात फिरला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्या माणसांच्या अंतरंगात उतरवत राहिला. ' मला माझिये गावीचा कुणी आप्त हा ' म्हणून या भल्या माणसाची एकदा भेट होईल तर बरं, असं अनेक दिवस वाटत राहिलं. काही वर्षांनी अचानक हा माणूस गावात आल्याचे कळले. मला आनंद झाला. वेळ संध्याकाळची होती पण मला त्यांना भेटण्यासाठी सकाळ होण्याची वाट पाह्यची नव्हती. माझ्या मनात प्रकाश पसरला होता जणू! त्यामुळे गावाबाहेर जाणारी पाणंद तुडवत साहेबराव ज्या घरी उतरले होते त्या त्यांच्या भावकीतल्या माणसाच्या घराकडे निघालो. घराच्या बाहेर चांदण्याच्या अंधुकशा उजेडात त्यांच्या भूतकाळ आठवणार्या गप्पा चालल्या होत्या. माझी चाहुल लागताच त्या थांबल्या. मी त्यांना माझा परिचय करून दिला; त्यांच्या शाहिरी बद्दल बोललो. मग तो माणूस रातराणीने मोहरून यावं तसा मोहरून आला. त्याच्या शब्दांना पहाडी आवाजाचा साज चढला आणि ती रात्र बऱ्याच उशिरापर्यंत शाहीर साहेबराव वाघमारेंच्या शब्दांत भिजत राहीली ;अस्वस्थ होत राहीली. मला त्यांच्या शब्दांची आणि जगण्याची अस्वस्थता हलवत राहीली. अण्णा भाऊ नंतर मुंबईची लावणी रचणारा आमचा साहेबराव, त्याचा आवाज कितीतरी वर्षानंतर गावाच्या वेशीत दुमदुमावा असं मला मनोमन वाटत होतं. साहेबरांनी माझ्या म्हणण्याला होकार दिला अन् आणि त्या दिवशी संध्याकाळी गावासमोर हा शाहिर काळजाच्या गाभ्यातून व्यक्त होत होता नि सारा गाव त्याच्या गाण्यावर खुश होऊन दाद देत होता; बिदागी देत होता.
शब्दांचं वेड गावातल्या माणसांना शांत बसू देत नव्हतं. श्रावणात तर हनुमानाच्या देवळात अजूनही रामविजय, हरिविजय, भक्तीविजय, असे ग्रंथ लावले जातात. पूर्वी ऐकायला येणाऱ्या लोकांना मंदिरात जागा पुरत नसायची पण आता बर्याचदा वाचनाऱ्याला फक्त मंदिरातील मुर्तीचीच सोबत असते. जवळच निंदुर्खीच्या झाडाखाली जगण्याची दिशा न सापडलेल्या तरण्या पोरांचा गलका चाललेला असतो. या भूमीत शब्दावर प्रेम करणारी माणसे होती ती आता कुठे गेली ते समजत नाही. गावोगावी भेटणारे वाघ्या, भराडी, वासुदेव, पोतराज असे कलावंत गावात येऊन घरोघर गाणी गात फिरत. आता त्यातून उपजिवीका भागेल इतकेही मिळत नसल्याने त्यांनी जगण्याच्या नव्या उजळ वाटा शोधण्याचा मार्ग धरला आहे. या वाटा त्यांना सापडायलाच हव्यात.
गावातील माणसे आता धड मनातून कोणाशी बोलतांनाही दिसत नाहीत. सारे वरवरचे आणि आपापल्या मतलबा पुरते. चार चांगल्या आणि रितीच्या गोष्टी सांगणार्या माणसांना घरात बसण्याची वेळ आली आहे. लष्कराच्या भाकर्या भाजण्यात कुणालाही रस नाही. गावात अखंड हरिनाम सप्ताह होतो. सात दिवस त्यात मुळीच खंड नसतो पण मनाला कुठेही आपण भक्तीरसात डुंबत आहोत असे वाटत नाही. सारे काही भावनेच्या कडेकडेने चाललेले आणि शब्दांचे म्हणाल तर ते तसेच कोरडे होत चाललेले. गावाच्या या रूपामुळे कोणत्याही माणसांशी बोलतांना जीव घाबरतो. मग पुन्हा आठवतात ते लोकलयींनी लदबदलेले दिवस. किती...किती गाणी. ..आईच्या ओव्या, सणांची गाणी, देवाची गाणी, लोकाचाराची गाणी यांनी कंठाची परडी अगदी काठोकाठ भरलेली असायची. एखाद्या निवांत क्षणी त्या परडीतुन एकेक गाणे बाहेर निघे तेव्हा स्वतःचा स्वतःला विसर पडे. जेष्ठ -आषाढात पंढरीच्या दिंड्या पालख्या गावातून जात अशावेळी आई म्हणे -
'सोन्याचा पाळणा ऽऽऽ
रेशमाची दोरी
हलविता राहीना ऽऽ
बाई गुंतले कामाला ऽऽ
परसरामाला बाई गुंतले कामाला ऽऽ'
हे गाणं आम्हा सगळ्यांना खूप भूरळ पाडीत असे. कारण 'परसराम ' हे आमच्या मोठ्या बंधूचं घरातलं नाव होतं. या गाण्यात आई ते नाव गुंफत होती असे नव्हे तर ते त्या गाण्यात होतेच. कधी दुपारी
'राम बसे पलंगी, लक्ष्मण जवळी
प्रसाद देतो बाई ग सत्यनारायण '
असं गाणं ऐकायला मिळे. किती किती ही लोकगीतं !खरं तर गाणी हाच एक संस्कार होता. गाण्याच्या जोडीने गावात अनेक कथा देखील असत. गावाचं शिवार नानाविध आणि सचित्र विचित्र कथांनी भरलेलं होतं. माणसं जीवंत माणसांना तर कथा सांगतच परंतू कधी कधी मयताजवळ बसून रात्र जागवण्यासाठीही कथा सांगत असत. लोक कानाच्या ओंजळी करून आता पुढे काय घडणार? अशी उत्कंठा जागवून कथा व गीतं ऐकत असत. आता व्यथेत बळ देणाऱ्या कथा कुणी कुणाला सांगत नाहीत. ही गपसप विरून गेलीय. एकूणच माणसांनी व्यवहारीपणाची झुल अंगावर चढवून ठेवली आहे. माणसांचे रंग पालटलेत. शब्दांचेही रंग उडत चाललेत. अर्थाच्या नानाविध छटांची ऐट मिरवणारे शब्द भलतेच मऊसूत आणि गुळगुळीत होऊ लागलेत. शब्दांना मळ लावणारे नित्याने भेटू लागलेत. 'शब्दे वाटू धन । जनलोका ॥ ' म्हणणारा तुकाराम .मुकामुका गाव पाहिला की हजारदा आठवत जातो हेच खरे. आत्ता नुकतेच जळगाव येथील विद्यापीठाला 'बहिणाबाई चौधरी 'यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. गावमातीच्या शब्दांचा हा गौरव वाटतो मला. आता इथुन गावखेड्यातील लुप्त होत असलेल्या लोकसंचिताची देखील सजग चिंता वाहिली जावी. मग मायेच्या कढाचे स्नेहार्द शब्द नक्कीच हाताशी -कानाशी येऊ शकतील.
==============================
डाॅ.कैलास दौंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा