गाव : ऊब आणि धग भाग : ६ वा
गाव : उब आणि धग. (लेख ६ वा. प्रकाशित फेब्रुवारी मार्च २०१९ जोड अंक)
□ मृत्यू आणि मृत्तिका
डॉ.कैलास दौंड
गावाचे जिव्हाळ्याचे नाते नदीशी. नदी आधी आणि गाव नंतर असा क्रम असला तरी नदी आणि गाव यात सहसा अंतर पडत नाही. गावालगतची नदी ग्रामसंस्कृतीची साक्षीदार आणि वाहक असते. गावाला लागुन वाहणाऱ्या नदीला काही नावही नाही. या नदीतून फक्त पाणीच वाहतं असं नाही तर गावातल्या मन आणि भावनाही भरभरून वाहतात. पावसाळ्यात पाणी आणि उन्हाळ्यात झळा याच पात्रातून प्रवाही होतात. अगदी तसचं नदीतून वाहणाऱ्या पाण्याला जीवन म्हणतात आणि ऐहिक जीवन संपले की माणसांना नदीत किंवा नदीतीरावर आणतात. या दोन्ही कारणाने सकल गावकर्यांच्या मनात नदी सतत ओलीच असते.
राना शिवारातल्या मातीचं मनामनात कौतूक असतं लहानथोरांच्या. मातीला जागणारी, माती खाणारी आणि मातीमोल जीणं जगत माती होणारी माणसं दुसऱ्याच्या मातीलाही हळवं होतं जात राहतात.
आजोबा वारल्याचं मला चांगलं आठवतं. तेव्हा मी आठ- नऊ वर्षाचा होतो. घरात माणसांची खूप रेलचेल होती. तीसहुन अधिक माणसांचं एकत्र कुटूंब होतं. आजोबा होते तेव्हा बर्याचदा गोठ्यातील त्यांच्या खाटेवर पडूनच असत. वयही ऐंशी नव्वदच्या घरात असावे .त्यामुळे ते गेले तेव्हा जाण्याचे दु:ख मानण्यापेक्षा त्यांना जातांना फारसा त्रास झाला नाही याचे समाधानच घरातील जाणत्यांना झाले. मलाही त्याबद्दल विशेषकाही वाईट वाटले नाही. उलट त्यांच्या दहाव्याच्या दिवशी सहामाही परीक्षेचा एक पेपर बुडवण्याची संधी मात्र मिळाली आणि ती संधी मी साधली .नदीत खूप माणसे जमा झालेली होती यावेळी. यापूर्वी कधीही नदीत गोळा झालेली इतकी माणसं मी पाहिलेली नव्हती .
याच वयात गावच्या नदीत पाणी असेल तेव्हा आम्ही शेजारची पोरं सोबत घेऊन पोहायला जात असू. खरेतर पोहण्याइतके पाणी नसायचेच पण डुंबायला, उड्या मारायला मजा येई. कधी कानठळ्या बसून डोके दु:खे. कधी सर्दी होई. मग नदीकडे आम्हाला जाता येऊ नये म्हणून घरची माणसे विशेषत: आई वडील दक्ष असत. अशावेळी मन हजारदा नदीच्या पात्रात उड्या मारून येई. अगदी दूर गेलेल्यांना गावाची ओढ जशी लागते तशीच गावातील मुलांना नदीची ओढ लागून राही. जेव्हा मुलं अत्यंतिक ओढीनं आणि आनंदानं नदीकडे जाऊ पाहतात; पाण्यात डुंबु पाहतात, नखशिखांत भिजू पाहतात तेव्हा त्यांना सहसा खुल्या मनाने कोणीही मुभा देत नाहीत. मात्र जेव्हा माणसांचे आयुष्य संपते तेव्हा लोक त्याच्या इच्छे- अनिच्छेचा विचार न करता उचलुन नदीत आणतात आणि स्वतःच गळे काढतात!
गावात मंदिरे अत्यावश्यक आणि गावपणासाठी अपरिहार्य असल्यासारखे दिसते. तितकीच किंवा त्यापेक्षा अधिक अपरिहार्य गोष्ट म्हणजे गाव नदीलगतची स्मशानभूमी . माणसांच्या मरणानंतर ज्या गावातले अन्न खाऊन माणूस वाढला त्याच गावातल्या नदीपात्रात त्याचे सरण पेटवून राख सावडली जाते. त्याला 'माती देणे' असं देखील म्हणतात. पावसाळ्यात पावसाच्या पडण्याने डोंगररानाची झीज होते. माती पाण्यासोबत वाहू लागते. नदीला मातकट पाण्याचा पूर येतो. पुढे माती निवळून कडेला लागली की पाणी नितळ होतं जातं. ज्यांचं दफण केलं जातं त्यांना माती दिली जाते. सृष्टीशी मिळून जाण्याची आणि पून्हा सर्जनाचा भाग होण्याची ही रित असते. तर दहन करण्याची प्रथा देखील मातीमय होण्याचीच क्रिया.
आपल्याला लवकर मरण येऊ नये अशा प्रकारची भिती अनेकांच्या मनात उत्पन्न होते त्या वातावरणात गेल्यावर सहजपणे निर्माण होते. क्वचित आपल्यालाही मरण येईल अशीही भिती वाटत राहते. दीर्घकाळ जगायला मिळावे अशी जवळपास साऱ्यांचीच इच्छा असते. 'शंभर शरद ॠतू जिवंत रहा' ही आपली प्रार्थना आहे. त्यामुळे वृद्ध, वयस्कर माणसांना तरूण लोक मरण्यासाठी पात्र समजत असले तरी त्यांची जगण्याची आशा कायम असते. आपल्या गावातील , मित्रपरिवारातील, कुटुंबातील कोणाचा मृत्यू होऊ नये अशीच सर्वांची अपवादात्मक परिस्थिती सोडता भावना असते. गावातील माणसे एकमेकांच्या आजारपणात आणि अपघातात पळापळ करतांना दिसतात. मात्र जीवन प्रवासातला मृत्यू नावाचा शेवटचा थांबा आल्याखेरीज जीवन परिपूर्ण होत नाही.
शेवटी होऊ नये वाटत होते तेच झाले. घराचा भार खांद्यावर घेऊन असलेली म्हातारी वारली. हे वय आम्हाला कळण्या समजण्याचं होतं. माणसाचं मरण आप्तस्वकियांना हळवं बनवतं. म्हातारीच्या कितीतरी आठवणी भोवताली फेर धरतात. तिचं जाणं चटका लावून गेलं. तीसहुन अधिक माणसं असणाऱ्या कुटुंबातील सगळ्यांच्या मनाला जपण्याचं अवघड कामं तिनं केलं. कधी स्वतःसाठी काही मागून घेतलं नाही. एकदम साधं आणि निस्वार्थी जगणं ज्याला म्हणता येईल ते म्हातारीच्या रूपाने मावळलं. आपण काहीतरी खूप किमतीचं आपल्याजवळचं हरवलं आहे, अशी आमची भावना होत राहीली. नाही म्हणायला त्या आजीच्या सावलीत वाढलेली माणसं वागण्या बोलण्यात आजीचा वाण सांभाळून होती. काळाने म्हातारीच्या देहाला नेलं खरं आणि पुढे तर तो खरोखरचं सोकावला देखील. त्याची खोड कुणालाही मोडता येणे शक्य नव्हते. अनादी काळापासून हेच घडत होते आणि अनंत काळापर्यंत हेच घडत राहणार होते. 'जन्मता निश्चये मृत्यू, मरता जन्म निश्चये. ' गीताई सांगत राहते. ही स्थितप्रज्ञा कोण रूजवतं आपल्यात? गेलेल्या म्हातारी सारखीच माणसे कळत नकळत स्थितप्रज्ञेच्या बिया आपल्या देहात खोलवर पेरतात. काळाचे हल्ले पचवतांना गावातील माणसांना जड जाते. 'मरणादारी की तोरणादारी ' अशी मनोवस्था होऊन जाते. अगदी पालखी निघावी अशा अंत्ययात्रा खेड्यात निघतात. ऊभं आयुष्य एकमेकांना न बोलणारी माणसेही सहजच अंत्ययात्रेत सामिल होतात. माणूस गेला की कुणी त्याचं उणंदुणं काढायचं नाही अशी गावाची परंपरा. मग कधी न पाहिलेल्या माणसांच्या मरणवार्तेनेही हळवं व्हावं हा जणू मातीचाच गुण. नकळत्या वयात पाहिलेला म्हातारा आणि म्हातारीला स्वतःत सामावून घेणाऱ्या काळाचा हैदोस सुरूच राहिलाय.
एक मावशी होती. ती पूर्वी फक्त एकदाच पाहिल्याचे आठवते. तेही खूप उशीरा, अगदी दहाव्या बाराव्या वर्षी. नंतर एकाएकी तिच्या मरणाचा सांगावा घेऊन नात्यातली दोन माणसे आली. ती माणसेही पहिल्यांदाच घरी येत होती. बातमी कळताच आईने टाहो फोडला. आम्हाला काय करावे ते कळेना. जवळपास दहा कोसाचं अंतर आम्ही पायीच तुडवत गेलो. त्या पाठोपाठ घरातील कारभारी ज्यांना सारे भाऊ म्हणत ते गेले. खूप समंजस, वारकरी बाण्याचा माणूस. उंच अंगकाठी, धोतर आणि पांढरा फेटा असायचा. विरक्त होत गेला तसाच गेला. असं एकेक पानं कधी पिकून तर कधी न पिकताच वावटळीत सापडून गळून पडण्याचं सत्र सुरूच होतं.
अलिकडच्या काही वर्षात तर गावावर अवदसाच आल्यासारखं झालयं. काही माणसांना काळ येई पर्यंत जगणं सुद्धा जड वाटतयं म्हणून ते काळाच्या पाटीत कबड्डी घालत जाऊन बाद होताहेत. त्यासाठी कुणी विषारी किटकनाशके तर कुणी विहीरी जवळ करताहेत. कधीकधी मृत्यूचा गाडा नकळतपणे अंगावर येऊन माणसे भेलकांडत आहेत. काहींचा चोराकडून खून होतोय .गावात ट्रक ड्रायव्हरांची संख्या अधिक असल्यामुळे कुणाचा रस्ते अपघातात मृत्यू होतोय. एक मात्र खरे की मृत्यू कोठेही झाला तरी स्मशान मात्र गावचेच !
गावाच्या भूमीत मरण हा देखील एक उत्सव सोहळा असतो. मरणादारी की तोरणादारी? असा प्रश्न स्वतःलाच विचारून तोरणादारी म्हणजे उत्सवाच्या वेळी, लग्नाकार्यात जरी एकत्र नाही होता आले. एक दुसर्याच्या घरी जाता आले नाही तरी मरणादारी एकत्र येण्यावर सगळ्याचे एकमत असते. कधी नव्हे एवढा चांगुलपणा एखाद्या माणसाच्या मृत्यूच्या निमित्ताने दिसतो. भांडणात एखाद्याला शिवी हासडतांना एखादा माणूस दुसर्याला 'कुत्र्याच्या मौतीनं मरण्याचा शाप देतो. ' पण तरीही एखाद्याचा अपमृत्यू पाहून हे असे दुश्मनाच्या बाबतीतही घडू नये असे तळतळून म्हणतो. असे का ? तर गावातल्या माणसाने मरण हे अंतिम सत्य म्हणून तर स्वीकारलेले आहेच परंतु एखाद्या घरच्या कर्त्या माणसाच्या मरणाने होणारी त्याच्या कुटूंबाची कुचंबणाही जवळून पाहिलेली असते. आजही गावातील माणसं हातातील कामं टाकून कुणाच्याही अंत्यविधीला जातात. त्याला जड अंतःकरणाने निरोप देतात. मढे झाकुनी पेरणी करणाऱ्या गावकर्यांच्या लेखी 'मातीवर पसरणे एक नवा थर अंती ' हे एवढेच नसून एखाद्याचे जाणे भावनामय पातळीवर जाऊन चिंब होण्याचा क्षण असतो. म्हणूनच अंत्ययात्रा गावाच्या नदीत पोहचते तेव्हा नदी माणसांनी फुलून जाते. यथासांग विधि होऊन चितेस भडाग्नी दिला जातो. हे सगळे होत असतांनाच गावातील बहुतेक माणसांच्या मनात आपल्या मृत्यूनंतर याच नदीत आपले 'असे' विधी व्हावेत असे वाटते. त्यातही गाव सोडून पोटासाठी गावाबाहेर गेलेल्यांच्या मनात तर जरी आपण पोटासाठी गाव सोडलेले असले तरी शेवटी आपल्याला गावातच यायचे आहे हे नक्की असते. त्यामुळे गावाबद्दल वेगळीच सहानुभूती वाटत राहते.
' कुणाचे ओवळे, कुणाचे सोहळे
गावाच्या भूईत, मरण भोवळे '
एखाद्याचे जाणे आणि त्याला लाभलेले कारूण्यमय उत्सवाचे कोंदण माणसाला खूप खूप हळवे करून जाते. एखाद्या अकाली जाणार्या महिलेच्या बाबतीत तर इतर स्रीया त्यांच्या रडण्यातून 'तिच्या भरल्या सभेतून जाण्याची ' महती गायच्या. आपल्याला सुवासिनीचं मरण यावं, असं चिंतीतच बायका स्मशानातून परत फिरायच्या .त्यांच्या कथा-गितातून अहेव मरणाचा उद्धार व्हायचा. वैधव्याचा दु:खद काळ आपल्या आयुष्यात येऊ नये असे गावातील सर्वच बायांना वाटायचे. आपापल्या पतीराज्यांना दीर्घायू चिंततांना हेही कारण असायचे.
वृद्धांच्या जाण्यानं गाव फारसा भावव्याकूळ कधीच झाल्याचे दिसले नाही उलट 'वयच झालतं आता ' , 'बरं झालं पुढं हाल होण्यापेक्षा' , ' सुटला बिचारा ' किंवा 'सुटली बिचारी.' असे शेरे लोकांच्या गप्पांमधून ऐकायला मिळायचे. अर्थात त्या त्या प्रसंगापुरते हे बोल खरेही असायचे. पण म्हणून जीवन आणि जगणे कोणाला नकोसे झालेय का? त्यामुळे वय झालेल्या माणसांना हाडं करकर वाजत असुनही आपण अजून मजबुत आहोत असा बहाणा करावा लागे. पण खरी पंचाईत तेव्हाच व्हायची की जेव्हा पावसाची झड लागलेली असायची. दोन तीन दिवस पाऊस काही उघडायचं नाव घेत नसायचा. 'पावसानं असं काय कोकण माजवलय. ' म्हणत लोक घरात बसून पावसाच्या नावानं बोटं मोडायला लागतं. त्यातच गावात कोणाच्या घराची भिंत, कोणाच्या घराची व्हरांडी पडल्याच्या बातम्या तोंडोतोंडी गावभर पसरत. घरं ही गळायला लागलेली असत; हवेत गारवा पळत राही . आपण या थंडीनं दुखणं घेऊन पडतो की काय? असं वाटत असतांनाच खबर येते की गावातला 'मारतबबा' वारला ! मग तळतळ, हळहळ आणि 'पडूनच होता लैंदी 'असी सुटलेपणाची भावना व्यक्त होई.
त्याची भावकी ठरवून दिल्यासारखी या अशा पावसाळी वातावरणातही लाकडे आणणे, कपडे आणणे, नातेवाईकांना फोन करणे अशी कामे करीत राहतात अन् पावसाची रिपरिप ढिली पडताच 'आम्ही जातो आमच्या गावा ' च्या गंभीर निनादात त्याची अखेरयात्रा नदीकडे सरकू लागते. नदीला थोडे पाणी असते. वरही आभाळ भरलेले असते. 'आता किमान तास अर्धातास तरी पाऊस पडून देऊ नकोस रे देवबाप्पा.' अशी आभाळाकडे पाहत मनोमन प्रार्थना करीत त्याला अग्नीच्या हवाली केले जाते. तेथून परत आल्यावर गावातल्या हरएक म्हातार्यांना आपल्या मरणाची भिती वाटू लागते. त्यामुळे ती गप्प पडून राहतात. घरातील कोणाशीच बोलेणाशी होतात अन् नेमकी तिसर्या दिवशी रामगल्लीतील म्हातारी वारते .याचा धक्का उरल्या सुरल्या म्हातार्यांना बसतो. गावातील जुनी जाणती माणसं 'आता तीन नाहीतर पाच माणसं गमाल्या शिवाय हे लटमाळ बंद व्हायचं नाही.' असं म्हणतात आणि होतंही तसंच; म्हणजे तसं होईस्तोवर ते मोजत राहतात. भितीने खचणारे म्हातारे अन् म्हातार्या विषम संख्येत मरत राहतात. अशावेळी लोकही आता पुढचा नंबर कोणाचा लागेल याचा अंदाज काढीत राहतात. पुढं या रहाटगाडग्याला थोडासा ब्रेक लागल्यानंतर उरले -सुरले म्हातारे 'वाचलो बुवा या फेऱ्यातुन असं समाधान मानतात.
या म्हातार्यांना देखील रडवणारे आणि भावव्याकूळ करणारे दु:खद प्रसंग देखील कधीकधी घडतात. यावेळी अख्खा गावच नव्हे तर सगळा परिसरच हळवा बणतो. काळाचा जबडा कोणावर हल्ला करेल सांगता येत नाही. गावातील एखादा तरूण जेव्हा अकालीच जातो तेव्हा गावातली म्हातारी माणसे देखील आसवे गाळतात. नंतर तिच पुढे होऊन दु:खी झालेल्यांना सावरतात.
असं हे खेड्यातलं जाणं, त्याला आपुलकीची साथसंगत. येथे कोणाच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण होत नाही. झालीच तर ती भरून काढण्याचा आत्यंतिक प्रयत्न होतो.
गेला तो जाणारच होता. उरलेल्यांनी जगत राह्यचयं. 'स्मशानभूमी 'ही गावाच्या आस्तित्वाची खूण. या ठिकाणी गेल्यावर माणसाला शहाणपणा सुचतो पण तो फार वेळ टिकत नाही. त्यामुळे या क्षणिक शहाणपणाला 'स्मशाणवैराग्य ' नावानं शहाणी माणसं ओळखतात. असं कुठलं वैराग्य सहसा खेड्यातील खेड्यातील माणसं येऊ देत नाहीत. जसा जन्माचा उत्सव तशीच मृत्यूनंतर पाठवणी. माती चिरंतन आहे. पीक निघत राहतात. माती पुन्हा पुन्हा त्यासाठी तिची कुस पणाला लावत राहते.
गावाच्या नदीतून फिरतांना स्मशाना जवळ गेले की काही माणसांना, लहानमुलांना भिती वाटते. आठवणीतले मेलेले माणूस आता भूत झालेले असेल आणि ते आपल्याला भिती दाखवेल असा अनाठायी भितीचा बागुलबुवा कोणाच्याही मानगुटीवर बसू नये व रस्त्यावर वर्दळ रहावी यासाठी जुन्या जाणत्या माणसांनी नदीत विहीर खोदलीय. नदीकाठी आंब्याची झाडं लावलीत. त्याला 'गुरूआंबा' असं नाव दिलय. आंब्याच्या दिवसात तर लेकराबाळांची येथे हमखास वर्दळ असते. आता आणखी काही नवीन झाडं लावलीत आंब्यांची आणि जांभळीची. ती आता पुरेशी वाढलीत. त्यांनाही फळे फुले येऊ लागलीत. हंगामात माणसांची वर्दळ वाढत राहीली. मृत्यू हे जन्माचं फळ असल्यासारखे ही फळांची झाडे पाहुन वाटते.
पण दुसर्याच क्षणी नदीत गेल्या काही वर्षापूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीकडे लक्ष जाते. गावात कुठल्याशा सरकारी निधीतून बांधलेली ही वास्तू नीट आणि त्यातील पैसा न वाचवता बांधली असती तर धो धो पावसात आणि नदीला फोफावत जाणारा पूर असतांनाही मृत्यूमुखी पडलेल्या एखाद्या माणसाची 'सुखासुखी' पार पडली असती. पण 'खाऊजा' प्रवृत्तीने येथेही आपले अस्तित्व दाखवून दिलेय. याठिकाणी एखाद्याच्या कलेवरास अग्नी दिला तर खुद्द त्या स्मशानभूमीचाच पत्रे निखळून अंत्यविधी होईल. ..हे असं गावाचं मरण! आपणच आपल्या उण्याचे वाटेकरी. जशी झाडं लावणारी माणसं गावातली तशीच स्मशानभूमी बांधकामातून पैसे वाचवणारी आणि तकलादू काम करणारी माणसेही गावातलीच. मी अस्वस्थपणे विचारात नदीकाठी उभा असतो. पलिकडे माझा गाव आणि गावाची निनावी नदी आपल्या हिवाळी गतीने झुळझुळत वाहत राहते. निर्मळ, निरिच्छ, वार्याच्या गतीने.
-----------------------------------------
डॉ.कैलास दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन414102
kailasdaund@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा