गाव : ऊब आणि धग भाग ८
गाव : उब आणि धग (मे २०१९)
□ युवका, तुच किरण प्रभातीचा!
डाॅ. कैलास दौंड
गावातल्या पूर्वजांनी आपापल्या पोटाला चिमटा घेऊन गावात देवळे बांधली. गावात देवळासारखी ऐसपैस आणि चांगली घरे कोणालाही नव्हती. गवताकाड्यांची झोपडे आणि चिखल मातीच्या भिंती अशा घरातील शहाण्या माणसांनी वेळप्रसंगाची सोय म्हणून गावात चार दोन मंदिरे बांधली. नाहितर ही चराचर सृष्टीच ज्याने निर्माण केली अशा देवासाठी माणसाने निवार्याची सोय करावी म्हणजे काय? मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मग देलळातच पोथी, पुराण, भजन -पुजन असे कार्यक्रम सुरू झाले. मंदिरापुढच्या मोकळ्या पटांगणात भजन -पुजनाचे कार्यक्रम होऊ लागले. देऊळ आणि देलालयाचा परिसर हा माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि भावनेचा विषय बणला. सकाळ संध्याकाळ गावात राहणारी माणसे देवदर्शन केल्याशिवाय कोणतेही काम करत नसतं. कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या कामाची सुरूवात शांत -मनाने आणि प्रसन्न चित्ताने व्हावी अशी धारणा होती. या धारणेचे मनावर संस्कार झालेले जे लोक गावात आहेत ते आजही नित्य नियमाने देवळासमोर जाऊन पायातली पायताणे काढून देवळातील सर्वश्री हनुमान, ब्रम्हनाथ , शनैश्वर, साधुबाबा, मुंजोबा यांना हात जोडतात आणि त्या त्या परिसराच्या स्वच्छतेची किंबहुना आपल्याकडून अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतात. पण या परिसरातील सकाळ संध्याकाळ असणारी शांतता आता पार हरवून गेली आहे. या वातावरणात जाऊन मन प्रसन्न होण्यापेक्षा क्षणोक्षणी उद्विग्न होते. अशांत होते. देवळाच्या नव्या घाणेरड्या रूपावर नाराज होते. सकाळी सकाळी देवळांकडे निघाल्यावर खेड्यातील स्वच्छ आणि मोकळी हवा अंगात तरतरी आणते. चिंचेच्या, निंबाच्या झाडावरून पक्ष्यांचे आवाज कानावर येत राहतात. नेमका याच वेळी भल्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर सुरू होतो. त्यावर अभंग, गाळणी किंवा कधीकधी किर्तनाची ध्वनीफित सुरू असते. काही गोष्टीचा उपभोग घेण्यापेक्षा ती वस्तू आपल्या जवळ आहे याचेच संचयी समाधान हे अधिक असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे की काय पण गावाच्या सीमा भेदून; गावकर्यांच्या कानाच्या पडद्यावर भयंकर आघात करून हा आवाज पंचक्रोशीत दूरवर जातो. मग या असल्या रेकॉर्ड वाजविण्याने ना कोणाच्या मनाला शांती मिळते, ना कुणाला समाधान! उलट या अनैसर्गिक आवाजाने रोजच्या कामाचेही माणसाला काही सुचत नाही. माणसे चिडचिडी होतात. त्यातून सावरत, सांभाळत देवाला हात जोडण्यासाठी 'त्या मोठ्याने आवाज करणाऱ्या लाऊडस्पीकरच्या सुत्रधाराला सद्बुद्धी दे .' असं साकडं घालण्यासाठी जावं तर मारुतीच्या देवळाच्या पायर्यांवर पाय ठेवायलाही जागा नसते. या आठ -दहा पायऱ्यांवर गावातील पंधरा ते वीस- बावीस वयोगटातील युवाशक्ती ठाण मांडून बसलेली असते. त्यांच्या हातात चीन सारख्या शेजारी देशातून आलेले भ्रमणध्वनी असतात. काहींकडे ते स्वदेशीही असतात. त्यातील स्मरणपट्टीवर काय काय साठवलेले असते त्याचा आणखी मोठ्या आवाजात धुडगूस असतो. आपल्या जवळ जे काही आहे ते अत्यंत मौल्यवान असून त्याचा दुसऱ्याला आस्वाद देण्याचा परोपकार केल्याचा निर्ढावल्यागत भाव त्यांच्या चेहर्यावर दिसतो. आपला मुद्दामहून मंदिराकडे येणाऱ्या माणसांना काय त्रास होत असेल याचा विचारही या मुलांच्या मनाला शिवत नाही. स्वतःच्या भविष्याशी असे क्रूरपणे खेळणाऱ्या मुलांबद्दल हळहळ वाटण्या ऐवजी त्यांच्या उद्दामपणाबद्दल राग येतो. त्यातच वयसनांच्या वादळात ही पोरं पुरती भेलकांडली आहेत. गावात तंबाखू खाऊन जागोजाग थुंकणारा फार मोठा वर्ग होता. हे व्यसन काळ्या मातीत हरळीच्या मुळ्या रूताव्यात इतके खोलवर रूतलेले असे की आपले तंबाखू खाणे हे व्यसन आहे हे सांगुनही खरे पटत नसे. आता या नव्या पिढीने तंबाखू ऐवजी मावा, गुटखा असल्या व्यसनांना आपलेसे केलेले आहे. या व्यसनाची वारंवारीता कमालीची वाढली आहे. त्यामुळे ही पिढी कधी आणि कुठे अचानक तोंडातली घाण थुंकेल याचा काहीही नेम नाही. आपण थुंकलेले कुणाच्या अंगावर जाते की काय याचाही ते विचार करणार नाहीत, सार्वजनिक जागा, रस्ते याच सोबत या मारूतीच्या मंदिराचा परिसर , त्याचे ओटे आणि भिंती यावरही ते थुंकल्यामुळे त्या त्या ठिकाणी रक्तापेक्षा देखील गडद लाल रंगांचे किळसवाणे डाग पडलेले आहेत. त्यांचा एक उग्र दुर्गंध येत राहतो. .. आणि थुंकणाऱ्यांचे तोंड तर कधीचेच घाणीचे आगार बणल्यासारखी परिस्थिती. त्याच्या जवळ जाताच शिसारी आणणारा वास थेट मस्तकात भिडतो. या वासाने निर्व्यसनी माणसाला अस्वस्थ वाटायला लागते.
'देवळाच्या भिंती होती रक्ताहुनी लाल
व्यसनाच्या मोहापायी, युवक कंगाल.'
या एक प्रकारच्या आत्मघातकी तरूणांनी वेढलेल्या देवळातील देवाचे दर्शन घ्यायचे म्हणजे केवढे दिव्य! बरे दर्शनाने प्रसन्नता वाटण्या ऐवजी खिन्नता वाढण्याचीच अधिक शाश्वती. 'मुलांनो व्यसने करू नका' असे सांगण्याचा अधिकार बहुतेक लोक गमावून बसलेले आहेत. बाप नंबरी तर बेटा दस नंबरी असा प्रकार आहे. मंदिराच्या रक्ताहुनी लालजर्द दिसणार्या भिंती पाहुन मी गावाच्या वेशीत अलिकडे बनवलेल्या सपाट जागेकडे सरकतो. पावसाळ्याच्या सुरूवातीला उकिरड्यावर कुत्र्याच्या छत्र्या (विषारी भुईछत्र) उगवतात तशा दोन पानटपऱ्या आणि बाजूस तीन हॉटेल. तिथे भल्या सकाळी लोकांची गर्दी, काहींना गावातच घर असून देखील सकाळचा चहा हॉटेलात प्यायचा आहे. काहींना सकाळी सकाळी जोडीदार पाहून पत्त्यांचा डाव बसवायचा आहे. तर दहा पाच जणांना दारूच्या आहारी गेल्यामुळे आपली तलफ भागवायची आहे. त्यासाठी पैसे नसल्यामुळे आपल्याला उसने पैसे कोण देऊ शकेल याचा ते अंदाज घेत आहेत. तरूणांचा थवा आशाळभूतपणे टपरीकडे पाहत मनात मांडे खात आहे. असं गाव सकाळी - सकाळी कसं माणसांनी फुलून येतं. बगळ्यांचा थवा रस्त्याकडेच्या वडाच्या झाडावर उतरावा असं माणसांनी सगळं ढवळशिपित दिसतं. पण कुणाला शेतीच्या कामासाठी माणूस लागत असलं तर पन्नास रिकामटेकड्या लोकांना हटकून देखील माणूस मिळणार नाही. असा माणसाच्या गर्दीतच माणूस हरवल्याचा, माणूसपण हरवल्याचा प्रत्यय येत राहतो. मोकळ्या जागेत पाहिले तर कचरा, कागदाचे कपटे, गटाराचे पाणी अशी सगळी अस्वच्छता दिसेल. माणसांना त्याचे काहीच वाटतं नाही. उलट 'मला काय त्याचे? 'असा भाव जागवत जो तो आपापल्या छोटेखानी विश्वातील मश्गुल दिसतोय.
श्रमदान ही कल्पना काहींना चांगली वाटली. मी ही त्यांना ती सांगुन पाहिली होती. विधायक कल्पना गावातील लोकांना आवडल्याचा मला खूप आनंद झाला. माझ्या मनाला समाधानाचे हजार घोस लगडले. पण ते फार काळ टिकले नाही. लोकांना श्रमदानाची कल्पना आवडली खरी पण प्रत्यक्ष श्रमदान करायला मात्र कोणाचीही तयारी नव्हती. रोजंदारीवर काम करायला जाऊन देखील अंगचोरीची सवय लागलेले लोक श्रमदान कसे करतील?
पंधरा सोळा वर्षापूर्वीची गोष्ट माझ्या एका पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. आपण ज्या गावातल्या मातीत खेळलो ,ज्याच्या अंगाखांद्यावर वाढलो त्या गावाच्या पांढरीतच पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी आखणी करायला सुरूवात केली. रिकामटेकड्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून गावाच्या एका बाजूस असणाऱ्या समाजमंदिरात कार्यक्रम घ्यायचे ठरवले. समाजमंदिर छान होते पण गावाने सकाळचे काही विधी उरकून खूप घाण केली होती. त्या घाणीने हे ठिकाण वेढलेले होते. सहाजिकच या ठिकाणाच्या जवळपास रहाणार्या लोकांचा मला मनोमन राग आला. सुविधा नेमक्या कशासाठी? आणि कोणासाठी? याचीच नेमकी जाण आणि भान नसलेली ही माणसे(?) सुविधे जवळच घाण करत होती. या ठिकाणी प्रकाशन करावयाचे तर ही घाण साफ करणे गरजेचे होते आणि गावाच्या चव्हाट्यात करावे तर डोक्यात व्यसनाची घाण भरलेल्या माणसाकडून कळत -नकळत का होईना व्यत्यय येण्याची शक्यता होती.
मला समाजमंदीरा भोवतीची घाण काढून टाकणे सोपे वाटले. मदत म्हणून मी ग्रामपंचायतींच्या शिपयासही भेटलो. त्याला दुसर्या दिवशी लवकर त्या ठिकाणी बोलावले पण तो आला नाही. मी त्याला कामाचा मोबदला देण्याचे बोललो होतोच. तरी देखील कामात होणार्या दूर्गंधीच्या त्रासामुळे आणि लोक नावे ठेवतील असे वाटून तो आला नव्हता. त्याच्या लेखी हे काम कमी प्रतीचे होते. गोरा कुंभार, चोखामेळा, विठ्ठल, श्रीकृष्ण, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा हे सारे तो वाचून -ऐकून होता पण ते त्याच्या अंतःकरणात उतरले नव्हते. त्याच्या आत झिरपले नव्हते. जगात काय नि माझ्या गावात काय पुस्तकी पांडित्य असणारांची कमी नाही. कमी आहे ती विचाराप्रमाणे कामे करणारांची. असो. तो आला नाही याचे दु:ख मला झाले नाही. कारण तो न येण्याची शक्यता मला वाटतच होती. मग मीच नाकातोंडाला उपरणे बांधून आणि हातात झाडू घेऊन मी कामाला सुरुवात केली. पाच -सात मिनिटे झाली असतील नसतील माझे काम जोरात सुरू होते. मला समाजमंदिराकडे पाठभिंत असणाऱ्या एका बाईने पाहिले आणि तिने तिच्या मुलीला बोलावले. मग त्या दोघीही मला काम थांबवायला सांगू लागल्या. 'आम्ही दोघी दुपारी सगळं साफ करून घेऊ. तुम्ही जा. ' असे त्या म्हणू लागल्या. पण मला थांबायचे नव्हते म्हणून मी काम सुरूच ठेवले. पाचेक मिनिटातच त्या दोघी हातात झाडू घेऊन माझ्या सोबत सफाई करू लागल्या. अर्ध्या पाऊण तासात परिसर बर्यापैकी स्वच्छ झाला. दुसर्या दिवशी सकाळीही त्या तिथे कोणाला शौचाला बसू देणार नव्हत्या. मी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देऊ केला तर त्यांनी तो घेतला नाही. मला त्या मायलेकीचा अभिमान वाटला. माझ्या गावात पैसे घेऊन कामचुकारपणा करणारी माणसे आहेत, याची धग मी क्षणभर विसरलो. वरवर अशिक्षित दिसणारी सामन्यातील सामान्य माणसे किती हुशार आणि सुसंस्कृत आहेत याने माझा ऊर भरून आला. भले त्यांना श्रमदान शब्द माहित नसेल. पण ते पवित्र कार्य त्यांनी उत्स्फूर्तपणे केले होते. उत्साहाने केले होते. कोणतेही काम लहान नाही हे त्यांनी गावाला दाखवून दिले. हा प्रसंग आठवला म्हणजे मी मनोमन त्यांचं माऊलीचे दर्शन घेतो. श्रमसंस्काराची शक्यता अजून जीवंत आहे याचा आधार वाटतो.
" कष्टणाऱ्या हाती, कुठे आहे सत्ता
घामावर त्यांच्या गावाचा राबता. .."
आपल्या हाताला जगन्नाथाची उपमा देणारे बहुसंख्य लोक गावात असतात. बरड माळात वाढलेल्या गवताला असंख्य फुले यावीत आणि सूर्याच्या वाढत्या उन्हाने वाळून वार्याच्या झोतासरशी ती रानभरी व्हावीत अशी ही माणसे रानभरी - सैरभैरी होतात. मिळेल ते काम करतात. ठेवता आले तर दोन पैसे कनवटीला ठेवतात. चार दिवस सवडीचे मिळाले की गावात येतात. त्यांच्या मनाचा आणि भावनेचा लचका तोडायला गावातीलच सोकावलेले बोके सावधच असतात. ते कधी मित्रत्वाची तर कधी सामाजिकतेची झुल पांघरून बसलेले असतात. तर अनेकदा देव आणि देवकार्य यांचा ठेका घेऊन बसलेले असतात. कष्ट करून, राबून गावात परतणाऱ्या माणसांची वाट पाहत हे बोके दबा धरून बसलेले असतात आणि कष्टकरी सामान्यपणे माणूसपणा घेऊन जगणार्या माणसांच्या हातातोंडातील घास लीलया पळवण्याची अघोरी किमया या घटपर्णी प्रवृत्तीच्या कावळ्यांनी आत्मसात केलेली असते.
पोटासाठी दाही दिशांना गवसणी घालणारे काही जण मोठ्या शहरात राहून ट्रक ड्रायव्हर आणि तत्सम कामे करतात. ते कधी सणावाराला किंवा जत्रा-खेत्राला गावात आले की गावातली बोके माणसे त्यांना गाठणार आणि गावातील मंदिराची पडझड झाल्याचे सांगणार. त्याच्या बांधकामाचा विषय सांगणार. 'तुमच्या सारख्या कमावत्या माणसांनीच दोन पैसे हातभार लावला तर काम मार्गी लागेल. ' असे सांगणार. शेवटी कष्ट करणार्या माणसाला त्याच्या कामातील धोके माहित असतात. आपण इतकं कष्टमय जीवन जगून गावात आलोत, पोरा -बायकोत आलोत ते केवळ देवाच्या आपल्यावरील कृपेमुळेच. ही सामान्य माणसांची भावना झालेली असते. ह्याच भावनेचा लचका तोडण्यात गावातील बोके वाकबगार असतात. कष्टकरून परतणारा माणूस आपल्या लेकरा बाळासाठी जे दोन पैसे कनवटीला खोऊन आणत असतो. त्यातीलच पैसे देवासाठी त्याला द्यावे लागतात. त्यातुन गावात देवळे आणि देवळांच्या ओवर्या बांधल्या जातात. मंदिराला कष्टाच्या पैशांनी वैभव प्राप्त होते. काम करून घेणार्यांना आपण गावासाठी बरचं काही केलय असं वाटायला लागतं. अनेकदा त्यांचा एक छदामही या कामात खर्च झालेला नसतो. गावातून आणखीही काही कष्टकरी शेतमजूर आपलं आणि मुलाबाळांचं पोट भागवण्यासाठी दुसर्या गावी जात असतात. त्यातील काही जण दुसरीकडे जाऊन पाट पाण्यावाल्या शेतकर्यांच्या शेतात राबण्यासाठी वर्षाचा करार करून सालभरासाठी गुलाम झालेले असतात. तर बाकीचे अनेक लोक दूरवर ठिकठिकाणी साखर कारखाना परिसरात ऊसतोडणी कामगार म्हणून गेलेले असतात. आपल्या गावात आपल्याला कष्ट करूनही नीट जगताही येत नाही याची खंत ही माणसं हाताला काम मिळताच विसरतात. गावातील इतर माणसापेक्षा अधिक ओढीनं गावाच्या जत्रा, यात्रा, उत्सव यांची वाट पाहत, त्यासाठी गावाकडे जाण्याचे मनात घोळवत हे लोक रात्रंदिवस काबाडकष्ट करीत राहतात. कष्ट आणि सुख यांची बरोबरी करून गावाच्या जत्रेसाठी, देवाच्या दर्शनासाठी, नातेवाईक आणि भावकीतल्या लोकांच्या भेटीसाठी चार दोन रूपये बाजुला ठेवत माणसं गावात परततात. ती नुकतीच कुठे गावात पायही ठेवत नाहीत तर लगेचच त्यांच्या मागे जत्रेचे पुढारी वर्गणी मागण्याचा सपाटा लावतात. गावाच्या या अशा दंशाने त्यांनी कनवटीला आणलेल्या दोन पैशांच्या स्वप्नांचा जाळ होतो. लहान मुलाबाळांच्या मनातील खेळण्या नाहीशा होतात. लेकी सुनांच्या हातात भरावयाच्या बांगड्यांचे बेत महिनाभरानं पुढे सरकतात. बरं कष्ट करणारे लोक स्वखुशीने देतील तेवढीच वर्गणी घेतील तर ते गावपुढारी कसले! ते ठरवतील तीच वर्गणी सगळ्यांच्या माथी मारली जाते. बरं इमानदारी, देवावर विश्वास, गावाच्या माणसावर विश्वास या साऱ्या गोष्टी कष्टकरी माणसाजवळच दिसतात. वर्गणी दिली जाते. आपल्या आनंदाची किंमत मोजली जाते. मग जत्रा भरते, छबीना निघतो, हंगामा होतो. दुसर्या दिवशी सकाळी कलावंताच्या हजेर्या होतात. त्यात गावपुढारी वर्गणीचा जमा झालेला पैसा जणू आपण आपला स्वतःचा पैसा देत आहोत असे समजून मोठ्या ऐटीने कलावंताला देतात. कलावंत काहीजण खुशीने तर काही नाखुशीने जत्रेची बिदागी घेऊन गावाबाहेर पडतात. गावपुढारीही आपण फार मोठे कार्य पार पाडल्याच्या आविर्भावात माणसातून वाट काढीत घराकडे परततात. त्याचवेळी जत्रेसाठी गावात आलेला कष्टकरी भूमीपुत्र आपल्या लहानग्या लेकराला आणलेला 'शेव-मुरमुर्याचा' खाऊ एका धुडत्याच्या कोपर्यात बांधुन वायरच्या पिशवीत टाकत असतो. तो जत्रेची धूळ खाली बसण्यापूर्वी तो गावातून पुन्हा निघण्याची तयारी करीत असतो. याच वेळेला गावातील काही माणसं जत्रेत झालेल्या पैशाच्या हिशोबाच्या पैशाची मागणी करीत असतात देवळासमोर बसून येणार्या एस.टी. च्या गाडीची वाट पहात बसलेल्या कष्टकरी कुटुंबाला याचे फारसे काहीही वाटत नाही. उलट ते पुन्हा देवाला हात जोडतात आणि मनोमन म्हणतात की, 'देवबाप्पा सुखाचं ठेव, आम्हालाही आणि गावातल्या लोकांनाही!'
जे जत्रेचं तेच हरीनाम सप्त्याचं. महानाभर आगोदरच सप्ताहाच्या वर्गणीचं भूत मानगुटीवर बसतं. दरवर्षी पन्नास-शंभर रुपयांनी वाढत जाणारा हा आकडा गावातील कष्टकरी लोकांना अखंड हरिनाम सप्ताहाची धडकी भरवतो. त्यासाठी शारीरिक कष्टाचा वनवास भोगायला लावतो आणि त्यातून गावात रामायण लावलं जातं. तरी होतील ती किर्तनं अन् मिळेल तसा काला घेऊन भावनिक तृप्तीचा अनुभव घेत कष्टकरी आपले कष्ट विसरून आनंद घेण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. गावातच जत्रा किंवा अखंड हरिनाम सप्ताहाची वर्गणी न देणारे काही
शिकल्या सवरल्या युवकांना राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न पडेल का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांचा विचार युवक कधी अंगीकारतील? मोबाईल आणि कॉम्प्युटर ही साधने आहेत. साधनांचेच व्यसन लागले तर साध्य असणारी कामे कधी पूर्ण होणार? यंत्रापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे म्हणून यंत्राचा वापर माणसाला सुखी करण्यासाठी व्हावा हे विसरून कसे जमेल. हानीकारक व्यसनाची वाट सोडून समाजसेवेचा आणि नवनिर्मीतीचा ध्यास घेणारे तरूण गावागावात दिसतील तर तोच उजेडाचा किरण सार्या गावाला निसंशय प्रकाशमान करून टाकील !
------------------------------------
डॉ.कैलास दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी
जि. अहमदनगर पीन. ४१४१०२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा