गाव : ऊब आणि धग भाग ११
○ गाव एक संस्कृतीचा खेळ. (११) ऑगस्ट १९
डॉ. कैलास दौंड .
ईठाबाई वारली. गावभर फिरायची. शेवटी वेडी झालती. कुणाशीही खूप वेळ बोलायची. बोलता बोलता मधूनच गाणं म्हणायची. दुपारच्याला भूक लागली म्हणजे रस्त्याने चालतांना एखाद्या बाईला म्हणायची, " अगं भाकर तरी खाय म्हण !" गावातलं कुणीही तिला परकं वाटायचं नाही. सगळे आपलेच वाटायचे. ईठाबाई गेली. गावातल्या सगळ्याच माणसांनी तिच्या आठवणी उगाळत हळहळ व्यक्त केली. बदलत्या काळातही माणुसकी जीवंत असल्यासारखे वागणार्या ईठाबाईचं रूपडं माझ्याही डोळ्यासमोर तरळलं मात्र.
चांगला बारा- पंधरा वर्षाचा असेन तेव्हा पासून तिला मी ओळखायचो. त्याही वेळी ती गावभर बिनधास्त फिरायची. बायका पोरांनी मोकळेपणाने बोलायची. समोरून एखादा वयस्कर गडी माणूस आला म्हणजे डोक्यावरचा पदर नीटनेटका करायची; त्यांचा मान राखण्यासाठी घडीभर बोलणं थांबवायची. आलेला माणूस सरळ निघून जायचा. असं हे तिचं गाव गाऱ्हाणं सदानकदा चालू असायचं. अंतर्बाह्य बदलत चाललेले गाव तिच्या लेखी अजून आधी इतकेच मायाळू आणि जीवंत होते.
गावातल्या मंदिराचं नवंकोरं बांधकाम सुरू झालं होतं. पैशाअडक्याचा हिशोब मोतीलाल नावाच्या गावतल्याच व्यवहारी माणसाकडं ठेवला होता. तेव्हा ईठाबाईनं तिला येत असणाऱ्या ग्रामदैवताच्या गाण्यात मोतीलालचही नाव तिनं गुंफलं आणि जमेल तसं गाणं सुरूच ठेवलं. गावातील मोठ्यात मोठे काम म्हणजे मंदिराचे काम. त्याचा कारभार पाहणारा माणूस जणू गावाचाच कारभारी, अशी तिची भावना. गावात चार आड होते. पैकी एक नाथांच्या मंदिराजवळ असल्याने 'नाथांचा आड ' म्हणून ओळखला जाई. जवळच मारोतीचं मंदिर . रामपहाऱ्यात मंदिराकडे आलेली विठाबाई म्हणे,
"सकाळच्या पारी । कोण करी हरी हरी ॥
नाथाच्या ग आडावरी । मारोती आंघोळ करी ॥ "
कितीतरी लोकगीतांची तिच्या तोंडातून पेरणी होत राही. आषाढ श्रावणात पावसानं ताण दिला की लहान पोरा पोरींना सोबत घेऊन संध्याकाळी तिची मोहिम सुरू होई. 'धोंडी धोंडी पाणी दे...' म्हणत. घरोघर आणि दारोदार हा घोळका धोंडी घेऊन फिरे. लोकांकडून मूठपसा मागून घ्यायला ती विसरत नसे. पाच -सात दिवसात अनायासे पाऊस पडला म्हणजे; आपल्याच तपश्चर्येने पाऊस पडला असं समजून गोळा झालेल्या धान्याचा गुळ विकत घेऊन घरोघर वाटायला ती कधीच विसरली नाही. कधी कुणाबद्दल वाईटवकटं न बोलणारी आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल न सांगणारी ईठाबाई गावात मात्र लोकसंस्कृती जपतराहिली. ती तिची अंगभूत वृत्तीच होती जणू.
जशी ईठाई तशीच रंभा ! किती पाळणे, गाणी, गाळणी येत होत्या तिला. पाडव्याच्या दिवशी एखाद्याच्या लेकराचे 'नाव ' ठेवायचे आणि अशा कार्यक्रमाला रंभाबाईची हजेरी नाही असं सहसा होत नसे. रामाचे, कृष्णाचेच काय पण लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजींचेही पाळणे म्हणायची ही माय! मला हमखास आवडायचा तो पाळणा म्हणजे संत भगवानबाबांचा पाळणा! ती ज्यावेळी पाळणे म्हणे त्यावेळी तिचा सुरेल आवाज लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सार्या गावभर घुमायचा. ऐकणारे तल्लीन व्हायचे आणि न ऐकणाऱ्यांना ते ऐकावसं वाटायचं. कोणीही बोलवलं तरी तिने कधीही कंटाळा केला नाही की कधी मानधन मागितलं नाही. घरी जाऊन बोलावलं तरी यायची नाहीतर लाऊडस्पीकरवरून पुकारलं तरी यायची. आता रंगाचं कुटूंबही गाव सोडून गेलयं. गावातली गाणी क्षीण होत जात हरवलीत आता. गावातल्या तरूणांकडे असणाऱ्या मोबाईलमध्ये भरलेल्या गाण्यांच्या झोकात आणि तालात पिढी पोसते आहे. दररोज सांजच्याला मद्यपींच्या शिव्यांचे लोकसाहित्य मात्र कधी कानी पडेल याचा मात्र नेम राहीलेला नाही.
गावात पूर्वी विवाहादी कार्यात तेल पाडणे, नवर्या मुलाला नि मुलीला स्नान घालणे अशावेळी अनेक गाणी गायली जात असत. आता काळ खूपच गतिमान झालाय. टाईमपास करण्याऐवजी कमी वेळात जास्त काम करण्याची गरज वाटू लागली आहे. त्यातुन कामाचा वेग वाढून जगणचं यंत्रवत झालं आहे. गावं पद्यमयता सोडून शहरागत गद्य आणि कोरडी होत गेली आहेत.
गावाने एकोपा, परस्पर सहजीवन, इर्जिक, बलुतेदारी आदी बाबींचा जाणीवपूर्वक त्याग करण्याचे धोरण अवलंबविले आहे. सहाजिकच प्रत्येकाच्या मनात काहिसी तुटलेपणाची भावना आणि आपल्या जवळच्या व्यक्तीशी स्पर्धा करण्याची वृत्ती निर्माण झालीय. काही बाबींचा त्याग करत असतांनाच देवाधर्माच्या नावावर माणसं गोळा करण्याच्या प्रकाराला मात्र गावाने डोक्यावर घेतले. या मागे आहे ती नैसर्गिक एकतेची भावना. गर्दीपासून तुटत चालल्याची भावना. त्यामुळे जत्रा, यात्रा, सप्ताह म्हटलं की गावाच्या आनंदाला भरतं आल्यासारखं वाटतं. मात्र हे भरतं पुराच्या आधी येणाऱ्या जिभाळी सारखं असतं. तुटल्या मनाला पुन्हा समूहात आणता येईल अशा या गोष्टीची गावाला अजुनही भूरळ पडते. त्यासाठी आर्थिक झळ सोसण्याची देखील तयारी त्याची असते. त्यामुळे गावानं आपण एक आहोत या भावने सोबतच आपल्या गावाचा नामसप्ताह शेजारच्या अन्य गावापेक्षा चांगला झाला पाहिजे असा स्पर्धात्मक अहंकारही जोपासला आहे.
गावाने काही नव्या गोष्टी तत्पर स्विकारल्यात, काळाची पाऊले ओळखल्या सारखं शहाणपण वाटावं अशी साधनं घराघरात दिसतील. टिव्ही सोबतच डिश आणि सीडी किंवा डीव्हीडी प्लेअर, पेनड्राईव्ह प्लेअर यांचं दर्शन घराघरातुन घडतयं. करमणुकीची साधनं उपलब्ध झालीत. मोबाईल तर बोलण्यापेक्षा इतर कामासाठीच अधिक वापरला जाऊ लागलेला आहे. माणसं देखील कष्ट करून चार पैसे अधिक मिळवू लागलीत. आपापल्या मुलांना शिक्षण देऊ लागलीत. भविष्याप्रती कधी नव्हे ती सजग झालेली ही माणसं किती गोजिरवाणी आणि मोहक वाटावीत नाही का? पण तसे होत नाही. कुठे कुठे या मोहकतेवर बसून अशूभाचे भुंगे सौंदर्याचे शोषण करतांना दिसतात. पिकावर आलेल्या रोगांचे कीटकनाशक फवारून उच्चाटन करता येईल पण मनःपटलावर बसलेल्या भुंग्याचे काय? असं बर्याचदा गावातील माणसांच्या सहवासात असलं म्हणजे अनेकदा वाटत जातं.
जुन्याचा त्याग आणि नव्याचा स्विकार या प्रक्रियेची फुलपाखरं बागडत असतांना काही त्याज्य गोष्टीचा भुसा मात्र गावाचं 'खळं' आवतून बसलाय. गावात कित्येक घरात भावकी बद्दल आकस आणि जळावू स्पर्धा आजही दिसते. सारा गाव चंद्रावर गेला तरी चालेल पण आपल्याच भावकितला कोणी जाता कामा नये, यासाठी स्वतःच्या अंगाला काळं फासून ग्रहणाची भूमिका निभवायची तयारी असणारे आणि त्याचे विनाकारणच भूषण वाटणारेही लोक गावात नांदत असतात. काही गोष्टी आनंदात तर कधी गोष्टी मन मारून स्विकारत असतात. गावातील अंधश्रद्धा माणसाची मनं सोडायला तयार नाहीत. आता शिवारात लोखंडी नांगर फिरलेत. सारीकडे वीज फिरली, आता गाव -शिवारात भुतं राहिलेली नाहीत अशा प्रकारचं अंधश्रद्धा ठेवणारं बोलणं गावात अनेकदा बोलतात आणि मनातलं भूत मात्र कायमच ठेवतात. ते कधी मानगुटीवर बसेल सांगता येत नाही. जी गोष्ट अंधश्रद्धा आणि नवस सायासादी विश्वासाची तीच रोजच्या जगण्याचीही!
सासुरवास नावाचं फॅड काहीसं रूप बदलुन घराच्या आसपास फिरतच आहे. फरक इतकाच की हा सासुरवास सासु- सासर्यांचा शक्यतो नसतो. तो अपेक्षांचा असतो. कधीकधी इच्छाधारी पती त्याच्या बायकोला माहेरातून हे आण ते आण चा तगादा लावतो आणि त्यासाठी तिचा छळवाद मांडतो. त्यातून कसले कसले प्रसंग उभे राहतात. घराची शांतता संपते. तिथे कसले स्थैर्य आणि कसली लक्ष्मी? सात आठ वर्षात एखादा तरी हुंडाबळी झाल्याखेरीज राहत नाही.
शिक्षणामुळे माणसं खूप व्यवहारी झाली. मुलींचं प्रमाण कमी झालं. मुलींना द्यावा लागणारा हुंडा कागदोपत्री बंद झाला तरी लग्नाचा खर्च म्हणजे मुलीच्या बापाचा सौदाच जणू. त्याला त्याचं जगणं आणि भोगणं चुकत नाही. गावात स्वीकृती आहे; त्याच सोबत काही विकृती देखील आहेत. यांच्या मेळातून साकार झालेली संस्कृती गावाला गती देत पुढे रेटत राहते गाव जगत राहतो. नव्या वाटा जुन्या संदर्भाने शोधत राहतो, हे नक्की!
इथली माणसे म्हणजे संस्कृतीचे आणखी एक रूप! त्यांच्या बद्दल सांगायचे तर - ' काळ्या कातळाची माणसेही इथे
कोवळेपणाने लाजे तृणपाते.' असे म्हणता येईल.
गावातील वयस्कर असणारी मोठी माणसे आमच्या लहानपणी आम्हाला खूपदा भीतीदायकच वाटायची. रोजच्या जगण्याच्या ओढताणीने वैतागलेली माणसे लहानमुलांशी फारसे प्रेमाने, मायेने बोलायचेच नाहीत. त्यांचा राग इतका अनावर असायचा की मग त्याचा परिणाम म्हणून ते लहानग्यांना मुळीच आवडायचे नाहीत. कठीण काळ्या खडकासारखी रापलेल्या चेहर्याची माणसे गावात हमखास भेटत. आजही गावात दिसतात काही तशी माणसे. आमच्या घरात अशी प्रौढ गडीमाणसे चार. त्यातील दोघे कडकनाथ म्हणून लहानमुलांचे नावडते. ते तरी काय करणार? रोजच्या धावपळीत आणि कुटूंबाची हातातोंडाशी गाठ घालून देण्याची धडपड करता करताच त्यांचीच कोवळीक वाळून गेली होती. इतक्या तितक्या कारणांसाठी शिव्यांची लाखोली वाहणे हा तर खेड्यातील प्रघातच म्हणावा इतका अंगवळणी पडलेला प्रकार! अशा वातावरणात शांत तरी कसे बसावे हा प्रश्न बच्चे कंपनींना अवश्य पडत असे. जत्रा यात्रा व गावातील पालखीदी उत्सव म्हटले की आपल्यालाही घरच्या माणसांनी थोडे पैसे द्यावेत असे लहान मुलांना मनातून वाटायचे. गावातल्या काही मुलांना त्यांच्या घरून पाच -दहा रूपये हमखास मिळायचे आणि आमच्यासारख्या अनेकांना मात्र घरच्या माणसांना पैसे मागण्याचे धाडसच होत नसायचे. फार क्वचितच रूपया - आठाणे (त्यावेळी चलनात असणारे पन्नास पैसे) मिळायचे तरी तेवढ्यानेही आकाश हाती आल्याचा आनंद व्हायचा. पैशाचे फारसे आकर्षण नव्हते म्हणा पण घरच्यांनी जत्रेला जाण्यासाठी दिलेली ती अधिकृत परवानगी वाटायची. सदानकदा रागावणे, इतर माणसांना शिव्या हासडणे, त्रागा करणे असे प्रकार सततच सभोवती होत असल्याने 'घरोघरी जमदग्नी जन्मती' चा प्रत्यय आल्यावाचून राहत नसे. घरातली या प्रकारातली व्यक्ती गावा- शिवाला गेलेली असली म्हणजे कसे मोकळे मोकळे वाटायचे आणि दिवस कलतिला गेला की मनात पुन्हा भिती हळुहळू घर बांधायला लागायची.
आज तिच माणसे वयस्कर झालीत आणि त्यांना इतकी कोवळी पालवी फुटलीय की ही कधीकाळी खूप खूप रागीट माणसे होती , हे सांगूनही पटू नये. पंचवीस तीस वर्षापूर्वी चुकूनच एखादा जनास्वामी किंवा त्रिंबकभाऊ सारखा मवाळ माणूस भेटायचा, बाबुराव सारखा माणूस विनोदी बोलून समोरच्याची फिरकी घ्यायचा तेव्हा किती आवडायची ही माणसे! त्यांना नुसतं पाह्यलं तरी बालमन फुलायचं सुखायचं!
खेड्यातल्या माणसांचे स्वभाव हा देखील तिथल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. आज जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साठमारीचे स्वरूप बदललेय. कालच्या पिढीच्या खांद्यावरील भार हलका झालाय. तो पुढच्यांनी डोक्यावर घेतलाय. जणू खडकाचे वरचे कठीण कवच निघून जावे आणि अमृतासम पाण्याचा खळाळ नजरेस पडावा असं झालयं वयस्कर माणसांचं. आता कुठे त्यांच्या जगण्याला स्थिरपण येऊ घातलय. पण त्यासोबतच रिक्तताही येऊन भिडलेली! काल परवा पर्यंत आपल्या स्वतःच्या मुलां-बाळांवर हरघडी खेकसणारी माणसं आपल्याच नातवंडाशी इतक्या काही अकृत्रिम जिव्हाळ्याने वागतात की दुष्काळानंतरचा पाऊस! अवघ्या धरणीला चिंब करणारा! आपल्याला बालवयात भितीदायक वाटणारी ही माणसं आणि हे त्यांचं मूळ रूप! जे त्यांच्यावर पडलेल्या जबाबदारीनं आणि ओढग्रस्ततेनं त्यांनाही कधी दिसू शकलं नसावं.
आता ही वयस्क माणसं नातवांच्या चालीने चालतात, त्यांचे हट्ट पुरवितात, त्यांच्याशी खेळतात, त्यांना गोष्टी सांगतात, त्यांचे कुतुहल शमवितात. इतकेच काय पण घरातल्या लहानग्यांना कुणी रागावलं की ते त्याची हजेरी घेतात. म्हणजे बघा हे असे अनाकलनीय परिवर्तन त्यामुळे घरातील लहान मुले त्यांचाच आधार शोधताना दिसतात. खेड्यात शहरीकरणाचा वारा घुसला असला तरी पुरता भिनलेला नसल्याने या कोवळीकीला अजून थोडीफार जागा आहे आणि ती या ना त्या कारणाने कमीकमी होत आहे.
खेड्यातील वयस्कर माणसं हा ग्रामसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. घरातील एखादं लहान मोठं माणूस आजारी पडलं की ही एकेकाळची कडक आणि निष्ठूर वाटणारी माणसं जराही विलंब न लावता दवाखाना गाठायला लावतात. त्यासाठी खूप हळवी होतात आणि स्वतः आजारी पडली की दवाखान्याचे भय बाळगतात. जीवनाचं, जगण्याचं असं आकलन त्यांना या टप्प्यावर झालेलं असतं. त्यांच्या खडतर जगण्यामुळेच त्यांच्याकडून राहून गेलेल्या गोष्टीचं मोलं त्यांना अधिक वाटत असतं. असे हे कठीण कोवळेपण!
घरातील नातवंडे वर्ष - सहा महिन्यासाठी घराबाहेर जात असल्यास त्यावेळी हिच बुजुर्ग माणसं हळवी होतात. मुलांना जपा, त्यांच्याकडे लक्ष द्या, हलगर्जीपणा करू नका अशा सुचना देत राहतात. मग नातवंडांना ' तुला गावाला गेल्यावर करमेल का? असा देखील प्रश्न विचारतात. स्वाभाविकपणे लहानमुले या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देतात. मग मात्र म्हातारे अधिकच दुःखी होतात. खरेतर घरात लहान मुले नसल्यावर त्यांनाच करमणार नसते हेच खरे.
म्हातार्यांचे एकटेपण ही नवीच समस्या अलिकडे निर्माण झाली आहे. गावात आठ- दहा घरे अशी आहेत की त्यांत फक्त वयस्क जोडपेच तेवढे राहते. घरातल्या तरूण आणि प्रौढांनी पोटासाठी स्थलांतर केलेले असते. त्यामुळे काहीतरी हरवल्या सारखी ही बुजुर्ग दिवस रेटीत राहतात. त्यांना भौतिक कुठल्या गोष्टीची कमतरता नसते परंतु त्यांच्या जगण्याला माणूसपण लाभते ते दिवाळी, जत्रा -यात्रा असतांना घर भरलेले असतानाच. कुणाही माणसाला समजून घ्यावे एवढा समजदारपणा या वयस्कर माणसांच्या अंगात उतरलेला असतो. ऐन उमेदीच्या आयुष्यात आपल्याच मस्तीत जगलेली माणसं उतारवयात जगातील सगळ्याच माणसाचे मंगल चिंतितात. वाळल्या गवताला नवथर पालवी फुटावी अन् जीवंतपणा यावा असं हे जगणं. खरे तर ही पालवी जपायला हवे, तिचे हिरवेपण टिकवून ठेवायला हवे. एकाच माणसाची वयपरत्वे आणि प्रसंगपरत्वे दिसणारी ही दोन रूपे आणि त्यामागील कार्यकारण समजून घेता आला तर किती सुंदर! आपल्या जगण्याच्या लढाईतच अनेकदा ओढताणीचे आणि अभावग्रस्ततेचे वार अंगावर झेलून हतबल होऊन राहणाऱ्या माणसाला आपल्या मूळ स्वभावावर येण्यासाठी थेट उतारवय गाठावे लागते.
अशी ही कितीतरी काळीकभिन्न माणसे, कुणालाही न घाबरणारी, किमान तसे भासवणारी. स्वतःच्या मोडक्या तोडक्या परिस्थितीवर स्वार होऊन हिमतीने कालक्रमण करणारी, स्वत्व कायम ठेवण्यासाठी कुटूंबावर हुकुमशाही गाजवणारी. तीच पुढे कशी लोकशाही स्वीकारतात आणि त्यात रममाण होऊ पाहतात याची खूप गंमत वाटते. किती ही कोवळीक अगदी गवताच्या पात्याहून अधिक. थेट मायेच्या नात्याईतकी गहन! खडकातून वाहणारा हा अखंड अमृताचा झरा. ...खूप दिवसांनंतर दिसलेला पण मूळचाच!
गावच्या गाण्यापासूनचा मनापर्यंतचा हा छोटासा प्रवास गावातील आजच्या संस्कृतीकडे बघायला भाग पाडतो. गाणी आणि पाणी हरवलेली गावे सर्वत्र नजरेस येतात. बेरोजगार तरूण आणि म्हातारे यांच्या साक्षीने गाव जागते आहे. या चौफेर टापूत माहेराची उब आणि सासरची आस दिसत नाही. शहरी पेहरावाची कोरडी गावे मनाला भीती दाखवत आहेत. अधून मधून सुखावणारे क्षण डोकावतात पण डिजेच्या आवाजाने तिकडे लक्ष स्थिरावत नाही हेच खरे! कधीतरी पडणार्या पावसाने नदी कधीतरी ओली होते. गाव संस्कृती देखील कथा गीतांनी, मोकळ्या संवांदांनी फुलण्याची वाट पहात आहे. वाळल्या गवताला नवथर पालवी फुटू शकते तर गावाला का नाही?
******
*******
डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा