गाव : ऊब आणि धग विशेष भाग


    ○ बीज जपावे उरात । मग पीक वावरात॥
                   डाॅ. कैलास दौंड
_________________________________________________________

गोष्ट बियांच्या जतनाची आहे. मागच्या महिन्यात सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या अकोले- राजुरच्या डोंगराळ भागात गेलो होतो. दिवस उन्हाळ्याच्या आगमनाचे होते खरे परंतू तरीही त्या उंचीवर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवा आल्हाददायक होती. पट्टा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याने कोंभाळणे गावातीलच पोपेरेवाडीच्या वळणावर असणाऱ्या एकुलत्या घराने माझे लक्ष वेधून घेतले. हे घर महाराष्ट्राची 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचे असल्याचे पाचपुते सरांकडून समजले. अर्थातच या ठिकाणी भेट देणे नक्की केले. म्हणून खिरविरे गावातून परततांना आवर्जून थांबून राहीबाईची भेट घेऊन तिचे घर, शेत व बीजसंग्रह पाहिला. सोबत असणाऱ्या दीपक पाचपुते या शिक्षक मित्रांची त्यांच्याशी चांगली ओळख होती. आजचा सगळा दिवस ते शिक्षक असलेल्या खिरविरे येथील हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसोबत व्यतित केला होता. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुलांनी प्रश्न विचारून अक्षरशःभंडावून सोडले होते. शहरातल्या मानाने अधिक समजदार वाटावी अशी मुलं इथ भेटल्याने मनाला एक वेगळेच समाधान मिळाले असल्याने सायंकाळ झाली असूनही उत्साही होतो.
           राहीबाई पोपेरे यांच्या कामाला आताशा प्रसिद्धी मिळू लागल्याने त्यांच्यातील उत्साह दुणावला आहे.  बचत गट आणि बायफ मित्रा संस्थेच्या सहकार्यामुळे त्यांच्या त्यांच्यात आत्मविश्वास आलेला आहे. आपण करीत असलेले काम महत्त्वाचे आहे. ते कोणीतरी पहात आहे, समजावून घेत आहे. आपला संदेश योग्य पोहोचतो आहे याचे समाधानही तिच्या चेहऱ्यावर दिसते.
            साधारणतः साठीत पोहोचलेल्या राहीबाई उत्साहाने त्यांनी तयार केलेला 'बीजकोष' दाखवत असतात. परिसरात कधीकाळी येणारे  सात्विक वाण तिने वेगवेगळ्या प्लॅस्टिक डब्यात भरून ठेवून त्याच्या बाहेरील बाजूस आतील बियांचे नाव डकवलेले आहे. तर बियांचे अनेक वाण त्यांनी उतरंडीतील मडक्यात भरून ठेवलेले आहेत. हे बी ठेवताना त्यांनी बियाणे जपवणूकीचा पारंपरिक व अल्पखर्चिक मार्ग निवडलेला आहे. 'मडक्यात राख टाकून त्यात बियाणी ठेवल्यास त्याला साधारणतः तीन वर्षे तरी कीड लागत नाही.' असे ती सांगत असते .नि मी मडक्यातील राखेमधील मटकीचे बियाणे पाहत असतो.
            काड्यांपासून विणलेल्या आणि गाई-बैलांच्या शेणाने सारवून घट्ट केलेला केलेल्या 'सलदा' मध्ये बियाणे साठा करून व त्यावरून पुन्हा तसेच झाकण लावून शेणाने लिंपून सीलबंद केलेला बियाण्यांचा साठा लक्ष वेधून घेत होता. तर घराच्या वलणीला लसुन, भेंडी, वाल, चवळी, दोडके, मक्याची कणसे, वांगे, दुधी, भोपळा,चक्की भोपळे, डांगर असे वाळवलेले नानाविविध वाण बांधलेले होते. त्यामूळे नैसर्गिक स्थितीतच बियाणे राहणार होते.  घरात अनेक पुरस्कारांची स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे होती.  मात्र राहीबाई ते दाखवण्याऐवजी बियाणे दाखवत होती हे विशेष. त्यांच्या घराच्या बाहेर पडल्यावर दाराकडे घेवड्याची बाग पाहिली तर त्यात किमान चार प्रकारचे घेवडे लावलेले होते. हे सगळे पाहून झाल्यावर आम्ही त्यांना शुभेच्छा देत मार्गस्थ झालो.
         कोंभाळणे गावात जन्मलेल्या आणि त्याच गावात माहेरवाशिन झालेल्या व शेती-मातीशी एकरूप झालेल्या राहीबाईच्या भेटीने मी नकळतपणे तीस चाळीस वर्षे भूतकाळात मागे गेलो.
           तिने दाखवलेल्या बियांत गावठी हिरवे वांगे, लाल चवळी, तंबाटे, नागली, लांब हिरवा घेवडा, वरई, राळा, खुरासणी, रायभोग, काळभात, जिरवेल, तामकुड, खडक्या असे भाताचे विविध प्रकार, गोडवाल, कडूवाल, तांबडावाल असे वालाचे प्रकार, अनेक प्रकारचा घेवडा, मटकी, भोपळी अशा दोनशेपेक्षा अधिक बीजांच्या प्रकारांचा समावेश आहे. हे सगळे वाण अस्सल देशी गावरान वाण आहेत. ते पौष्टिक आणि पाण्याचा ताण सहन करणारे आहेत. त्यांच्या बियाणे बँकेच्या व बचत गटाच्या माध्यमातून दहा गावातील लोक एकत्र काम करून पंचवीस हजार पाकिटे बियाणे विक्रीसाठी ठेवतात. राहीबाई पोपेरे यांच्या कामाला आता अनेक हात जोडले गेलेले आहेत.
          मला माझ्या बालपणी पाहिलेली  बियाण्यांचे जतन करणारी माणसे आठवली.  हे फक्त आमच्याच घरात होत होते असे नाहीतर जवळपास शेती असलेल्या सर्वांच्या घरी हे होत होते. घरच्या घरी एरंडाच्या एरंड्या काढून व त्यातील गोडंबी काढून घेऊन चुलीवरच 'आरड' घेऊन त्यातून खाद्यतेल काढणारी आजी व आई यांना मी त्या काळी वर्षातून एकदा दोनदा हमखासच पाहत असे. करडईच्या दाण्यांचा भाजीत वाटून वापर करणे तर उन्हाळ्याच्या दिवसात नित्याचेच होते. सर्वांच्या घरी वलनीला लसुन, मका, ज्वारीची कणसे, जवस,हुलगा सर्रास नजरेस पडे. गहू, हरभरा घरीच पिकलेला असे आणि तोच चांगला निवडून पेरणीसाठी ठेवलेला असे. ज्वारीसारख्या बियाण्यांना गंधक लावून  पेरणी आधी जंतुनाशक केले जाई. उतरंडीच्या मडक्यात एरंड्या, करडई, चूका, भुईमूग हमखास बियाणे म्हणून ठेवलेला असे.
           राहीबाई पोपेरे यांचे काम याच प्रकारचे आहे. त्यांच्या या कामामुळे नष्ट होऊ पाहणार्‍या गावरान वाणांचे जतन केले जात आहे.  कृषी शास्त्रज्ञांना या बियाण्यावर संशोधन करून पौष्टिकता  कायम ठेवून, अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित बियाण्यांची निर्मिती त्यातून करता शकेल. मात्र राहीबाईंचा संकरित बियाणे वापरण्याला विरोध आहे. कारण संकरित खाण्यामुळे आजार वाढतात ,असे त्यांचे मत आहे. तर सर्वांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे  यासाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाची गरज आहे असे संशोधकांचे मत आहे.
       पाखरांची सुगी। पेरावया आले॥
       कनवाळू भले ।शेतकरी.

      गोलक्या दांड्याची।खुडूनी कणसे॥
      राऊळाचे वासे।  सजविती.

      दाण्यातूनी विख।उगवूनी आले॥
      माळातून गेले।शेष सत्व.

      कडू घास गोड। मानुनिया पक्षी॥
      उडाले आकाशी ।भोवंडत.

        ('अंधाराचा गाव माझा' मधून पृष्ठ- २३)
        मुळातच शेतीची सुरुवात, संवर्धन आणि आधुनिक शेती तसेच बियाण्यांची जपवणूक यात जगभरातील स्त्रियांचेच योगदान अधिक आहे. अनादी काळात पुरुष जेव्हा शिकारीच्या शोधात जात असत तेव्हा बालसंगोपनासाठी थांबलेल्या स्रिया नदीकाठच्या गवतात खाण्यायोग्य बियांचे गवत शोधत असाव्यात.त्यातीलच काही बी जमवून जमीन खणून त्यात टाकत असतील आणि त्यावर पाणी शिंपडून पुन्हा पीक घेत असतील. त्यातूनच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, सातू अशी तृणधान्ये संवर्धित झाली. शेतीची सुरुवात ते आधुनिक शेती प्रत्येक टप्प्यावर महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. या कामाचे स्वरूप खूप कठीण आणि खडतर असणार हे नक्कीच!
                अलीकडे दादाजी रामजी खोब्रागडे या संशोधक शेतकऱ्यांनी  शेती करता करता शोधलेले आणि  संवर्धित केलेले 'एचएमटी सोना' ,' नांदेड हिरा' , 'डी आर के-2' व इतर वाण  जास्त उत्पादकता  देणारे ही ठरले आहेत. दादाजींचे नवीन वाण शोधण्याचे कार्य आणि राहीबाईचे देशी बीज शोधण्याचे कार्य संशोधनाचे कार्य हे अगदीच लोकपरंपरा वाहकांचे कार्य आहे. दादाजींच्या वाट्याला कृषिभूषण सारखा एखादा सन्मान आला. राहीबाईंची दखल त्यामानाने बरी घेतली गेली. आता नुकताच महिला दिनाच्या औचित्याने त्यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोथिंबीर यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कार मिळाला आहे.  तरीही मुळातच लोकसाहित्याच्या  प्रमाणेच बीज संवर्धन देखील अपौरुषेय आहे असे म्हणावे लागते. कारण कितीतरी अज्ञात लोकांचा या प्रक्रियेत सहभाग असतो. गवतातून अन्नधान्याचा घेतलेला शोध आणि बियांचे केलेले जतन हा शेती व्यवस्थेचा प्राथमिक आणि पायाभूत भाग आहे. याचा उपयोग शेती शास्त्रज्ञांना नक्कीच होत असतो. कसदारपणाचे गुणधर्म कायम ठेवून किंवा शक्य तर वाढवून त्यांची उत्पादकता वाढवणारे बीज विकसित करण्याचे कार्य त्यांना करावयाचे असते. पौष्टिक आणि कसदार अन्न ही सर्वांचीच गरज आहे हेच खरे!
                     हे झाले जीव जगवणाऱ्या बिजांच्या संवर्धन आणि संरक्षणाबाबत. माणसाला जगावेसे वाटणे ही त्याची नैसर्गिक प्रेरणा आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगाविषयी वाटणे ही त्याची मानसिक आणि सामाजिक प्रेरणा आहे. त्यासाठी त्याने काही सवयी विकसित केलेल्या आहेत तशीच काही बंधने ही स्वतःवर लादून घेतलेली आहेत. आपल्या पुढील पिढीत ही आत्मसन्मानाच्या आणि स्वाभिमानाच्या बीजाची रूजवण  व्हावी म्हणून तो प्रयत्नही करत असतो. या  बीजांचे संवर्धन करण्यासाठी काही लोक त्यागही करत असतात. जेव्हा एखादी बीज जमिनीत गाडून घेते तेव्हाच दाण्यांनी लग्न बदलेले कणीस मिळत असते.
   " एका बिजा नाश केला। मग भोगले कणीस॥ "
  असे तुकोबांनी लिहून ठेवलेय ते का उगीच थोडे आहे?
            मानवता, सामंजस्य, न्याय, समता, बंधुता, सामाजिकता, राष्ट्रीयता, देशभक्ती या भावनांचा परिपोष प्रत्येकाच्या मनामनात करण्यासाठी, त्या बीजाची पेरणी करण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी, शेतीच्या बीयांचे जतन करणारी राहीबाई किंवा दादाजी सारखे लोक किंवा त्या आधी घराघरातुन प्रयत्न करणारे निष्ठावान शेतकरी आता मानवी सदवर्तनाच्या बाबतीतही तयार होण्याची निकड वाटते आणि वाढते आहे.
        आपल्याकडे ही निकड विविध संप्रदायांच्या संतांनी, समाज सुधारकांनी आपापल्या परीने भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या बाजारीकरणाच्या  अर्थप्रधान जगण्यामुळे या बियाण्यांच्या संवर्धन आणि विकसन करण्याच्या कामात गुंतवून घेणाऱ्या केशवसुतांच्या भाषेत 'सनदी' शेतकऱ्यांची गरज निर्माण झालेली आहे, हे मात्र नक्की. मला माहिती आहे की की तेजाचा आणि बीजाचा प्रवास कधीच संपत नसतो. एका कवितेत मी लिहिले आहे -
         " तेजाचा प्रवास थांबत नसतो म्हणतात,
      मग माझ्या विझत जाण्याचे काय?
       मला जपला पाहिजे अंगार
      आणि त्याला केले पाहिजे वेगवान.
       पेरणीसाठी ठेवलेल्या कणसातच
       मला दिसत आहेत अग्निबान."
____________________________________________________ 
      ( लेखक प्रसिद्ध ग्रामीण कवी व कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. )

           डाॅ.कैलास दौंड
            मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि.अहमदनगर पीन414102.
                  kailasdaund@gmail.com
Mo -9850608611

टिप्पण्या

  1. आधी हा लेख मी वाचला होता...नितांतसुंदर लिहिला आहेत,दौंड सर....तुमचे सगळे लिखाण हृदयापासून असते..मनाला प्रचंड भावते...राहीताईबरोबर तुमचेही मनःपूर्वक अभिनंदन.....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर